रोहित्रावरील वीज जोडणीच्या आश्वासनानंतर भाजपचे आंदोलन स्थगित नेवासा तहसीलदारांच्या मध्यस्थीला यश; संपूर्ण वीजबिल माफीची शेतकर्यांची मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
वीजबिल न भरणार्या शेतकर्यांच्या कृषीपंपांची वीज तोडण्याचे आदेश मागे घेण्यात येऊन विनाअट कृषीपंपांची जोडणी करावी. या मागणीसाठी भाजपच्यावतीने नेवासाफाटा येथे बुधवारी (ता.24) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु, मंगळवारी (ता.23) तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मध्यस्थीने वीज वितरण कंपनी व भाजप पदाधिकार्यांच्या चर्चेत मुदत वाढवून देऊ, रोहित्रावरील जोडणी पूर्ववत करण्यात येईल. मात्र वीजबिल भरा असा तोडगा निघाल्याने बुधवारी होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने वीजबिल माफ करावे अशी मागणी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी बोलताना केली.
वीजबिल भरण्याच्या संदर्भात रोहित्रावरील वीज जोडणी तोडणे, वसुली अभियान वीज वितरण कंपनी राबवत आहे. याबाबत मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांना धीर देण्यासाठी भाजपने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लागू करण्यात आले असल्याने होणारे आंदोलन मागे घ्यावे असे पत्र तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी भाजप पदाधिकार्यांना दिले होते. वातावरण अधिक चिघळू नये यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घेऊन वीज वितरण कंपनीचे अभियंता शरद चेचर यांच्याशी चर्चा घडवून आणली होती व ती यशस्वीही झाली. या चर्चेत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, कार्यकारी अभियंता शरद चेचर, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, भाजपचे जिल्हा संघटन सचिव नितीन दिनकर, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी सहभाग नोंदवला.
शासन निर्णयानुसार शेतकर्यांच्या कृषीपंपांची रोहित्रावरील वीज जोडणी तोडण्याच्या आदेशाच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. मात्र कोविडचे संकट पुन्हा उद्भवल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतु यातून तोडगा काढण्यात यावा यादृष्टीने तहसीलदार सुराणा यांनी बैठक घडवून आणली हे सांगून मुरकुटे म्हणाले, आज शेतकर्यांच्या कृषीपंपांची वीज जोडणी तोडल्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली त्याचे पैसे शेतकर्यांना मिळालेले नाही. यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला असून वीज तोडणीचे संकट शेतकर्यांपुढे उभे राहिल्याने ते चिंताग्रस्त झाले असल्याचे सांगितले.
त्यावर सहाय्यक अभियंता शरद चेचर म्हणाले, बंद रोहित्र सुरू करण्यात येतील, शासन नियमांप्रमाणे रोहित्रावरील तोडलेली वीज जोडणी पुन्हा जोडण्यात येईल. मात्र शेतकर्यांनी चालू बिल भरावे असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत अनेकांनी मते मांडली. त्यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शेतकरी शैलेश सुरुडे, अंकुश काळे, राजेंद्र मते, बापूसाहेब दारकुंडे, नगरसेवक सुनील वाघ, सुरेश डिके, जनार्दन जाधव, पोपट वाघमोडे, दादाराम आघम, रमेश घोरपडे उपस्थित होते.