नाशिक विभागात उत्तरेतील चार बसस्थानके स्वच्छ! ‘अ’ गटात संगमनेर द्वितीय; पाच लाख रुपयांचे पारितोषिक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य परिवहन महामंडळाने गेल्यावर्षी राबविलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक’ अभियानातंर्गत नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्याला चार पारितोषिके मिळाली आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याला मिळालेली सर्व पारितोषिके उत्तर नगरजिल्ह्याने पटकावली असून विभागस्तरावर ‘अ’ वर्गातील बसस्थानकांमध्ये संगमनेरला तर ‘ब’ वर्गात लोणी बसस्थानकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. कोपरगाव व राहाता बसस्थानकांना अनुक्रमे ‘अ’ व ‘ब’ वर्गातील तृतीय पारितोषिक मिळाले आहे. या अभियानात जिल्ह्यातील 28 बसस्थानकांचा सहभाग होता. त्यात संगमनेर बसस्थानकाने 79 गुणांसह दुसर्‍यास्थानी झेप घेतल्याची माहिती संगमनेरचे आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली.


राज्य परिवहन महामंडळाने 1 मे 2023 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील 563 बसस्थानकांमध्ये स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबवले होते. लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित या अभियानात बसस्थानक व परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागांचा वापर करुन बागबगीच्यांची निर्मिती, वृक्षारोपण, प्रवाशांसाठी प्रतिक्षा कक्षात बैठक व शुद्ध पाण्याची व्यवस्था, घड्याळ व सेल्फी पॉईंट यावर अधिक भर देण्यात आला होता. त्यासोबतच प्रवाशांना मिळणार्‍या सुविधा, बसची स्वच्छता, तांत्रिक दुरुस्ती व देखभाल यासर्व घटकांचे योग्य नियोजन करुन गेल्या वर्षभरात विविध सर्वेक्षण समित्यांकडून सर्व बसस्थानकांचे मूल्यांकन करण्यात आले होते.


या मूल्यांकनाच्या माध्यमातून मिळालेल्या गुणांच्या आधारे बक्षिसपात्र बसस्थानकांची निवड करण्यात आली. या अभियानात राज्य व विभाग स्तरावर अ, ब, क या पद्धतीने तीन पारितोषिके काढण्यात आली. यात नाशिक विभाग स्तरावर ‘अ’ वर्गातील बसस्थानकांमध्ये संगमनेरने 79 गुण मिळवताना पाच लाख रुपयांचा दुसरा तर कोपरगाव बसस्थानकाने 78 गुणांसह अडीच लाख रुपयांचा तिसरा क्रमांक पटकावला. यासोबतच ‘ब’ वर्गात लोणी बसस्थानकाने 75 गुणांसह अडीच लाखांचा दुसरा, तर राहाता बसस्थानकाने 71 गुणांसह दीड लाख रुपयांचा तिसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या सर्व बसस्थानकांना येत्या 15 ऑगस्टरोजी मुंबईतील कार्यक्रमात बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे.

Visits: 400 Today: 2 Total: 1105710

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *