संगमनेरातील शिक्षकी पेशाला पुन्हा कलंक! आठ वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाची नजर; ‘व्हॉईट कॉलर’ संस्थाचालकांनी प्रकरण दडपले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारताच्या इतिहासात गुरु-शिष्यांमधील पवित्र नात्याची हजारों उदहारणे असताना शेकडों वर्षांच्या या परंपरेला अलिकडे वारंवार नख लावण्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच शहरातील एका अतिशय नावाजलेल्या शिक्षणसंस्थेतही मंगळवारी असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक प्रकारात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षणासारख्या पवित्रकार्यात शिरलेल्या एका शिक्षकरुपी दानवाची नजर अवघ्या आठवर्ष वयाच्या चिमुरडीवर फिरली. त्याने भरवर्गातून तिला पाण्याची बाटली आणण्यास पाठवून नंतर पाठीमागून जात तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडित मुलीने घरी सांगितल्यानंतर तिच्या पालकांसह नातेवाईकांनी शाळेत जावून शिक्षकी पेशाला कलंक लावणार्‍या ‘त्या’ नराधमाची यथेच्छ धुलाई केली. मात्र सदरचे प्रकरण पोलीस दप्तरी पोहोचताच खोट्या प्रतिष्ठेचा आव आणीत शहरातील ‘व्हॉईट कॉलर’ विश्‍वस्तांचा भरणा असलेल्या संस्थाचालकांनी पीडितेच्या पालकांवरच दबाव आणून त्यांना तक्रार करण्यापासून परावृत्त केले. हा प्रकार शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात वावरणार्‍या ‘विकृत’ मानसिकतेच्या नराधमाला पाठीशी घालणारा असून संस्थेच्या या निर्णयाने शहरातून संताप व्यक्त होवू लागला आहे.


याबाबत विश्‍वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी (ता.6) दुपारी एकच्या सुमारास शहरातील एका नावाजलेल्या शिक्षणसंस्थेत घडला. संगमनेरच्या शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान असलेल्या या संस्थेच्या संचालक मंडळात शहरातील डॉक्टर, वकिल, इंजिनिअर व अनेक प्रतिष्ठीत नागरिकांचा भरणा आहे. अशा शिक्षणसंस्थेत इतका भयानक प्रकार घडल्यानंतर खरेतर शाळा व्यवस्थापनानेच आग्रही भूमिका घेवून या प्रकरणात पीडित विद्यार्थीनीच्या पालकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज होती, प्रत्यक्षात मात्र खोट्या प्रतिष्ठेसाठी संस्थेच्या विश्‍वस्त मंडळाने ‘शाळेची बदनामी’ या दोन शब्दांवर पीडितेच्या पालकांवर दबाव निर्माण करुन त्यांना तक्रार देण्यापासून परावृत्त केले.


सरकारच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संगमनेरातील या प्रतिष्ठीत शिक्षणसंस्थेत शिरलेल्या शिक्षकीवेशातील या नराधमाची नजर शिष्याच्या रुपात त्याच्यासमोर ज्ञानप्राप्तीचे पवित्रकार्य करणार्‍या इयत्ता तिसरीतील निरागस आठवर्षीय विद्यार्थीनीवर पडली. तिच्याकडे पाहून त्याच्या मनातील विकृती उफाळल्याने त्याने भरवर्गातून तिला आपली पाण्याची बाटली भरुन आणून देण्याचे फर्मान सोडून पीडितेला वर्गाबाहेरच्या स्टोअररुममध्ये पाठवले. आपल्या परंपरेत शिक्षकाला गुरुचा दर्जा असल्याने राज्याचा राजाही त्यांचा हुकूम पाळतो असाच संस्कार आपल्या सर्वांवर झालेला आहे. त्याप्रमाणे गुरुच्या आदेशानुसार ती चिमुरडी बाटली घेवून स्टोअररुममध्ये जाताच पाठीमागून विकृत स्वभावाचा हा दानवही हजर झाला.


यावेळी अचानक शिक्षकाला समोर पाहुन गोंधळलेल्या त्या चिमुरडीला काही समजण्यापूर्वीच या विकृताने तिला नको तेथे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि महिलांना लज्जा उत्पन्न व्हावी असे कृत्य केले. या प्रकाराने भयभीत झालेली ‘ती’ इवलीशी चिमुरडी तेथून धावतच सुटली. तिने हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या पीडितेच्या पालकांसह तिच्या नातेवाईकांनी शाळेत जावून त्या नराधमाला त्याच्या दूष्कृत्याबाबत जाब विचारला. यावेळी संतप्त नातेवाईकांनी त्याची यथेच्छ धुलाई देखील केली. हा प्रकार पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी दुपारी दीडच्या सुमारास धावपळ करीत आरोपीला संतप्त लोकांच्या गराड्यातून बाजुला काढीत पोलीस ठाण्यात आणले.


तो पर्यंत सदरचे प्रकरण शाळेच्या संस्थाचालकांनाही समजल्याने त्यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. सुरुवातीला त्यातील काहींनी थेट पोलिसांना भेटूनच आपल्या प्रतिष्ठेचा ‘दाब’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरचे प्रकरण बाललैंगिक अत्याचाराच्या (पोक्सो) संदर्भात असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी काहींनी पीडित चिमुरडीच्या पालकांना शाळा, इतिहास, प्रतिष्ठा यांचे दाखले देत त्यांच्यावर दबाव निर्माण करुन त्यांना तक्रार देण्यापासून परावृत्त केले. जवळपास दीड-दोनतास चाललेल्या या घडामोडीत आपल्या चिमुरडीसोबत संतापजनक प्रकार घडूनही अखेर तिच्या पालकांना संस्थाचालकांसमोर नमावे लागले आणि कोणत्याही तक्रारीशिवाय पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेले हे प्रकरण माघारी फिरले.


या घटनेनंतर शहरात त्याची वाच्चताही झाली आणि संस्थाचालकांनी शाळेच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी एका गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रकार असल्याचे गंभीर आरोपही होवू लागले. आपल्या मुलीप्रमाणे वयाच्या विद्यार्थींनींना ज्ञानदानाचे पवित्रकार्य करीत असताना एखाद्या शिक्षकाच्या मनात अशी विकृती यावी ही गोष्ट अतिशय गंभीर असून अशी व्यक्ति शिक्षणक्षेत्रात सेवा करण्याच्या लायकीची असूच शकत नाही. त्यामुळे अशा गंभीर प्रकरणात शिक्षणसंस्थांनीच पुढाकार घेवून अशा प्रवृत्तींचा समूळ नाश करण्याची गरज असताना संगमनेरातील प्रतिष्ठीत शिक्षणसंस्था म्हणवल्या जाणार्‍या शाळेतील हा प्रकार अतिशय धक्कादायक आणि पालकवर्गात संताप निर्माण करणारा आहे.


सदरचा धक्कादायक आणि अतिशय संतापजनक प्रकार संगमनेरातील एका लौकीक प्राप्त शिक्षणसंस्थेत घडला. खरेतर हा प्रकार समोर आल्यानंतर संस्थेनेच पुढाकार घेत सरकारच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षणासारख्या अतिशय पवित्र मानल्या जाणार्‍या क्षेत्रात शिरलेल्या या नराधमाला गजाआड घालून या क्षेत्रातून त्याची कायमस्वरुपी हकालपट्टी करण्याची अपेक्षा होती. शहरातील डॉक्टर, वकिल, इंजिनिअर्स व प्रतिष्ठीतांचा भरणा असलेल्या या शिक्षण मंडळाला तितकी संवेदनशिलता असेल असेच आजवर अपेक्षित होते, मात्र या संस्थेने आपल्या शाळेची प्रतिष्ठा जपण्याचा नावाखाली विकृत मानसिकतेच्या एका नराधमाला पाठीशी घालून एकप्रकारे त्याला भविष्यातील दूष्कृत्यासाठी पाठबळच दिले आहे. संस्थाचालकांच्या या निर्णयाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसह शहरातूनही संताप व्यक्त होत आहे.

Visits: 60 Today: 1 Total: 1567139

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *