बोट्याच्या सरपंच पतीचा ग्रामपंचायतीवर ताबा! मनमानी कारभार; पदाचा गैरवापर, बोगस दाखले, ग्रामसभाही धुडकावली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गावखेड्यांचा कारभार स्थानिक पातळीवरुन चालावा यासाठी पंचायत राज अंतर्गत निर्माण झालेल्या ग्रामपंचायतींनी आपापली गावे समृद्ध केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्याचवेळी मिळालेल्या संधीचा लोककल्याणासाठी वापर करणं सोडून पदाधिकार्‍यांकडून गावालाच ओरबाडून खाण्याचे प्रकारही कमी नाहीत. असाच धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील पठारभागातूनही समोर आला आहे. बोट्यात सातत्याने सुरु असलेल्या या गैरकारभात महिला सरपंच असलेल्या सोनाली शेळके यांच्या पतीने जणू ग्रामपंचायतीवरच ताबा मिळवला असून मनमानी कारभार सुरु केला आहे. धक्कादायक म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत परस्पर आपल्याच सहीने ‘ना-हरकत’ कसे मिळवले? असा विषय चर्चेत येताच बेकायदापणे माईकचा ताबा घेवून पत्नीच्या जीवावर अधिकार गाजवणार्‍या या महाशयांनी गावालाच धमकावून टाकले. यामुळे बोट्याचे ग्रामस्थ संतप्त झाले असून विभागीय महसूल आयुक्तांसह जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेतून महिला पदाधिकार्‍यांच्या पतींचा शासकीय कारभारातील वाढता हस्तक्षेपही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत बोटा ग्रामस्थांनी विभागीय महसूल आयुक्तांना पाठविलेल्या तक्रार अर्जानुसार २६ जानेवारी रोजी शासकीय नियमानुसार बोटा ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेने ठरवलेल्या अजेंड्यानुसार काम सुरु असताना सरपंच सोनाली शेळके यांचे पती संतोष शेळके यांनी हस्तक्षेप करुन बेकायदा माईकचा ताबा घेतला व परस्पर ग्रामसभा संपल्याचेही जाहीर करुन टाकले. ग्रामसभेत पहिल्या क्रमांकावर गावात काही दिवसांपूर्वी राहण्यास आलेल्या तरुणाने श्रीराम प्राणप्रतिष्ठेवरुन सोशल मीडियात पोस्ट करुन दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा विषय चर्चेला आला. जवळपास दोन तास याच विषयावर चर्चा सुरु राहिल्याने त्यातून तणाव निर्माण झाला. अखेर घारगाव पोलिसांनी मध्यस्थी करुन सामोपचाराने वाद सोडवण्याचा सल्ला देत या विषयावरील चर्चा थांबवली.

यानंतर सरपंच सोनाली शेळके यांचे पती संतोष यांच्या जागेतील खाण व्यवसायाला देण्यात आलेल्या ‘ना-हरकत’ प्रमाणपत्राचा विषय समोर आला. सदरचा दाखला ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर न देता संगणकावर तयार करुन देण्यात आला होता व त्यावर सरपंचांनी स्वतःच्या शिक्यानिशी सही केल्याचे निदर्शनास आणण्यात आले. या दाखल्याबाबत ग्रामविकास अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता कार्यालयाच्या जावक नोंदीत ‘त्या’ दाखल्याचा उल्लेखच नसल्याचेही स्पष्ट झाले. विशेष म्हणजे संतोष शेळके यांच्या जागेतील मूळ खाणीवर यापूर्वीच महसूल विभागाने दहा कोटीहून अधिक रुपयांची दंडात्मक कारवाई केलेली आहे. त्याच जागेत दुसर्‍या नावाने खाण व्यवसाय दाखवून झालेला ‘दंड’ परस्पर वसूल करण्याचा प्रकार यातून दिसून आला आहे.

याबाबत सरपंच महोदयांच्या पतींकडे ग्रामस्थांनी विचारणा केली असता महाशयांनी सभेचा ताबा घेत मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्याला त्यांच्या सरपंच असलेल्या पत्नीनेही प्रोत्साहन देत पुरेपूर साथ दिली. बराचवेळ दोघा नवरा-बायकोने यथेच्छ गोंधळ घालून प्रजासत्ताक दिनीच आपल्या गैरकारभाराचे स्वतःच वाभाडे काढले. यानंतर महिला ग्रामसभेतील गुटखा व दारुबंदीच्या ठरावावर केलेल्या कारवाईबाबत ग्राविकास अधिकार्‍यांकडे विचारणा करण्यात आली. २९ ऑगस्ट २०२३ रोजीच्या सभेत मंजूर झालेल्या या ठरावाबाबत २६ जानेवारी २०२४ च्या ग्रामसभेत विचारणा केल्याचा राग येवून चालू ग्रामसभेत ग्रामविकास अधिकार्‍यांनी ‘मला तुमच्या गावाचे काहीएक घेणं-देणं नाही, माझ्या बदलीचा ठराव गटविकास अधिकारी यांना द्या. माझ्याकडे कमावलेले फारकाही आहे, माझे वरपर्यंत हात पोहोचलेले आहेत. तुम्ही माझे काहीच वाकडे करु शकत नाही. मला काहीच फरक पडत नाही.’ असे मोठमोठ्याने ओरडत, हातातील कागदपत्रे चक्क ग्रामस्थांच्या अंगावर भिरकावून देत, अर्वाच्च शिवीगाळ व हावभाव करीत ग्रामविकास अधिकारी महोदय तेथून ताडकन निघून गेले ते गाव सोडूनच.

त्यानंतर पुन्हा उधाण आलेल्या सरपंच पतींनी कोणाचेही काहीच न ऐकता, मनमानीपणे ग्रामस्थांना एकेरी भाषेत संबोधून समोर बसलेली मंडळी वेडी असल्याचेही घोषित करुन टाकले. त्यांचा संबंध नसताना ग्रामपंचायतीच्या कारभारातील वाढता हस्तक्षेप, सर्वसामान्यांना दरडावण्याचे प्रकार, सरपंचाच्या जागी नेहमीच त्यांचा पती, पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भिंतीलगत कोणतीही परवानगी न घेता कार्यालय थाटले, याबाबत ग्रामसभेत चर्चाही झाली. मात्र त्याचा कोणताही परिणाम सरपंच पतीवर झाला नाही.

अखेर ग्रामस्थांनी एकजूट होवून या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला असून ३७ ग्रामस्थांनी लेखी तक्रारीद्वारे नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तांसह जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकार्‍यांचे या गंभीर विषयाकडे लक्ष्य वेधले आहे. हा सगळा प्रकार प्रशासनाकडून ग्रामसभेच्या झालेल्या व्हिडिओ चित्रणात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले असून त्यावर कारवाई न झाल्यास गावातील आदिवासी समाजाचे शिवाजी बन्सी तळपे यांनी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.


बोट्यात ग्रामपंचायत पदाधिकार्‍याच्या पतीची दांडगाई असह्य झाल्याने तेथील विषय चव्हाट्यावर आला, मात्र अशा कितीतरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्या ठिकाणी आजही बिनबोभाटपणे सर्रास पतींचे राज्य आणि वर्चस्व कायम आहे. या घटनेतून स्त्री शक्तीचा जागर करताना उद्भवणारी ही गंभीर समस्याही ठळकपणे समोर आली आहे. एकीकडे सरकारांकडून महिलांना सशक्त करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असताना मिळालेल्या संधीचा अशाप्रकारे होणारा गैरवापर चिंतेचा विषय आहे.

Visits: 24 Today: 1 Total: 115614

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *