कोंभाळणे शिवारातील ठाकर समाजाची तीन घरे आगीत खाक! दुचाकी, पैसे व संसारोपयोगी साहित्य जळाले; मदतीची गरज

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कोंभाळणे शिवारातील आदिवासी समाजातील ठाकर वस्तीवरील तीन घरे शुक्रवारी (ता.2) सकाळी आगीमध्ये सापडली. यामध्ये दुचाकी, पैसे आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाली आहे. या दुर्दैवी घटनने गरीब कुटुंबांवर मोठा आघात झाला असून, दानशूरांनी पुढे येवून मदत करण्याची गरज आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोंभाळणे शिवारातील ठाकर वस्तीवर युवराज गावंडे, सुनीता गावंडे, सखाराम गावंडे, सखूबाई गावंडे या चौघांची कुटुंबे राहतात. ही कुटुंबे कामानिमित्त बाहेर गेली होती. त्या दरम्यान, त्यांच्या घरांना आग लागली. त्याची माहिती मिळताच कुटुंबे घटनास्थळी आली. तसेच आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील चाळीस पोती धान्य, पैसे, दुचाकी, कागदपत्रे, शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. जळते घर उघड्या डोळ्यांनी पाहताना या कुटुंबांचे अश्रू अनावर झाले.

घरात झोपलेल्या दोन वर्षांच्या मुलास सखूबाई गावंडे यांनी आगीतून बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती कळताच तहसीलदार मुकेश कांबळे यांनी मंडलाधिकारी कुलकर्णी यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. माजी आमदार वैभव पिचड यांनी जळीतग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली. तर दुर्दैवी घटनेने गरीब कुटुंबांवर झालेल्या आघातामध्ये मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे.

सध्या कडक उन्हाळा सुरू झाल्याने आगीच्या घटना घडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन ज्वलनशील पदार्थ व वस्तू व्यवस्थितरित्या ठेवणे गरजेचे आहे. तसेच घरातील चूल पूर्णतः विझवूनच घराबाहेर पडावे.

Visits: 8 Today: 1 Total: 80502

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *