शरद पवार पंतप्रधान होण्याची कार्यकर्त्यांची इच्छा ः काळे कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
देशात शेतकर्यांपासून ते उद्योजकांपर्यंत आणि कामगारांपासून ते शेतमजुरांपर्यंत विविध घटक अडचणीत सापडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणांचा हा परिपाक आहे. या अडचणींतून देशाला प्रगतीकडे नेण्याची कुवत फक्त ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात आहे. ते पंतप्रधान व्हावेत, अशी आपणा सर्वांची इच्छा आहे, असे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले.
![]()
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष जितेन सरडे, वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे उपस्थित होते. काळे म्हणाले, प्रत्येक आपत्तीतून देशाला सावरण्यासाठी पवार यांचे मार्गदर्शन उपयोगी पडते. केंद्रात कुठल्याही पक्षाचे सरकार असले, तरी त्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेतले जाते. हे त्यांच्या नेतृत्वाचे मोठेपण आहे. केंद्रात काही निर्णय चुकीचे झाल्याने अर्थव्यवस्थेची गती मंदावली. देशाची विस्कटलेली घडी ते पुन्हा बसवू शकतात. पक्षाचे विचार घराघरांत पोचविण्याचे व आगामी निवडणुकांत पक्षाला विजय मिळवून देऊन त्यांना वाढदिवसाची भेट देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन काळे यांनी केले.

वाघमारे म्हणाले की, पवार यांचा प्रत्येक वाढदिवस कुठल्या तरी राष्ट्रीय समस्येचे निराकरण करण्याचा कार्यक्रम घेऊन साजरा केला जातो. यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी, कारभारी आगवण, पद्मकांत कुदळे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, रमेश गवळी, कृष्णा आढाव, नवाज कुरेशी, प्रतिभा शिलेदार, रेखा जगताप, वैशाली आभाळे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे आदि उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा येत्या 12 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. तालुक्यातील महिला बचतगटांना 39 लाख 55 हजार रुपयांचे कर्ज वितरण करून या वाढदिवसाच्या पूर्वतयारीला आम्ही प्रारंभ केला आहे. ते पंतप्रधान व्हावेत, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे.
– आमदार आशुतोष काळे (अध्यक्ष-साईबाबा संस्थान)
