धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता! संगमनेरच्या अतिरीक्त मुख्य महानगर दंडाधिकार्यांचा निर्वाळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगणक विक्रेत्याकडून घेतलेल्या सामानाच्या मोबदल्यात देय असलेल्या रकमेचा धनादेश दिला गेला, मात्र तो न वठल्याने संबंधित विक्रेत्याने चलनक्षमपत्रक कायद्यान्वये न्यायालयास दावा दाखल केला. त्यावर दोन्ही बाजूने युक्तीवाद, पुराव्यांची मांडणी आणि अशा प्रकरणात यापूर्वी वरीष्ठ न्यायालयांनी दिलेले निकाल यांचा सारासार विचार करुन संगमनेरच्या अतिरीक्त मुख्य महानगर दंडाधिकार्यांनी सदरचा दावा फेटाळला आहे. गेल्या काही महिन्यात अशाच काही प्रकरणात धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी कारावास आणि दंडात्मक शिक्षा झाल्याची काही प्रकरणे समोर आली, या प्रकरणात मात्र फिर्यादीकडून आवश्यक पुरावे दाखल न झाल्याने त्याला सुमारे सव्वा लाख रुपयांहून अधिक रकमेवर पाणी सोडावे लागले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संगमनेरातील शार्प कॉम्प्युटर्स यांच्या संगणक व त्यासंबंधी सामानाच्या दुकानातून राहाता येथील बत्राज् कॉम्युटर्स यांनी संगणकासह अन्य साहित्याची खरेदी केली होती. त्यापोटीची 1 लाख 26 हजार 400 रुपयांची रक्कम त्यांनी धनादेशाद्वारे संबंधितांना देऊ केली. मात्र धनादेशाच्या तारखेला तो संबंधिताने आपल्या बँकेच्या खात्यात भरला असता ‘पेमेंट स्टँडबाय ड्रॉव्हर’ असा शेरा मारुन न वठता माघारी आला. संबंधिताकडून मिळालेल्या धनादेशाद्वारा आपली रक्कम न मिळाल्याने शार्प कॉम्प्युटर्स यांनी याबाबत संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकार्यांच्या न्यायालयात राहाता येथील बत्राज् कॉम्प्युटर्स यांच्या विरोधात चलनक्षमपत्रकाच्या कलम 138 अन्वये दावा दाखल केला.

या प्रकरणात फिर्यादी व आरोपी या दोहींकडून न्यायालयासमोर सादर झालेली कागदपत्रे, दोन्ही बाजूंनी अशा प्रकरणात वरीष्ठ न्यायालयाकडून आलेले निकाल आणि त्यांना अनुसरुन जोरदार युक्तीवाद करण्यात आला. यावेळी फिर्यादी पक्षाकडून करण्यात आलेला युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे पुरेसे नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यातून आरोपीकडून फिर्यादीस 1 लाख 26 हजार 400 रुपयांची रक्कम कायदेशीर देणे असल्याचे सिद्ध न झाल्याने मुख्य महानगर दंडाधिकारी एस. यू. महादर यांची धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी दाखल प्रकरणात राहाता येथील बत्राज् कॉम्प्युटर्स यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात बचाव पक्षाकडून अॅड. राजू खरे यांनी कामकाज पाहिले.
