काळाचा क्रूर घाला..! दोन सख्ख्या भावांचा खाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी अंत!! ​संगमनेर तालुक्यातील तिगावची हृदयद्रावक घटना; दहा महिन्यांपूर्वीच हरपले होते पित्याचे छत्र.. 

​नायक वृत्तसेवा, संगमनेर
निसर्गाचा लहरीपणा आणि नियतीचा क्रूर खेळ काय असतो, याचा एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारा अनुभव संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे आला आहे. आधीच पित्याचे छत्र हरपलेल्या एका माऊलीच्या पदरी नियतीने असे कधीही न भरुन निघणारे अथांग दुःख दिले आहे, ज्याचा विचार करूनही अंगावर काटा उभा रहावा. तिगाव येथील दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना आज शुक्रवारी (दि. २२) सायंकाळच्या सुमारास घडली.

​महेश गोरक्षनाथ सानप (वय १८) आणि ओंकार गोरक्षनाथ सानप (वय १४) अशी या दोन मृत भावांची नावे आहेत. अवघ्या १० महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याने हे कुटुंब आधीच संकटात होते, त्यातच आता घरातील दोन्ही तरुण मुले एकाच वेळी देवाघरी गेल्याने सानप कुटुंबाचा मुख्य आधारच हिरावला गेला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

​तिगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडाच्या खाणी आहेत. या खाणींमधील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गावातील आणि परिसरातील मुले अनेकदा या ठिकाणी पोहण्यासाठी जात असतात. शुक्रवारी दुपारच्या सुमारास महेश आणि ओंकार हे दोघे सख्खे भाऊही याच खाणीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा आणि खाणीच्या खोलीचा अंदाज चुकल्याने  दोघेही पाण्यात बुडू लागले. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

​या घटनेची माहिती मिळताच तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर सानप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही भावांना पाण्याबाहेर काढले. दोघांचेही प्राण वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती या दोन्ही कोवळ्या जीवांना मृत घोषित केले. हा निरोप मिळताच रुग्णालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा कंठ दाटून आला.

​नियतीने सानप कुटुंबावर केलेला हा आघात अत्यंत क्रूर आहे. अवघ्या १० महिन्यांपूर्वी या मुलांच्या वडिलांचे छत्र हरपले होते. त्या दुःखातून कुटुंब सावरत नाही तोच, आईच्या डोळ्यादेखत तिच्या दोन्ही तरुण मुलांचा अंत झाला. या माऊलीचे सांत्वन कसे करावे, हाच प्रश्न संपूर्ण गावाला पडला आहे.

​घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरुन संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. दोन सख्ख्या भावांचा अशा रीतीने अकाली मृत्यू झाल्याची बातमी पसरताच तिगाव, तळेगाव आणि संपूर्ण संगमनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबावर अवघ्या १० महिन्यांच्या कालावधीत झालेल्या या लागोपाठ आघातांमुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, अंत्यविधीच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले होते. या घटनेमुळे खाणींमधील साचलेल्या पाण्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Visits: 5 Today: 5 Total: 1827577

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *