संगमनेरात सोळाजणांनी दाखल केले चोवीस अर्ज! दुरंगी लढतीची शक्यता; ‘मनसे’सह ‘वंचित’ आघाडीचा उमेदवारही रिंगणात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विखे-थोरात यांच्या तिसर्‍या पिढीतील राजकीय वारसांच्या वाक्युद्धाने रंगत चढलेल्या निवडणुकीतील उमेदवारी दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ‘हाय-होल्टेज’ ड्रामा झाला. शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखांची भाजपच्या शहराध्यक्षांशी झालेली वादावादी आजच्या दिवसातील लक्षवेधी ठरली. त्याशिवाय कालपर्यंत भाजपकडून तिकिटाची आस लावून बसलेल्या अमोल खताळ यांनी आज शिवसेनेत प्रवेश करुन उमेदवारी अर्ज दाखल केला. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही कोणताही डामडौल न करता निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर येवून आपली उमेदवारी दाखल केली. आज शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीसह महायुती आणि मनसेच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.


गेल्या सात टर्मपासून एकहाती सत्ता असलेल्या संगमनेर विधानसभा मतदार संघात यंदा थोडीफार चुरस निर्माण होवू लागली आहे. सुरुवातीला महायुतीच्या जागावाटपानुसार शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या या जागेवर भाजपचे माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील उमेदवार असतील असे कयास अनेकांनी लावले होते. मात्र सरतेशेवटी अगदी अंतिम क्षणी भाजपमधून उमेदवार आयात करुन शिंदेसेनेच्यावतीने अमोल खताळ यांना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर उतरवण्यात आले आहे.


आज दुपारी काँग्रेसचे दिग्गज नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणताही डामडौल न करता प्रशासकीय भवनात येवून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते जाणता राजा मैदानावर आयोजित सभेसाठी रवाना झाले. तर, त्यानंतर विद्यमान मंत्री राधाकृश्ण विखे-पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावण्यासह खताळ यांचा अर्ज दाखल करतानाही उपस्थिती दर्शवली. आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी थोरात व खताळ या मोठ्या पक्षाच्या उमेदवारांसह मनसेकडून योगेश सूर्यवंशी यांचाही अर्ज दाखल झाला.


तर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अब्दुल अजीज अहमदर शरीफ वोहरा यांनीही यापूर्वीच आपली उमेदवारी दाखल केली आहे. आजच्या शेवटच्या दिवसअखेर संगमनेर विधानसभा मतदारसंघात एकूण 45 व्यक्तिंनी 89 अर्ज खरेदी केले. त्यातील 16 व्यक्तिंचे 24 अर्ज प्राप्त झाले आहेत. संगमनेर मतदारसंघात आजवर दुरंगी लढतच बघायला मिळाली असून प्रत्येकवेळी थोरातांचे मताधिक्क्य वाढतानाही दिसले आहे. यावेळी मात्र निवडणुकीच्या पूर्वी घडलेल्या विविध घडामोडी, एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, दाखल गुन्ह्यातील आरोपींच्या अटक व सुटकेवरुन होणारे राजकारण अशा अनेक अगांनी या निवडणुकीत रंगत भरली जाणार आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दाखल करणार्‍या उमेदवारांमध्ये काँग्रेसच्यावतीने बाळासाहेब थोरात, शिवसेनेकडून अमोल खताळ, वंचितकडून अजीजभाई वोहरा, मनसेकडून योगेश सूर्यवंशी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉककडून भागवत गायकवाड, बसपाकडून सूर्यभान गोरे, आरपीआय (आ.) शशीकांत दारोळे, समता पार्टीकडून भारत भोसले, जयहिंद जय भारत पक्षाकडून अविनाश भोर, भारतीय नवजवान सेनेकडून काळीराम पोपळघट, राष्ट्रीय समाज पक्षाकडून रभाजी खेमनर, लोकशाही पार्टीकडून प्रदीप घुले, तर, अपक्ष म्हणून अजय भडांगे, विठ्ठल घोरपडे, दत्तात्रय ढगे, अल्ताफ शेख यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

  

Visits: 28 Today: 1 Total: 114150

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *