गोधेगावमध्ये शेतकरी कुटुंबांत झालेल्या वादात एकाचा खून घटनेनंतर संशयित आरोपी पसार; पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
शेतबांधाच्या रस्त्यावरुन दोन शेतकरी कुटुंबात झालेल्या वादातून एका चाळीसवर्षीय शेतकर्याच्या डोक्यात कुर्हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.29) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे घडली आहे. यातील संशयित आरोपी घटनेनंतर पसार झाल्याची माहिती पोलिसांकडून समजली आहे.

गंगाथडीलगत असलेल्या गोधेगाव शिवारात मयत दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे व महेश भिंगारदे यांची शेजारी शेजारी शेतवस्ती व जमिनी आहेत. दोन दिवसांपूर्वी भिंगारदे यांच्या उसाला तोड आली. यावेळी पूर्वापार असलेला बांधावरील वहिवाटीच्या रस्त्यावरून या दोन कुटुंबियांत वाद झाला. तो काही ग्रामस्थांच्या मध्यस्थीने मिटविण्यात आला.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी याच रस्त्यावरून वादावादी झाली. वादवादीचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी भिंगारदे यांच्या एका मुलाने दत्तात्रय ठोंबरे त्यांच्या डोक्यात कुर्हाडीचा घाव मारल्याचे समजते. कुर्हाडीचा घाव वर्मी लागल्याने ठोंबरे जागीच कोसळले. दरम्यान, जखमी ठोंबरे यांना उपचारासाठी प्रथम नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. यातील सर्व संशयित आरोपी घटनेनंतर फरार झाले असून मयत ठोंबरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. नेवासा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

