काँग्रेसकडून ‘भीमशक्ती’च्या कार्यकर्त्यांना नेहमीच डावलले जाते ः हंडोरे

काँग्रेसकडून ‘भीमशक्ती’च्या कार्यकर्त्यांना नेहमीच डावलले जाते ः हंडोरे
राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस सोडण्याचे माजी मंत्री हंडोरेंनी केले सूतोवाच
नायक वृत्तसेवा, राहाता
महाराष्ट्र राज्याची भीमशक्ती संघटना काँग्रेससोबत तब्बल 40 वर्षांपासून विविध निवणुका आणि आंदोलनांमध्ये सक्रीय सहभागी होऊन कार्यरत आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत पक्षाकडून ‘भीमशक्ती’च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अथवा सत्तेत वाटा देताना डावलले जात असल्याचा आरोप करीत आता संघटना स्वतंत्र राजकीय पक्षाची नोंदणी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगतानाच माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी काँग्रेस सोडण्याचे सूतोवाच केले आहे.

नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात नुकतीच भीमशक्ती राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस सोडताना स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा अथवा राष्ट्रीय स्तरावरील समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करण्याचा पर्यायही आपल्या समोर असल्याचे सांगतानाच दलित चेहरा नसलेल्या पक्षांकडून आपल्याला ‘ऑफर’ असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. मात्र ‘भीमशक्ती’ वंचित, अत्याचाराने त्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करण्याचा विचारही करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने आपल्याला मंत्रीपद दिले, पण त्यानंतरच्या काळात आपण आणलेल्या योजना ठप्प झाल्या असून भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांना महामंडळे, विविध समित्या तसेच विधान परिषदेसह वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना डावलेल जात असल्याची भावना कार्यकार्त्यांनी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केली असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आपण या निर्णयापर्यंत आल्याचे त्यांनी नमूद केले. परंतु, काँग्रेस सोडल्यानतंर कोणत्या पक्षासोबत जाणार यावषियी स्पष्टपणे कोणतेही विधान करण्याचे त्यांनी टाळले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर अशोक दिवे, राहुल दिवे, बाळासाहेब शिरसाठ, प्रशांत दिवे, भाऊसाहेब साठे, संदीप मगर आदी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे व भीमशक्ती संस्थापक अध्यक्ष यांनी जो निर्णय घेतला त्याला भीमशक्तीचे राहाता तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड यांचा तालुक्याच्यावतीने जाहीर पाठिंबा असल्याचे घोषित करण्यात आले.

Visits: 182 Today: 1 Total: 1418810

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *