पठारभागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच दुचाकी चोर्यांचे सत्र सुरू; नागरिकांत भीतीचे वातावरण

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. विद्युत पंप, घरफोडीनंतर आता दुचाकी व मोठ्या वाहनांना लक्ष्य केले आहे. आधी झालेल्या चोर्यांचा तपास अजूनही लागलेला नसून पुन्हा दुचाकी चोर्यांचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, म्हसवंडी येथील संतोष बोडके यांनी आपली दुचाकी (क्र.एमएच.17, सीए.5426) ही घरासमोर लावली होती. मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी (ता.2) पहाटे चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून पोबारा केला आहे. दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नसल्याने संतोष बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबरोबरच बिरेवाडी येथील अशोक राजाराम भोसले यांची दुचाकी (क्र.एमएच.17, एएच.1715) ही रविवारी (ता.30) आंबी-माळेगाव सोसायटीच्या कार्यालय शेजारी असलेल्या कारखाना कार्यालय समोरून चोरून नेली. त्यानंतर भोसले यांनी दुचाकीचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यामुळे घारगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आठ दिवसापूर्वी पठारभागातून चारचाकी वाहन चोरीला गेले आहे. तसेच यापूर्वी झालेल्या चोर्यांचा तपास लागलेला नसताना पुन्हा चोर्यांचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे जलद तपास लावण्याचे कसब पोलिसांना दाखवावे लागणार आहे.
