बेल्लारी पोलिसांनी इराणी गुन्हेगारांसह एकास ताब्यात घेतले चोरीचे सोने प्रकरण; श्रीरामपूर शहर पोलिसांकडून मोठी गुप्तता
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
कर्नाटक राज्यातील कोईमतूर बेल्लारी येथील पोलिसांनी चोरीच्या सोने प्रकरणी दोन इराणी गुन्हेगारांसह श्रीरामपूर शहरातील एकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांना घेऊन बेल्लारीला गेले असल्याचे समजते.
कोईमतूर येथे श्रीरामपूरातील इराणी गुन्हेगारांनी सोने चोरी केली होती तसा गुन्हा तेथे दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी कोईमतूर पोलीस श्रीरामपूरात आले होते. त्यांनी आगोदर दोन इराणी गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांतर चोरीचे सोने ज्याला विकले त्यालाही पकडले. त्याना घेऊन पोलीस बेल्लारीला गेले आहे. त्यांनी किती तोळे सोने विकले आहे, हे मात्र समजू शकले नाही. शहर पोलीस ठाण्यात तशी या घटनेची नोंद करुन कोईमतुर पोलीस तीन आरोपींना घेऊन गेले. याबाबत शहर पोलिसांकडून मोठी गुप्तता पाळण्यात आली होती.
शहरातील इराणी बाहेरच्या राज्यात जाऊन गुन्हेगारी करतात. इतर राज्यातील पोलीस येथे येवून त्यांना घेऊन जातात. यापुर्वी अशा चार ते पाच घटनेत पोलिसांनी येथील गुन्हेगारांना उचलले आहे. त्यांची मोठी टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी शहर पोलिसांकडून पाळण्यात येत असलेल्या गुप्ततेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.