जनतेसाठी वेळ देणारा आणि खस्ता खाणाराच नेता बनतो ः पाटील राहाता व श्रीरामपूर तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

नायक वृत्तसेवा, शिर्डी
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बांधणी सुरू करावी. राजकीय पक्षाने ताकद दिली म्हणून एखाद्या मतदारसंघात कार्यकर्त्यांसाठी गॉडफादर किंवा नेता तयार होत नसतो. जो कार्यकर्ता जनतेसाठी वेळ देतो आणि खस्ता खातो, त्यातून नेता तयार होतो, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राहाता तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांना दिला.

पक्षाच्यावतीने शुक्रवारी (ता.1) राहाता व श्रीरामपूर तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिर्डी विधानसभा मतदारसंघात गॉडफादर (नेता) नाही, त्यामुळे पक्षाने येथील कार्यकर्त्यांना ताकद द्यावी, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली. तो धागा पकडून त्यांनी कार्यकर्त्यांना वरील कानमंत्र दिला. मेळाव्यास श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अविनाश आदिक, सुरेश वाबळे, संदीप वर्पे, महेबूब शेख, बाबासाहेब कोते, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, नीलेश कोते, अमित शेळके, संदीप सोनावणे आदिंसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘ज्या मतदारसंघात पक्षाचा आमदार नाही, तेथे संघटनात्मक बांधणीवर भर द्यायचा आहे. कार्यकर्त्यांच्या मागे पक्षाची ताकद उभी केली जाईल.’ या मेळाव्यात शिर्डी, राहाता व श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी अडचणी मांडल्या. या अडचणी अडचण दूर करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

सहकारी साखर कारखाने टिकतील आणि प्राप्तीकराची वसुली होईल, असा मध्यम मार्ग काढावा लागेल. अन्यथा राज्यातील अनेक कारखाने बंद पडतील. पोलीस महासंचालक परमबीर सिंग व माजी गृहमंत्री अनिल देशमुख सापडत नसले, तरी या प्रकरणात देशमुखांना नाहक अडकविण्यात आले आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू आहे. काही बंधारे वाहून गेले. मात्र अतिवृष्टी झाली, हे देखील वास्तव आहे.
– जयंत पाटील (जलसंपदा मंत्री)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *