पुणे पोलीस आयुक्तालयात बदली झालेल्या बहिरट यांच्याविरोधात तक्रार

पुणे पोलीस आयुक्तालयात बदली झालेल्या बहिरट यांच्याविरोधात तक्रार
डॉ.विजय मकासरे यांचे पोलीस आयुक्तांना निवेदन; खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. पोलीस निरीक्षक बहिरट यांची काही दिवसांपूर्वीच येथून पुणे पोलीस विभागात बदली झाली होती. शहर पोलीस ठाणे हद्दीत बहिरट यांनी केलेल्या विविध कारवाया वादग्रस्त ठरल्या असून अधिकाराचा गैरवापर करुन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप डॉ.मकासरे यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.

या संदर्भात डॉ.मकासरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून पोलीस निरीक्षक बहिरट यांच्या कारकीर्दीत टिळकनगर पोलीस चौकीसमोर एका तरुणाने पेट्रोल टाकून पेटून घेत आत्महत्या केली. तसेच तालुक्यातील एकलहरे येथील लाखो रुपयांच्या अवैध गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपींना निरीक्षक बहिरट यांनी बाजूला ठेऊन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप डॉ.मकासरे यांनी केला आहे.

अवैध गुटखा प्रकरणाच्या चौकशीसाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर बहिरट यांच्याकडून गुटखा प्रकरणाचा तपास काढल्याच्या रागातून आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला. आपल्यावरील दोन्ही गुन्ह्यांचे सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे असून व्हिडीओ फुटेजनुसार सदर गुन्हे खोटे असल्याचे डॉ.मकासरे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. त्यामुळे बहिरट मानसिकदृष्ट्या कमकुवत असून वैयक्तिक द्वेषातून खोटे गुन्हे दाखल करीत असल्याचा सवाल डॉ.मकासरे यांनी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. तसेच दारुबंदीच्या काळात श्रीरामपूर शहरात खुलेआम दारु विक्री सुरु ठेवली.

तसेच लोकवर्गणीतून पोलीस चौक्या उभारल्या प्रकरणी पारनेर येथील कार्यकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात निरीक्षक बहिरट यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. सदर पोलीस चौकी उभारण्यासाठी दारु निर्मिती कंपन्यांकडून अर्थिक मदत घेतल्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या पोलीस निरीक्षक बहिरट यांना कामासाठी कुठलेही पोलीस ठाणे देऊ नये, अशी मागणी डॉ.मकासरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, एकलहरे येथील अवैध गुटखा प्रकरणाची तपास प्रक्रिया सध्या थंडावली असून या प्रकरणी गृह खात्याने पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्यासह पोलीस कर्मचारी जालिंदर लोंढे यांच्या मोबाईल कॉल डिटेल्सचा अहवाल काढण्याची मागणी डॉ.मकासरे यांनी केली आहे.

 

Visits: 116 Today: 2 Total: 1590234

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *