पशुचिकित्सक सेवादाता असोसिएशनचे दुग्धविकास मंत्र्यांना निवेदन विविध मागण्या सोडविण्याबाबत मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन

नायक वृत्तसेवा, नेवासा
पशुचिकित्सक सेवादाता असोसिएशनच्या सदस्यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेवून खासगी पदविकाधारकांच्या अडचणींबाबत साकडे घातले. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांतून मांडण्यात आलेले काही प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत.

राज्यस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या पशुचिकित्सक सेवादाता असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संतोष लांडे, उपाध्यक्ष डॉ.अनिल कोरडे, सचिव डॉ.राहुल काळे, खजिनदार डॉ.चंद्रकांत होन, ज्येष्ठ सदस्य डॉ.नितीन पालवे, डॉ.भीमराज लांडे, डॉ.दत्तात्रय लोहकरे व अभिजीत दरंदले यांनी मंत्रालयात सुरुवातीला जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची भेट घेवून आपल्या समस्या सांगितल्या. गडाख यांनी पशुसंवर्धन मंत्री केदार यांची बैठक घडवून आणली. सदस्यांनी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ व माजी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली.

पशुचिकित्सक सदस्यांनी वाड्यावस्त्या व दारोदार फिरुन दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या गायी, म्हैस व बैलांना सेवा देत असताना शासकीय नोंदणी नसल्याचे आधारावरुन पोलीस प्रशासनाने कारवाया केल्या, ही कारवाई थांबवावी अशी प्रमुख मागणी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे करण्यात आली. मंत्र्यांनी तातडीने पशुसंवर्धन आयुक्तांना सूचना करत यावर उपाययोजना करण्यासाठी पत्र दिले. उपस्थितांनी मंत्री केदार यांचा सत्कार करुन समाधान व्यक्त केले.

पदविकाधारक पशुवैद्यकांना कायदेशीर परवानगी देणे, रात्री-बेरात्री जनावरांवर उपचार करावे लागत असल्याने औषधे खरेदी करणे, वापरणे व साठा करण्यास परवानगी मिळणे, सन 2007 नंतरच्या ‘एलएमडीपी’ पदविकाधारकांना अत्याधुनिक पशुवैद्यकीय शास्रसंबंधी पुरवणी अभ्यासक्रम शालांत किंवा ऑनलाईन उपलब्ध करून द्यावा. यासह विविध प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले. कायदेशीर वैधता तपासून आवश्यक कारवाई करण्याचे पत्र आयुक्त कार्यालयात देण्यात आल्याने संघटनेच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 116677

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *