संगमनेर तालुका पोहोचला कोविडच्या सहा हजारी मनसबीजवळ! वर्षाच्या अखेर सरासरीत मोठी घट; मात्र काळजी घेण्याची नितांत गरज
नायक वृत्तसेवा, संगमनेर
एप्रिलमध्ये सुरु झालेला तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव वर्षाच्या अखेरीसही कायम आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील अखेरच्या आठवड्यात दररोज आढळणारी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात खालावल्याचे चित्र दिसत आहे. चालू महिन्यातील पहिल्या दहा दिवसांत तालुक्याच्या रुग्णसंख्येत दररोज सरासरी 34 रुग्णांची भर पडत असतांना शेवटच्या नऊ दिवसांत मात्र सरासरी अवघे बावीस रुग्ण समोर येत असल्याने संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच शहरात आढळून येणार्या रुग्णांची संख्या आता जवळपास नगण्य झाली आहे. मंगळवारी शहरातील अवघ्या दोघांसह तालुक्यात एकूण 25 रुग्ण समोर आले. त्यामुळे तालुका कोविडच्या सहा हजारी मनसबीजवळ पोहोचतांना रुग्णसंख्या आता 5 हजार 976 वर जावून पोहोचली आहे.
गेल्या महिन्यात काहीशा उंचावलेल्या रुग्णसंख्येच्या सरासरीने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही वाढीचा सिलसिला कायम ठेवला होता. त्यामुळे या महिन्यातही रुग्णसंख्येचा उच्चांक होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत दररोज सरासरी 33.7 रुग्णगतीने 337 रुग्णांची भर पडली. त्यात शहरी भागातील 77 तर ग्रामीणभागातील 260 रुग्णांचा समावेश होता. नंतरच्या दहा दिवसांत एकूण रुग्णसंख्येची सरासरी खालावून 24.2 वर आली. तर ग्रामीण रुग्णसंख्येच्या सरासरीतही मोठी घट नोंदविली गेली. या दहा दिवसांत एकूण रुग्णसंख्येत 242 जणांची भर पडली, त्यात शहरातील अवघे 73 तर ग्रामीणभागातील 169 रुग्ण होते.
पहिल्या आणि दुसर्या दहा दिवसांत तुलनात्मकपणे एकूण रुग्णसंख्येच्या सरासरीत 9.2, शहरी रुग्णसंख्येत 0.4 तर ग्रामीण रुग्णसंख्येत सरासरी 9.1 इतकी घट नोंदविली गेल्याने त्याचा परिणाम वाढत गेलेला प्रादुर्भाव पुन्हा नियंत्रणात येण्यात झाला. सरासरीत घट होण्याची ही श्रृंखला वर्षाच्या आणि महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसांतही कायम असल्याचे दिसून आले असून गेल्या नऊ दिवसांत सरासरी 22 रुग्णगतीने एकूण संख्येत 198 रुग्णांची भर पडली आहे. त्यात शहरी भागात दररोज 4.67 सरासरीने 42 रुग्ण तर ग्रामीण रुग्णसंख्येत दररोज 17.33 सरासरीने 156 रुग्णांची वाढ झाली. महिन्याभरातील 29 दिवसांचा विचार करता तालुक्यात 26.79 च्या सरासरीने आत्तापर्यंत 777 रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
मंगळवारी (ता.29) तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 25 रुग्णांची भर पडली. यात शहरातील अभंग मळा परिसरातील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक व कुरण रोडवरील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील 23 जणांमध्ये निमज येथील 56 वर्षीय इसम, 32 वर्षीय महिला आणि 14 व 9 वर्षीय मुले, आश्वी खुर्द येथील 64 व 34 वर्षीय महिलांसह 29 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 44 वर्षीय इसम, पिंपळगाव देपा येथील 60 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 12 व 9 वर्षीय बालिका, हंगेवाडी येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक.
घुलेवाडी येथील 45 व 40 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 15 वर्षीय मुलगा, गुंजाळवाडी येथील 42 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण आणि 15 वर्षीय मुलगा, देवगाव येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पानोडी येथील 60 वर्षीय महिला, चिखली येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि सुकेवाडी येथील 60 वर्षीय महिलेसह 29 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. यातील चौदा जणांवर रुग्णालयांमध्ये तर अकरा जणांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. मंगळवारी तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 25 जणांची भर पडल्याने तालुका आता 5 हजार 976 रुग्णसंख्येवर जावून पोहोचला आहे.
दिवाळीपासून वाढलेल्या तालुक्याच्या कोविड रुग्णसंख्येला वर्ष सरतांना समाधानकारक ब्रेक लागला आहे. अर्थात अद्यापही कोविड संक्रमित रुग्ण समोर येण्याची श्रृंखला पूर्णतः थांबलेली नसल्याने प्रादुर्भावाचा धोका कायम आहे. त्यातच सध्या ग्रामपंचायत निवडणूकांचा धुराळा उडालेला असल्याने याकडे दुर्लक्ष झाल्यास कमी होत चाललेल्या रुग्णसंख्येत अचानक वाढ होण्याची शक्यताही कायम असल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मुखपट्टीचा (मास्क) वापर करण्यासह वारंवार हात धुण्याची अथवा सॅनिटाईज करण्याची सवय कायम ठेवण्याची नितांत गरज आहे.287