हिवरगाव पठार येथील वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई! तीन दिवसांपासून रोहित्र जळाल्याने डोंगदर्‍यांतून आदिवासी बांधव आणताहेत पाणी

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील हिवरगाव पठार येथील वीज रोहित्र जळाल्याने आदिवासी वाड्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शेजारीच असणार्‍या डोंगदर्‍यांतील कपारीतून झिरपणार्‍या झर्‍यातून आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी वाहून आणावे लागत असल्याची दुर्दैवी वेळ आली आहे. किमान आता तरी मायबाप सरकारने लक्ष देवून तत्काळ रोहित्र बसवून द्यावे अशी आर्त विनवणी नागरिक करत आहे.

सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यातच महावितरणचा गलथान कारभार नागरिकांच्या जीवावर उठला आहे. हिवरगाव पठार गावांतर्गत असलेल्या गिर्‍हेवाडी, पायरवाडी, सुतारवाडी, कोळेवाडी, दगडसोंडवाडी आदी आदिवासी वाड्यांना गावातील सार्वजनिक विहिरीतून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु गेल्या तीन दिवसांपूर्वी येथील वीज रोहित्र जळाले आहे. यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी येथील आदिवासी बांधवांना डोंगरदरीत असलेल्या झर्‍याचा आधार घ्यावा लागत आहे. पहाटपासूनच तेथे जावून तांब्याच्या सहाय्याने झर्‍यातून पाणी काढून हंडा भरुन घ्यावा लागतो. त्यानंतर भरलेला हंडा डोक्यावर घेवून महिलांसह पुरुषांना डोंगर उतरुन घरी यावे लागते. मोठी पायपीट करुन अवघे एक-दोन हंडे पाणी प्रत्येकाला मिळत आहे. एवढे भीषण वास्तव असतानाही सरकारच्या संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

एवढे करुनही आदिवासी नागरिकांना पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगारासाठी गावाबाहेर पडावे लागते. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी असे हाल सुरू झाल्याने रोजगाराकडे लक्ष द्यावे की पिण्याच्या पाण्याकडे लक्ष द्यावे या विवंचनेत आदिवासी बांधव सापडले आहेत. कायमच दुष्काळाच्या छायेत सापडत असलेल्या पठारभागाला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येते याचा अध्याय सुरू झाला असून अजूनही उन्हाळा पार पडायचा आहे. त्यामुळे मायबाप सरकारने किमान आता तरी लक्ष देवून रोहित्र तत्काळ बसवून द्यावे आणि हेळसांड थांबवावी अशी आर्त विनवणी वाडीचे नागरिक करत आहे.

या प्रकरणी ग्रामसेवक विजय आहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रोहित्र जळून तीन दिवस झाले आहे. त्यासंदर्भात आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार करुन संपर्क केला आहे. मात्र अद्यापही रोहित्र मिळालेले नाहीत. त्यामुळे वाड्यांवरील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.

Visits: 9 Today: 1 Total: 80391

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *