सारोळ्याच्या जावयाकडून आदिवासी महिलेला मारहाण! पठारभागातील संतापजनक प्रकार; आरोपीला पाठीशी घातल्याचा पोलिसांवर आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
किरकोळ कारणावरुन शेजारी राहणार्या आदिवासी महिलेशी कुरापत काढीत शिंदोडीत राहणार्या जावयाकरवी तिला गलिच्छ व जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्याची घटना तालुक्यातील सारोळेपठार येथून समोर आली आहे. दलित व मागासलेल्या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणार्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला आठ दिवसांपूर्वी घडलेला हा प्रकार समोर आल्याने तालुक्यात संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणात घारगाव पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करुन आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांमध्ये वाच्चता झाल्यानंतर या प्रकरणी विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल झाला असून आरोपी अतिक बशीर शेख याला पहाटे अटक करण्यात आली आहे. या घटनेने हप्तेखोरी, मनमानी आणि अव्यवस्थेच्या चर्चेपासून आडवाटेला गेलेल्या घारगाव पोलिसांची चर्चा पुन्हा सुरु झाली असून अधिकार्यांच्या मुजोरीवरुन तक्रारीचे सूरही निघू लागले आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या महिन्यात 25 नोव्हेंबररोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सारोळेपठार गावात घडला होता. या गावात राहणारी तीस वर्षीय आदिवासी महिला ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी वितरणाचा वॉल बंद करुन माघारी घराकडे येत असताना शेजारी राहणार्या जैतुन गुलशन अन्सारी या महिलेने नाहक तिला शिवीगाळ सुरु केली. यावेळी तक्रारदार आदिवासी महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले व घरी येवून आपल्या कामात व्यस्त झाली. या दरम्यान संबंधित महिलेने शिंदोडीत राहणारा तिचा जावई अतिक बशीर शेख याला बोलावून घेतले.

रात्री साडेआठच्या सुमारास सारोळ्याच्या या जावयाने सदरील महिलेशी भांडण उकरुन तिला अतिशय गलिच्छ आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याची सासू जैतुन अन्सारी आणि बायको अलमिरा या दोघीही शिव्यांची लाखोळी वाहत आरोपीला प्रोत्साहन देत होत्या. त्यामुळे जोश संचारलेल्या आरोपी अतिक शेख याने शाब्दीक हल्ला करीत थेट तिच्या अंगावरच धाव घेतल्याने दोघांमध्ये झटापट झाली. यावेळी त्याने ‘तुम्ही ** आदिवासी ****, तुमची गावात राहण्याची लायकी नाही, तुम्ही रानात जावून रहा..’ असे म्हणतं ‘त्या’ महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली आणि एखाद्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्यही केले. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार कोणीतरी मोबाईलमध्ये कैदही केला.

या घटनेनंतर पीडित आदिवासी महिलेने घारगाव पोलीस ठाण्यात जावून सदरचा प्रकार सांगितला. या प्रकरणातील गांभीर्य विचारात न घेता पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत ‘त्या’ महिलेची बोळवण केली. त्यामुळे महिलेला मारहाण करुनही आरोपी मोकाटच राहील्याने शेजारी राहणार्या अन्सारी कुटुंबाची दादागिरी वाढली. त्यांच्या दहशतीखाली वावरत असलेल्या या कुटुंबाची माहिती मिळाल्यानंतर संगमनेरातील काही हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिलेची भेट घेत घारगाव पोलीस ठाणे गाठले. मात्र त्यानंतरही पोलिसांनी दाद दिली नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

या घटनेबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला कळविल्यानंतर शुक्रवारी (ता.5) रात्री उशिराने जैतून गुलशन अन्सारी (रा.सारोळेपठार), तिची मुलगी अलमिरा व जावई अतिक शेख (दोघेही रा.शिंदोडी) अशा तिघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 74, 115 (2), 352, 351 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणारा सारोळ्याचा जावई अतिक शेख याला आज (ता.6) पहाटे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणात एका तरुणाकडून आदिवासी महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण होवूनही घारगाव पोलिसांना त्यामागील गांभीर्य समजले नाही, किंबहुणा पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोप फिर्यादी महिलेसह हिंदुत्त्ववादी संघटनांनी केला आहे. आठ दिवसांपूर्वी घडलेली ही घटना ऐन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आल्याने तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे.

स्थापनेपासून अपवाद वगळता घारगाव पोलीस ठाण्याला आजवर एकही कार्यक्षम पोलीस निरीक्षक लाभलेले नाहीत. या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारणार्या प्रत्येक पोलीस निरीक्षकांवर निष्क्रियता, हप्तेखोरी, अव्यवस्था, मनमानी आणि उद्धट वागणुकीचे आरोप झाले आहेत. त्यामुळे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी संकेत धुडकावून दुय्यम दर्जा असतांनाही पूर्वी स्थानिक गुन्हेशाखेत मर्दुमकी गाजवणार्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यावर भरवसा दाखवला, मात्र काही महिन्यांच्या शांतीकाळानंतर आता त्यांच्या कारकीर्दीतले किस्सेही चर्चेत येवू लागल्याने घारगावची ‘ती’ परंपरा कायम राहणार की काय अशी शंकाही उपस्थित झाली आहे, या प्रकरणाने ती अधिक ठोसही केली आहे.

