नेवाशाचा अभिजीत पात्र असूनही पोलीस भरतीत अपात्र ठरला! तहसीलदारांकडे आत्मदहनाची मागितली परवानगी; क्रीडा क्षेत्रात उडाली खळबळ

नायक वृत्तसेवा, नेवासा
संघटनेने वेळेत क्रीडा विभागाला कागदपत्रे सादर न केल्याने पोलीस भरती परीक्षेत पास होऊन देखील अपात्र ठरलेल्या नेवासा येथील व्हॉलीबॉल खेळाडू अभिजीत सुरेश हुसळे याने झालेल्या अन्यायामुळे तहसीलदारांकडे आत्मदहनाची परवानगी मागीतली आहे. यावरुन आता अभिजीतला न्याय मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अभिजीत हा विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष हुसाळे यांचा नातू आहे. त्याने नेवासा तहसीलदारांना निवेदन देऊन आत्मदहनाची परवानगी मागितल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनमार्फत नागपूर येथे घेण्यात आलेल्या ज्यूनिअर आंतर विभागीय स्पर्धेत पुणे विभागामार्फत त्याने भाग घेतला होता. संघाने विजेतेपद पटकाविल्याने संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे व सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांचे स्वाक्षरीसह त्याला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले होते. त्या प्रमाणपत्रा आधारे अभिजीतने खेळाडूंसाठी राखीव कोट्यातून 5 ऑक्टोबर, 2021 रोजी पुणे शहर पोलीस शिपाई भरती परीक्षा दिली. त्यात तो पास झाला.

दरम्यान, पुणे विभागीय क्रीडा कार्यालयाच्या उपसंचालकांनी 13 ऑक्टोबर, 2021 रोजी असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांच्याकडे स्पर्धेचा अहवाल व संबंधित कागदपत्राची मागणी केली. अभिजीत यानेही सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्याला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. 31 ऑक्टोबरपर्यंत कुठलाही अहवाल त्यांनी क्रीडा उपसंचालकांना पाठविला नाही. त्यामुळे त्यास पुणे सहाय्यक पोलीस आयुक्तांनी अपात्र ठरविले. अभिजीतने मला न्याय मिळत नसेल, तर आत्मदहनाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नेवाशाच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आपल्याला न्याय मिळावा, यासाठी अभिजीतने मुख्यमंत्री व क्रीडामंत्र्यांकडे ई-मेलद्वारे दाद मागितली. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही सदर ई-मेल पुढील कार्यवाहीसाठी क्रीडा विभागास पाठविण्यात आल्याचे कळविले आहे. मला हेतूपुरस्सर व्हॉलीबॉल असोसिएशन व सचिव सूर्यवंशी यांनी पोलीस भरतीपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे माझे संतुलन बिघडले आहे. मला न्याय मिळावा.
– अभिजीत हुसळे, राज्यस्तरीय व्हॉलीबॉल खेळाडू-नेवासा

Visits: 11 Today: 1 Total: 114806

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *