राजूर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयात तेवीस लाखांचा अपहार वरीष्ठ लिपिकाने महिला प्रकल्प अधिकार्‍यांच्या केल्या खोट्या सह्या

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील राजूर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील वरीष्ठ लिपिकाने महिला प्रकल्प अधिकार्‍यांच्या खोट्या सह्या करून 23 लाख 9 हजार रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. याबाबतची लेखी फिर्याद राजूर पोलिसांकडे प्रकल्प अधिकारी भारती सातळकर यांनी दिली आहे. मात्र, संबंधित आरोपी फरार आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की राजूर येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून 2020 पासून नोकरी करते. माझे कार्यालयात वरीष्ठ सहाय्यक लेखा एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प राजूर येथे दिलीप लहानू डोखे हे कार्यरत होते. त्यांच्याकडील दप्तर तपासणीसाठी मागितले असता ते टाळाटाळ करत असल्याने त्यांच्या कामाबाबत मला संशय आला. त्या दरम्यान मला प्रशिक्षणासाठी अमरावती येथे जावे लागल्याने मला त्यांची तपासणी सखोल करता आली नाही.

ऑक्टोबर 21 मध्ये प्रकल्प अधिकारी कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांना समजले, की वरीष्ठ सहाय्यक लेखापरीक्षक दिलीप लहानू डोखे यांची बढती होऊन बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नवीन वरीष्ठ सहाय्यक लेखापाल सविता वाजे येथे हजर झाल्या. त्यांनी माझ्याकडे तोंडी तक्रार केली, की तत्कालीन वरीष्ठ सहाय्यक लेखा परिपूर्ण कार्यभार देत नसल्याने त्यांना काम करताना अडचण येत आहे, असे सांगितल्याने सातळकर यांनी फोनवर त्यांना परिपूर्ण कार्यभार द्या असे सांगितले असता, मी कार्यभार परिपूर्ण देतो असे उडवाउडवीचे उत्तर दिले.

कामकाजाबाबत जाऊन स्टेटमेंट काढले तेव्हा समजले, की तत्कालीन वरीष्ठ सहाय्यक लेखा दिलीप डोखे यांच्या अकाउंटवर 2 लाख 50 हजार 900 रुपये कार्यालयाचे बँक खात्यावरून जमा केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मी त्यांना फोन केला, की तुमच्या अकाउंटवर कार्यालयातून एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचे दिसत आहे. त्याबाबत आपल्याकडे काही माहिती आहे का, त्यावर त्यांनी सांगितले की नजरचुकीने स्टेटमेंटला दिसत असेल. पण शासनाकडून मला असली कुठलीही रक्कम मिळाली नाही, असे उत्तर दिले. त्यावर मी त्यांना लगेच माझ्यासोबत ऑफिसला येऊन कोणत्या व्हाऊचरने सदर रक्कम तुमच्या खाती जमा केली याबाबत मला दाखवा, सीईओ. साहेबांकडे तुमची तक्रार करण्यासाठी जात आहे, असे सांगितले. यानंतर माझी चूक झाली, मला माफ करा. मी त्या चेकवर तुमची डुप्लिकेट सही केली व सदरचा चेक वटवला आहे. मी खोटे पत्र तयार केले होते. अधिकारी म्हणून डुप्लिकेट सही केली आहे. वाजे यांच्या साहाय्याने डोखे यांचे कार्यकाळातील दप्तर तपासणी केली असता त्यांनी 23 लाख 9 हजार रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचे निदर्शनास आले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आदेशाने राजूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आरोपी फरार आहे.

Visits: 14 Today: 1 Total: 114990

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *