ग्रामपंचायत निवडणुक : जिल्ह्यात सरासरी 83 टक्के मतदान! ‘थोरात’ विरुद्ध ‘विखे’ असा थेट संघर्ष असलेल्या ‘त्या’ चौदा ग्रामपंचायतींसाठी 84 टक्के मतदान..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील ‘छोटी विधानसभा’ समजल्या जाणार्या आणि गावच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार्या पंचायत समित्यांच्या मतदानाची प्रक्रीया आज अलोट उत्साहात पार पडली. संगमनेर तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील एकूण चौदा तालुक्यात आज 705 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यात श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधीक 87.32 टक्के तर सर्वात कमी जामखेड तालुक्यात 77.50 टक्के मतदानाची नोंद झाली. संगमनेर तालुक्यातही मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायतींच्या 696 सदस्यांसाठी आज 84.13 टक्के मतदारांनी आपला कौल पेटीबंद केला. कोविडच्या सावटाखाली इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पार पडलेल्या या निवडणुकीसाठी जिल्ह्यात सरासरी 82.73 टक्के मतदान झाले. स्थानिक पातळीवरील किरकोळ वादावादी वगळता कोठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद झाली नाही.
जिल्ह्यातील चौदा तालुक्यांतील एकूण 705 ग्रामपंचायतींच्या सदस्य निवडीसाठी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रीयेला सुरुवात झाली. संगमनेर तालुक्यातील सर्वाधीक 90 आणि राहाता तालुक्यातील सर्वात कमी 19 ग्रामपंचायतींसाठी अगदी पहिल्या सत्रापासून मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. दिवसभर मतदान केंद्रांबाहेर लागलेल्या रांगा, त्यामुळे सायंकाळी साडेपाचनंतरही सुरु असलेली मतदान प्रक्रीया असे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळाले. प्रशासनाने कोविडच्या सावटाखाली पार पडत असलेल्या लोकशाहीच्या उत्सवाची जय्यत तयारी केली होती. शेवटच्या अर्धातासात कोविड बाधितांनाही मतदानाची मुभा देण्यात आली होती, यावरुन ही गोष्ट सहज लक्षात येईल.
संगमनेर तालुक्यातील एकूण 94 पैकी चार पंचायत समित्या बिनविरोध झाल्याने आज उर्वरीत नव्वद ग्रामपंचायतींमधील 696 सदस्य संख्येसाठी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रीया राबविण्यात आली. शिर्डी विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या तालुक्यातील 26 गावांपैकी चौदा तर अकोले विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या 31 पंचायत समित्यांमध्येही आज मतदान पार पडले. यातील प्रवरा परिसरातील चौदा ग्रामपंचायतींकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून होते. ही गावे शिर्डी मतदार संघाला जोडलेली असल्याने येथे ‘थोरात विरुद्ध विखे’ असा थेट संघर्ष पाहायला मिळतो.
या चौदा गावांमध्ये सरासरी 84.35 टक्के मतदान नोंदविले गेले आहे. यात सर्वाधीक ओझर बु.मध्ये 94.41 टक्के तर सर्वाधीक कमी खळी ग्रामपंचायतीसाठी 60 टक्के मतदान झाले. उर्वरीत गावांमध्ये औरंगपूर येथे 93.36 टक्के, चिंचपूर खुर्द मध्ये 90.89 टक्के, दाढ खुर्दमध्ये 90 टक्के, दाढ खुर्दमध्ये 90 टक्के, मनोलीमध्ये 89 टक्के, प्रतापपूरमध्ये 88.71 टक्के, शेडगाव येथे 87.73 टक्के, कनोली येथे 85 टक्के, आजमपूर येथे 84.20 टक्के, पानोडी येथे 82.38 टक्के, शिबलापूर येथे 81.71 टक्के, झरेकाठी येथे 80.20 टक्के व चणेगाव येथे 78.68 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ग्रामपंचायतींसाठी आज झालेल्या मतदानात जिल्ह्यात सर्वाधीक मतदान श्रीगोंदा तालुक्यात नोंदविले गेले. येथील 58 पंचायत समित्यांसाठी 1 लाख 17 हजार 21 मतदारांपैकी एकूण 1 लाख 2 हजार 187 जणांनी (87.32 टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला. संगमनेर तालुक्यातील 90 पंचायत समित्यांसाठी 1 लाख 67 हजार 911 मतदारांपैकी एकूण 1 लाख 41 हजार 262 (84.13 टक्के) मतदारांनी आपला हक्क बजावला. अकोले तालुक्यातील 36 ग्रामपंचायतीसाठी 65 हजार 913 मतदारांपैकी एकूण 53 हजार 655 जणांनी (81.40 टक्के), कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीसाठी 63 हजार 872 मतदारांपैकी एकूण 53 हजार 493 जणांनी (82.18 टक्के), श्रीरामपूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीसाठी 81 हजार 400 मतदारांपैकी एकूण 65 हजार 750 जणांनी (80.77 टक्के), राहाता तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीसाठी 70 हजार 380 मतदारांपैकी एकूण 56 हजार 4470 जणांनी (80.20 टक्के), राहुरी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीसाठी 90 हजार 392 मतदारांपैकी एकूण 73 हजार 504 जणांनी (81.32 टक्के), नेवासा तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीसाठी 1 लाख 20 हजार 810 मतदारांपैकी एकूण 98 हजार 537 जणांनी (81.56 टक्के),
नगर तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीसाठी 1 लाख 23 हजार 809 मतदारांपैकी एकूण 1 लाख 583 जणांनी (81.24 टक्के), पारनेर तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीसाठी 1 लाख 38 हजार 355 मतदारांपैकी एकूण 1 लाख 17 हजार 289 जणांनी (84.77 टक्के), पाथर्डी तालुक्यातील 75 ग्रामपंचायतीसाठी 1 लाख 24 हजार 766 मतदारांपैकी एकूण 1 लाख 2 हजार 398 जणांनी (82.07 टक्के), शेवगाव तालुक्यातील 48 ग्रामपंचायतीसाठी 75 हजार 292 मतदारांपैकी एकूण 62 हजार 790 जणांनी (83.40 टक्के), कर्जत तालुक्यातील 54 ग्रामपंचायतीसाठी 1 लाख 3 हजार 704 मतदारांपैकी एकूण 88 हजार 189 जणांनी (85 टक्के) आणि जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी 67 हजार 368 मतदारांपैकी एकूण 52 हजार 212 जणांनी (77.50 टक्के) आपला मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील एकूण 705 ग्रामपंचायतींसाठी 14 लाख 10 हजार 993 मतदारांपैकी 11 लाख 67 हजार 256 मतदारांनी (82.73 टक्के) मतदानाचा हक्क बजावला.
कोविडच्या संकटाला विसरुन मतदार उत्साहाने घराबाहेर…
संगमनेरसह जिल्ह्यात अद्यापही दररोज कोविड बाधित आढळण्याची श्रृंखला कायम आहे. त्यातही शहरीभागापेक्षा ग्रामीण क्षेत्रात कोविडचा प्रादुर्भाव सरासरी अधिक आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीत दिसून येईल असा काही राजकीय जाणकारांचा अंदाज होता. मात्र कोविडच्या सावटाखाली राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या इतक्या मोठ्या प्रमाणातील सार्वत्रिक निवडणुकीने महाराष्ट्रीयन जनतेने कोविडची भिती फेकून दिल्याचेच दर्शन घडवले. आज निवडणूका पार पडल्या, उद्या जिल्ह्यातील बारा केंद्रांवर प्रत्येकी शंभर या सरासरीने बाराशे आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण केले जाणार आहे, तर 18 जानेवारीरोजी जिल्ह्यातील 705 गावांमध्ये निवडणुकांच्या निकालानंतर गुलाल उधळला जाणार आहे.