गुन्हेगारांशी ‘यारी’ अन् कर्तव्यात ‘कसूरी’! तस्कराच्या अटकपूर्वसाठी उपनिरिक्षकाचा आटापीटा; लव्ह जिहादसह अनेक गुन्ह्यांचा मास्टरमाईंड सहिसलामत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही महिन्यात भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराच्या कारणाने चर्चेत आलेल्या संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातून आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महिनाभरापूर्वी कर्हेघाटाच्या पायथ्याशी झालेल्या गुटख्यावरील कारवाईतील मुख्य सूत्रधार आणि पठारावरील लव्ह जिहादसह गांजा, गुटखा आणि हत्यार तस्करीच्या प्रकरणात वारंवार गजाआड झालेल्या कुख्यात युसुफ दादा चौगुले याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. घारगावच्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात तब्बल नऊ महिन्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळताच आरोपी महिनाभरात हत्यार तस्करी करताना मध्यप्रदेशच्या सेंधवामध्ये पकडला गेला. त्यामुळे सर्वोच्चकडून मिळालेला त्याचा जामीनही रद्द झाला, त्यातूनही दोन महिन्यापूर्वीच त्याची पुन्हा जामीनावर सुटका झाली असताना गुटखा तस्करीच्या प्रकरणात त्याचा सहभाग आढळून आला. उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी त्याच्यासह चौगुले टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाईचा प्रस्तावही सादर केला आहे इतके प्रबळ मुद्दे असतानाही आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने तालुका पोलिसांचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून घारगावप्रमाणेच या पोलीस ठाण्यातही आता ‘गुन्हेगारांशी ‘यारी’ अन् कर्तव्यात ‘कसूरी’’चे सूत्र फोफावल्याचे दिसत आहे.

गेल्या महिन्यात (2 मार्च) तालुका पोलिसांनी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कर्हेघाटाच्या पायथ्याशी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका संशयीत स्कॉर्पिओ (एम.एच.46/एक्स.4046) वाहनावर कारवाई करीत तब्बल सात लाख 20 हजार रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखु जप्त केली. मात्र या प्रकरणाचा गुन्हा तब्बल सहा तासांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास नोंदवण्यात आला. तालुका पोलिसांनी वाहनचालक श्याम कोंडीभाऊ काळे (वय 30, रणखांबवाडी) याच्यासह ज्याच्याकडून गुटखा आणला त्या धिरज माळी (रा.नानापोंढा, सिल्व्हासा) व खरेदीदार युसुफ दादा चौगुले (रा.घारगाव) अशा तिघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 123, 274, 275, 223 प्रमाणे गुन्हा दाखल करुन काळेला अटक करुन कारसह एकूण 19 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईला जवळपास महिना उलटूनही तपास अधिकार्यांनी गुटखा तस्करीच्या मास्टरमाईंडचा शोध घेण्याची तसदी घेतली नाही. या दरम्यान आरोपी अनेकदा संगमनेरातील वकिलांशी सल्लामसलत करण्यासाठी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी येवून गेला. मात्र तालुका पोलिसांना त्याचा अजिबात थांगपत्ता लागला नाही. आरोपीने कायद्याचे अदृष्य संरक्षण मिळवून सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले आणि संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यावरील सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाकडून आरोपीची पार्श्वभूमीच गांजा आणि गुटखा तस्करीची असल्याचे आणि त्याच्यावर हत्यार तस्करीतंर्गत गुन्हा दाखल असल्यावर भर देत घारगावच्या लव्ह जिहाद प्रकरणाचे षडयंत्र पाहता त्याचे कारागृहाबाहेर असणे समाजासाठी घातक असल्याचे व त्याच्यावर मोक्कान्वये कारवाई प्रस्तावित असल्याचे न्यायालयाला सप्रमाण पटवून देण्याची गरज होती.

मात्र तालुका पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाईपासूनच गुन्हा दाखल करण्यासाठी केलेला जाणीवपूर्वक विलंब, त्यानंतर महिना उलटूनही वाहनचालक वगळता उर्वरीत दोन्ही आरोपींना कायदेशीर संरक्षण मिळवण्यासाठी अटक टाळण्याचा प्रकार, न्यायालयात जामीनाला विरोध करण्याची संधी असतानाही केवळ नावाला सोपस्कार पूर्ण करुन एकप्रकारे आरोपीला अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केलेला आटापीटाच दिसून येतो. त्यातून या प्रकरणाच्या तपासी अधिकार्यांबाबत संशय बळावला असून वारंवार गुन्हे करणारा, समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रकरणात सक्रिय असलेला आरोपी मुक्त राहिल्यास समाजाच्या शांततेला बाधा उत्पन्न होवू शकते, त्यामुळे वरीष्ठ पोलीस अधिकार्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून युसुफ चौगुले याचा अटकपूर्व जामीनअर्ज मंजूर करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करुन त्याचा संपूर्ण कालाचिठ्ठा न्यायालयासमोर सादर करण्याची अपेक्षा आहे, सोबतच या प्रकरणातील संशयीत भूमिका असलेल्या तपासी अधिकार्यांचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

दोन वर्षांपूर्वी 7 जुलै 2024 रोजी पठारभागातील एका 19 वर्षीय तरुणीचे बळजबरी धर्मांतरण करुन तिचा निकाह लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्या घटनेने संपूर्ण तालुक्यात तणाव निर्माण झालेला असताना पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत मुलासह पळवून नेलेल्या मुलीला मुंबईतून परत आणले. त्यानंतर पंधरवड्याने 26 जुलैरोजी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन तालुक्यात पहिल्यांदाच ‘उजेडात’ आलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. त्या प्रकरणात अद्याप पसार असलेल्या शादाब तांबोळी या आरोपीने प्रत्यक्षात मुलीशी निकाह आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला असला तरीही पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचे षडयंत्र युसुफ दादा चौगुले यानेच रचल्याचे तपासातून स्पष्ट केले होते.

त्याशिवाय त्याची पार्श्वभूमी गांजा आणि गुटखा तस्करीची असल्याने त्यातून मिळणार्या अफाट पैशांचा वापर तो दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी करीत असल्याचेही उघड झाले होते. त्या प्रकरणात नऊ महिने गजाआड घातल्यानंतर एप्रिल 2025 मध्ये त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळाला. मात्र त्यानंतर महिन्याभरातच मध्यप्रदेशातून दोन देशी पिस्टल, चार गावठी कट्टे, चार काडतुसे अशी शस्त्रे घेवून संगमनेरकडे येत असताना त्याला मे 2025 मध्ये सेंधवा पोलिसांनी पकडले होते, त्या प्रकरणात दीर्घकाळ तुरुंगात घालवल्यानंतर घारगाव पोलिसांनी जिल्हा न्यायालयाद्वारा त्याचा सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीनअर्ज रद्द केला होता. त्यातून दोन महिन्यांपूर्वीच त्याला नियमित जामीन मिळाला आणि बाहेर येताच त्याने पुन्हा आपले उद्योग सुरु केले.

या वरुन आरोपी युसुफ चौगुलेला कायद्याचे अथवा कारागृहाचे कोणतेही भय नसल्याचे दिसत असून जामीन मिळाल्यानंतरही पुन्हा गुन्हा करण्याची त्याची वृत्ती सुसंस्कृत समाज व्यवस्थेसाठी अतिशय घातक आहे. लव्ह जिहाद प्रकरणातून तब्बल नऊ महिन्यांनी सुटका झाली असतानाही कायद्याची कोणतीही भीती न बाळगता आरोपीने मध्यप्रदेशातून अग्निशस्त्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अशी शस्त्र आणण्यामागील त्याच्या हेतूवरही चर्चा झाल्या असता ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात त्याला विरोध करुन कारवाईसाठी पुढाकार घेणार्यांचा बदला घेण्यासाठी तो प्रयत्नशील असल्याचेही बोलले गेले. त्याच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीने त्याला पुन्हा गजाआड नेले, त्यातून दोन महिन्यांपूर्वी तो सुटला आणि महिन्याभरातच पुन्हा गुटखा तस्करीत फसला तालुका पोलिसांच्या मेहरबानीने मात्र यावेळी अटकपूर्व जामीनावर सुटला.

जवळपास महिनाभरापूर्वी तालुका पोलिसांनी केलेल्या गुटख्यावरील कारवाईत मुख्य सूत्रधार म्हणून युसुफ दादा चौगुलेचे नाव समोर आल्यानंतर तपासी अधिकार्याने आपल्या कर्तव्याला जागून समाज व्यवस्थेसाठी घातक असलेली ही वृत्ती तात्काळ शोधून त्याला गजाआड घालण्याची आणि त्याचा गुन्हेगारी इतिहास न्यायालयासमोर मांडून त्याला दीर्घकाळ कारागृहात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा असताना उलट या अधिकार्याने कर्तव्याला फाट्यावर मारुन गुन्हेगाराशी हात मिळवणी केल्यानेच सूत्रधार असूनही त्याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला, या प्रकरणात मोठी आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा असून पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी अशी नागरी अपेक्षा आहे.

