माशांच्या भाजीसाठी ऊसतोड मजुराने केला पत्नीचा खून
माशांच्या भाजीसाठी ऊसतोड मजुराने केला पत्नीचा खून
नायक वृत्तसेवा, राहुरी
माशांची भाजी न केल्याने डोक्यात दगड घालून ऊसतोड मजुराने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील कुक्कटवेढे येथे सोमवारी (ता.2) रात्री घडली आहे. गंगाबाई बद्री चव्हाण (वय 41) असे मृत महिलेचे नाव आहे.
आरोपी बद्री याने सोमवारी रात्री मासे आणून पत्नीला त्याची भाजी करायला सांगितले. मात्र, सोमवार असल्याने पत्नीने माशांची भाजी करण्यास नकार दिला. त्यावरून दोघांत कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात आरोपी बद्रीने पत्नी गंगाबाईला कोपीतून ओढत बाहेर नेले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत डोक्यात दगड घालून खून केला. कुक्कटवेढे येथे त्यांच्या कोपीजवळ मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या बाजूला पाण्याच्या डबक्याजवळ अर्धनग्न अवस्थेत मंगळवारी (ता.3) सकाळी गंगाबाईचा मृतदेह आढळला. अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुध नोपाणी, राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. याबाबत त्यांचा मुलगा पृथ्वीराज बद्री चव्हाण (वय 18) याच्या फिर्यादीवरून, आईचा खून केल्याप्रकरणी आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी तिचा आरोपी पती बद्री फुला चव्हाण (वय 46, रा.कळनकी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद) यास अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे समजते.