संक्रातीला समोर आली महिन्यातील सर्वोच्च रुग्णसंख्या! शहरी रुग्णगतीच्या सरासरीत घट कायम, ग्रामीण सरासरीत मात्र वाढ


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संक्रातीची पूर्वसंध्या निरंक राखणार्‍या कोविडने ऐन संक्रातीच्या दिवशी 26 जणांना बाधा केल्याचे समोर आले. गुरुवारी शहरी संक्रमणात किरकोळ घट तर ग्रामपंचायत निवडणुकांनी ग्रामीण रुग्णक्षेत्रात जवळपास एक टक्क्याहून अधिक सरासरी रुग्णवाढ झाल्याचे समोर आले. गुरुवारी (ता.14) एकूण 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले, त्यात शहरातील अवध्या तिघांचा समावेश आहे. या रुग्णवाढीने तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या आता 6 हजार 177 वर पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात नागरिक मुक्त संचार करीत असूनही रुग्णवाढीच्या गतीत एकसारखी घट नोंदविली गेली आहे. त्यातच मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला 13 जानेवारी रोजी एकही रुग्ण समोर न आल्याने यंदाची संक्रांत संगमनेरकरांसाठी गोड ठरणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र प्रत्यक्ष संक्रांतीच्या दिवसाने ते फोल ठरवित गुरुवारी गेल्या गेल्या 14 दिवसांतील सर्वोच्च रुग्णसंख्या समोर आली. त्यामुळे ग्रामीण भागातील सरासरी रुग्णगतीत किंचित वाढ झाली होवून सरासरी 7.67 वरुन 8.85 वर पोहोचली आहे. तर शहरात मात्र दिलासादायक चित्र असून गुरुवारी शहरातील केवळ तिघांना बाधा झाली. त्यामुळे सरासरी रुग्णगती आणखी किंचित कमी होवून ती 3.42 वरुन 3.38 वर आली आहे. गेल्या चौदा दिवसांत तालुक्यात एकूण 159 रुग्ण समोर आले असून त्यात शहरातील 44 तर ग्रामीण क्षेत्रातील 115 रुग्णांचा समावेश आहे.

गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये शहरातील तांदूळ बाजार परिसरातील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 62 वर्षीय महिला व अकोले बायपास रोडवरील 58 वर्षीय इसम संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. तर ग्रामीण भागातील तळेगाव दिघे येथील 52 वर्षीय इसमासह 42 वर्षीय तरुण, सारोळे पठार येथील 41 वर्षीय महिला, निमगाव खुर्द येथील 35 व 31 वर्षीय तरुण, 31 वर्षीय महिला व सहा वर्षीय बालक, निमज येथील 60 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 50 वर्षीय महिला.

झोळे येथील 60 व 30 वर्षीय महिलांसह 15 वर्षीय मुलगी, 52 वर्षीय इसमासह 23 व 16 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 31 वर्षीय तरुण, झरेकाठी येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय महिला, कोळवाडे येथील 65 वर्षीय महिला, मांची हिल येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, नांदूरी दुमाला येथील 42 वर्षीय महिला व आश्वी खुर्दमधील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 63 वर्षीय महिला असे एकूण 26 जण बाधित झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 6 हजार 177 वर जावून पोहोचली आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून दररोज वाढत जाणार्‍या कोविड आलेखामुळे अस्वस्थ झालेल्या संगमनेरकरांना नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. या महिन्यातील गेल्या चौदा दिवसांत सरासरी 11.35 रुग्णगतीने तालुक्यात 159 रुग्णांची भर पडली. याती शहरात सरासरी 3.38 रुग्णगतीने 44 तर ग्रामीण रुग्णगतीत सरासरी 8.85 वेगाने 115 रुग्णांची भर पडली. त्यातच शनिवारपासून (ता.16) देशभरात कोविडचे लसीकरण सुरु होत असल्याने कोविडचा पराभव आता दृष्टीपथात आला आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 29789

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *