संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ! भरवस्तीत घरफोडीच्या घटना; सर्वसामान्यांसह व्यापार्‍यांमध्ये दहशत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांसह चोर्‍या, घरफोड्या, सोनसाखळ्या लांबविण्याच्या प्रकारांसह गुन्हेगारीचा स्तर उंचावला आहे. अशा घटनांचे तपास तर दूरच मात्र पोलिसांकडून गुन्ह्यांची माहितीच लपविण्याचे प्रकार सुरु झाल्याने मनोबल वाढलेल्या चोरट्यांनी आता भरवस्त्यांमध्येही शिरकाव केला आहे. आज पहाटे असाच प्रकार समोर आला असून शहरातील गजबजलेल्या भागांमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालीत चार ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या चारही घटनांमध्ये सुमारे तीन लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल लांबविण्यात आला असून भरवस्तीत चोरट्यांचा उच्छाद सर्वसामान्यांसह व्यापारी वर्गात दहशत निर्माण करणारा ठरला आहे. वाढत्या चोरीच्या घटना पाहता पोलिसांनी नागरिकांना दिलासा देणे अपेक्षित असताना पोलिसांकडून मात्र तक्रारदारांचीच उलटतपासणी केली जात असल्याने शहरात चोरट्यांच्या दहशतीसह पोलिसांविषयी संतापही वाढू लागला आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या घटना आज (ता.10) पहाटे अडीच ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान शहरालगतच्या घोडेकर मळा, पंम्पींग स्टेशनसह कासारवाडीत घडल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत घोडेकर मळ्यात राहणार्‍या अर्जुन काठे यांचे दाट लोकवस्तीत असलेले घर चोरट्यांनी लक्ष्य केले. काठे मंगळवारी लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेले होते, हिच संधी साधून चोरट्यांनी आज पहाटे त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तत्पूर्वी चोरट्यांनी काठे यांचे बंधू सयाजी यांच्या शेजारीच असलेल्या घराला बाहेरुन कडी लावली, यावरुन चोरट्यांना या परिसराची आणि तेथील रहिवाश्यांची पूर्वमाहिती असल्याचेही स्पष्ट होते.

घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी मनसोक्त उचकापाचक करीत अर्जुन काठे यांच्या तिजोरीतील सुमारे 30 हजार रुपयांच्या रोकडसह तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, त्यांच्या मुलीच्या बँक कलेक्शनचे सुमारे 20 हजार रुपये असा एकूण सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला. पोलिसांच्या मुखी सोन्याचे दर 15 हजार रुपये तोळा असल्याने प्रत्यक्ष गुन्हा दाखल होताना मुद्देमालाचे मूल्य कमी होण्याची दाट शक्यता आहे. अर्जुन काठे यांच्या घरात असलेला मुद्देमाल लुटल्यानंतर चोरट्यांना आपला मोर्चा लगतच्या पंम्पींग स्टेशन परिसराकडे वळवला. तेथे राहणार्‍या ज्ञानेश्वर हजारे यांच्या स्वयंपाक घराचा दरवाजा तोडून चोरटे आत घुसले. यावेळी हजारे खासगी नोकरीच्या ठिकाणी रात्रपाळीवर गेलेले होते, तर त्यांच्या कुटुंबातील अन्य माणसं वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये झोपलेले होते. येथे मात्र चोरट्यांना काहीच मिळाले नाही.

यानंतरच्या दोन घटना कासारवाडी गावातून समोर आल्या असून पहिल्या घटनेत पहाटे सव्वा तीनच्या सुमारास गावातील शालिनी रुपवते यांचे ब्युटी पार्लरचे दुकाने फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील सुमारे दहा हजार रुपयांच्या रोख रकमेसह लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचे पदकं व दोन चांदीच्या पट्ट्या घेवून पोबारा केला. याच गावातील दुसर्‍या घटनेत चोरट्यांनी आपला कार्यभाग उरकून पुणे-नाशिक महामार्गाकडे जाताना शिवाजी पाटीलबा गुंजाळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची मनसोक्त उचकापाचक केली. शिवाजी गुंजाळ सध्या पुण्यात वास्तव्यास असून आठ दिवसांतून एकदा ते कासारवाडीत येत असतात, त्यामुळे त्यांच्या घरातून नेमका किती ऐवज चोरीला गेला याबाबतची माहिती प्राप्त झालेली नाही.

घोडेकर मळ्यातील आपल्या घरी चोरी झाल्याची माहिती भावाकडून समजल्यानंतर अर्जुन काठे यांनी सकाळी 10 वाजता शहर पोलीस ठाण्यात जावून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तेथे हजर असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांनी तुमच्याकडे इतके पैसे कोठून आले?, त्याची पावती आहे का?, बँक कलेक्शनचे पैसे घरात कसे ठेवले?, सोन्याच्या अंगठ्या खरोखरी चोरीला गेल्यात का?, त्या कधी व कोठून घेतल्या होत्या?, त्याची पावती आहे का? अशा एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती करीत काठे यांचीच उलटतपासणी सुरु केली. त्यामुळे घाबरलेल्या काठे यांनी एका पत्रकाराला फोन करुन घडत असलेल्या प्रकाराबाबत सांगितले. संबंधित पत्रकाराने पोलीस ठाण्यात जावून ‘त्या’ अधिकार्‍याला जाब विचारला असता त्यांनी ‘साहेब नगरला मीटिंगसाठी गेले आहेत’ असे अजब उत्तर दिले. यावरुन पोलिसांच्या कामकाजासह त्यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शहरात पोलिसांच्या कार्यपद्धतीवरुन आता संताप खद्खदू लागला आहे.

मागील काही दिवसांत संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी घटनांचा स्तर झपाट्याने उंचावला असून शहरात अवैध व्यवसायांनी पुन्हा जोर धरला आहे. त्यातच आता शहराच्या चौफेर चोरट्यांच्या टोळ्यांकडून दररोज कोणती न् कोणती घटना समोर येत असल्याने सामान्य संगमनेरकरांसह शहरातील व्यापारी वर्गही दहशतीखाली आला आहे. त्यासाठी सोमवारी (ता.9) सायंकाळी शहरातील व्यापार्‍यांनी व्यापारी असोसिएशन येथे बैठकीचेही आयोजन केले होते. या बैठकीला शहरातील व्यापार्‍यांसह पोलीस निरीक्षक भगवान मथुरेही उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी नेहमीचे रडगाणे वाजवून व्यापार्‍यांनीच चोर्‍या थांबवण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत त्यांना उपदेश दिले. ही बैठक संपून चार/पाच तासांचा कालावधी उलटायच्या आतच वरील चार ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला. यावरुन संगमनेर पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक संपुष्टात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.


पोलिसांनाही तुटक्या पुलाचा तिटकारा..!
साई मंदिराकडे जाणारा पूल खचल्याने एकीकडे त्या भागातील रहिवाशांना मोठ्या अडचणी सहन कराव्या लागत असताना आता या पुलावरुन पंम्पींगच्या दिशेने गस्तीसाठी जाणारे पोलिसांचे वाहन हेलपाटा पडत असल्याने फिरकतच नसल्याचे तेथील रहिवाशांकडून समोर आले आहे. त्याचाच फायदा घेवून चोरट्यांनी आज पहाटे ‘गस्त मुक्त’ असलेल्या घोडेकर मळा, पंम्पींग स्टेशन व कासारवाडी शिवारात मनसोक्त उच्छाद मांडून चार ठिकाणी घरफोड्या करुन पोलिसांनाच आव्हान दिले आहे.


तक्रारदाराचीच उलट तपासणी..!
आपली लक्तरं लपवण्यासाठी वरीष्ठ अधिकार्‍यांनी पत्रकारांपासून गुन्ह्यांची माहिती लपविण्याची तंबी दिल्याचा प्रकार ताजा असतांनाच आता चक्क चोरीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तक्रारदारांचीच उलट तपासणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन शहरात सुरु असलेल्या गुन्हेगारी घटनांना पोलिसांचेच तर पाठबळ नाही ना? असाही संशय निर्माण झाला असून पोलिसांची ही भूमिका अतिशय धक्कादायक आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अशा धक्कादायक प्रकारांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

Visits: 172 Today: 2 Total: 1103556

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *