ओबीसी प्रवर्गाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा आंदोलन ः मंडलिक
ओबीसी प्रवर्गाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा आंदोलन ः मंडलिक
अकोले तहसीलदारांना ओबीसी महासभा आणि समता परिषदेचे निवेदन
नायक वृत्तसेवा, अकोले
ओबीसी प्रवर्गातील समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा शासनाला देण्यात आल्याचे अखिल भारतीय ओबीसी महासभेचे अकोले तालुकाध्यक्ष तथा समता परिषदेचे अकोले शहराध्यक्ष नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी सांगितले. यासंदर्भात मंगळवारी (ता.3) तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप-मुख्यमंत्री अजित पवार, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ओबीसी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना देखील पाठविण्यात आल्याचे मंडलिक यांनी स्पष्ट केले. या निवेदनात म्हंटले आहे की, आमच्या ओबीसी समाजाच्या बर्याच मागण्या शासन दरबारी अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्या पूर्ण झाल्याशिवाय ओबीसी समाजाची प्रगती होऊ शकत नाही. महासंघाच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आमचे आरक्षण अबाधित ठेवावे, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, विविध स्पर्धा परीक्षा उदा. एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती व इतर नोकर भरती परीक्षा तात्काळ घेण्यात याव्यात, ओबीसी समाजाला राजकीय, सामाजिक, आर्थिक न्याय मिळविण्यासाठी स्वतंत्र आर्थिक कोष निर्माण केला पाहिजे, खाजगीकरण बंद करावे अथवा खाजगी क्षेत्रामध्ये ओबीसी, एस.सी., एस.टी. यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळावे, मंडल कमिशन पूर्णतः लागू करावे, न्यायपालिकांचे आरक्षण लागू करावे, ओबीसीच्या महाज्योती संस्थेसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात यावी, ओबीसी महामंडळाची तसेच खादी ग्रामोद्योगची कर्ज माफ करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफ करावी, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्या संस्था यामध्ये देखील ओबीसी बांधवांना सामाजिक, राजकिय नोकरीत आरक्षण मिळावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
सदर निवेदनावर प्रमोद मंडलिक, भाऊसाहेब मंडलिक, मीनानाथ पांडे, रामनाथ काकड, भाऊसाहेब वाकचौरे, संतू भरीतकर, रामनाथ मुर्तडक, दत्ता रत्नपारखी, बाळासाहेब वाकचौरे, शांताराम काळे, किरण चौधरी, वसंत बाळसराफ, अमोल बोर्हाडे, अनिल कोळपकर, सोमनाथ बाळसराफ, प्रकाश सासवडे, शिंदे व चौधरी आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.