दरोड्याच्या तयारीतील टोळी तालुका पोलिसांनी पकडली
नायक वृत्तसेवा, संंगमनेर
तालुक्यातील निमगाव बुद्रुक शिवारातील सांगवी फाटा येथे दरोडा टाकणाच्या तयारीत असलेल्या टोळीला तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. या कारवाईत त्यांच्याकडून लोखंडी गज, लाकडी दांडके, मिरची पूड आदी साहित्य जप्त केले आहेत. सदर कारवाई गुरुवारी (ता.14) पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास केली आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, निमगाव बुद्रुक शिवारातील सांगवी फाटा येथे गुरुवारी पहाटे आठ जणांची टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्त खबर्यामार्फत पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह पोलीस कर्मचार्यांना समजली होती. त्यानुसार सापळा लावत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहा.फौजदार बाळासाहेब घोडे, पोलीस हवालदार संजय बडे, म्हातारदेव जाधव, पोलीस नाईक मनोज पाटील यांच्या पथकाने सांगवी फाटा येथे अंधारात लपून बसलेल्यांपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अंधाराचा फायदा घेऊन पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडे एक लोखंडी गज, लाकडी दांडके, मिरची पूड, रोख रक्कम पाचशे रूपये असा मुद्देमाल मिळून आला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक महेंद्र सहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक 28/2021 भादंवि कलम 399 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यापैकी राहुल संजय शिरसाठ (वय 24, रा.धांदरफळ खुर्द), किरण संजय काळे (रा.अकलापूर, ह.मु.धांदरफळ खुर्द) व एक अल्पवयीन यांना ताब्यात घेतले आहे. तर रवी संजय शिरसाठ (रा.जोर्वे), सतीष डोखे (धामणगाव आवारी, ता.अकोले), गोरख सखाराम फोडसे, आकाश फोडसे, सुरेश फोडसे (तिघेही रा.धांदरफळ खुर्द) हे पाचजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बी.बी.घोडे हे करत आहे.