श्रीरामपूर शहरात बिबट्याचा धुमाकूळ; सात जणांवर हल्ला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्यानंतर वन विभागाने केले पिंजर्यात जेरबंद

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील मोरगे वस्ती परिसरात रविवारी (ता.5) सकाळी घुसलेल्या बिबट्याने धुमाकूळ घातला. त्याने मध्यवस्तीत येत दोन मुलांसह पाच जणांवर हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले. बिबट्याला पकडण्यासाठी मोजकेच लोक होते. मात्र, बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी, बिबट्या सैरभैर झाला. यातूनच त्याने एकापाठोपाठ एक असा तब्बल सात जणांवर हल्ला केला.

श्रद्धा सचिन हिंगे (वय 11), ऋषभ अंबादास निकाळजे (वय 8), कांताशेठ कुमावत (वय 35), बाळासाहेब अडांगळे (वय 55), राहुल मारुती छल्लारे (वय 42), मारुती शिंदे (वय 50) यांच्यासह वन कर्मचारी लक्ष्मण किमकर (वय 50) हे बिबट्याच्या हल्यात जखमी झाले. शहरातील कामगार रुग्णालयासह व बधे हॉस्पिटमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथील जिल्हा रुगालयात हलविण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.

शहरातील मोरगे वस्तीतील गुलाब झांजरी यांच्या घराच्या परिसरात रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबट्या आला. त्याने खासगी क्लासला जाणार्या श्रद्धा हिंगे हिच्यावर अचानक हल्ला केला. त्यात तिच्या हातावर गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर बिबट्याने ऋषभवर झडप घातली. ही माहिती शहरात वार्यासारखी पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे बिबट्या आणखीच सैरभैर झाला. दुपारी एक वाजेपर्यंत हे थरारनाट्य सुरू होते. बिबट्याला पळवून लावण्यासाठी काही नागरीकांनी फटाके फोडले. आरडाओरडा केल्याने बिबट्या सैरभैर होवून अधिक हिंस्र बनला. दुपारच्या सुमारास झावरे मोटर्समागे झुडूपात लपलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग, पालिका प्रशासन, महसूल विभाग व पोलीस पथकाने धाव घेतली. मोहटा देवी मंदिर परिसरात एका वसाहतीत वन विभागाने बिबट्याला पकडले. वन अधिकार्यांनी बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. काही वेळाने पिंजर्यात जेरबंद केले.

बिबट्याला पकडण्यात रामनाथ शिंदे, करीम शेख, रोहित बकरे, राजू शिंदे, दीपक इंगळे, चंदन शिंदे, अनिल लोखंडे, रवींद्र पडवळे, संतोष पारधी, रवीराज बेलदार, लखन शिंदे, जयसिंग जारवाल, रमेश शिंदे, दीपक शिंदे, सुरेश शिंदे व अभिषेक बनसोडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या सर्वांचा लवकरच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली. बिबट्या जेरबंद केल्यानंतर स्वतः मिटके यांनी घटनास्थळी जाऊन संबंधितांचे अभिनंदन केले.

लोकवस्तीत घुसलेला बिबट्या घाबलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे तो दिसेल त्यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवित होता. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरातील वैदू समाजातील काही लोकांची मदत घेण्यात आली. बिबट्याच्या हल्ल्यात वन कर्मचार्यांसह सहा नागरिक जखमी झाले. जखमींचा उपचारासाठी लागणारा खर्च सरकार करणार आहे. बेशुद्ध केलेल्या बिबट्यावर उपचार केल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येईल.
– सुवर्णा झोळ-माने (विभागीय वनाधिकारी)
