संगमनेरातील क्रिकेटच्या मैदानावर कोयत्याचा खेळ! शिवजयंतीच्या वादातून सशस्त्र थरार; गुन्हेगारीवादाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून परस्परांना आव्हान देण्याच्या प्रकाराने रविवारी तरुणांच्या एका गटाने प्रतिस्पर्धी तरुणावर सशस्त्र हल्ला केला. सध्या शहराच्या काही भागात सायंकालीन क्रिकेट स्पर्धांचा हंगाम सुरु असून इंदिरानगरमधील म्हसोबा मैदानावरही अशाच स्पर्धा सुरु आहे. त्या दरम्यानच हा प्रकार घडल्याने संपूर्ण इंदिरानगरसह शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जखमी तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या पुढार्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती, यावेळी काहींनी या घटनेला ‘राजकीय रंग’ देत कायदा-सुव्यवस्थेचा ‘नॅरेटिव्ह सेट’ करण्याचाही प्रयत्न केला, मात्र जमलेल्या बहुतेकांना वस्तुस्थिती माहिती असल्याने ‘त्यांचा’ हा प्रयत्न अयशस्वी ठरला. या घटनेत जखमी झालेल्या रोहीत वाळके या तरुणाचा पोलिसांनी व्हिडिओ जवाब नोंदवला असून अद्याप कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल झालेला नाही.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार रविवारी (ता.22) रात्री साडेनऊच्या सुमारास शहराच्या गर्भस्थानी असलेल्या इंदिरानगर परिसरात घडला. गेल्याकाही दिवसांपासून या परिसरातील तरुणांनी सायंकालीन क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले असून रोज संध्याकाळी म्हसोबा मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणात शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या तरुणांचा समावेश असलेल्या संघांचे क्रिकेट सामने रंगत आहेत. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास असाच रंगतदार सामना सुरु असताना मैदानापासून काही अंतरावर अचानक आरडाओरड आणि पळापळ सुरु झाल्याने या स्पर्धेला गालबोट लागले.

या घटनेत रुद्र प्रतिष्ठान नावाच्या संघटनेची स्थापना करुन त्याद्वारे शहरात ढोल-ताशा पथकाची निर्मिती करणार्या रोहीत वाळके या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याचे समोर आले. यावेळी चौघांनी स्पर्धा सुरु असलेल्या मैदानाजवळ आलेल्या रोहीत वाळकेला गाठून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यातील एकाने आपल्या सोबत आणलेल्या कोयत्याने त्याच्यावर पाठीमागून वार केल्याने तो जीवाच्या आकांताने मोठमोठ्याने ओरडू लागला, त्याचा आवाज ऐकून सामना पाहण्यासाठी जमलेले तरुण त्या दिशेने धावल्यानंतर मारहाण करणारे चारही तरुण तेथून पसार झाले. या मारहाणीत वाळकेच्या खांद्यावर आणि पाठीवर खोलवर गंभीर जखमा झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु होता, त्यामुळे काहींनी तातडीने त्याला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती वार्याच्या वेगाने शहरात पसरल्यानंतर अनेकांनी ‘त्या’ खासगी रुग्णालयात धाव घेतली. त्यात शहरातील जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी जमलेला समुदाय पाहून त्यातील काहींनी या घटनेचा धागा पकडून शहराच्या शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करीत एका लोकप्रतिनिधीवर त्याचे खापर फोडण्याचाही प्रयत्न केला, मात्र या प्रकरणातील दोन्हीबाजूचे तरुण कोणाचे समर्थक आहेत हे तेथे जमलेल्या बहुतांशी तरुणांना माहिती असल्याने ‘त्या’ काहींचा हा प्रयत्न अपयशी ठरला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने इंदिरानगरसह ‘त्या’ खासगी रुग्णालयात धाव घेत सुरुवातीला जमलेला जमाव पांगवला व नंतर जखमी रोहीत वाळके याची रुग्णालयात जावून भेट घेत त्याचा व्हिडिओ जवाबही नोंदवला, मात्र या प्रकरणी अद्यापही कोणावर गुन्हा दाखल झालेला नाही.

या घटनेला पूर्ववादाची किनार असल्याचेही आता समोर येत असून गुरुवारी (ता.19) शिवजयंतीच्या मिरवणुकीत वादाची ठिणगी पडली होती. त्यावेळी दोन्ही गट एकमेकांशी हुज्जत घालत असताना पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वादावर पडदा पडला होता. मात्र त्यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाताना दोन्ही बाजूने परस्परांना आव्हान दिले गेले. त्याचाच परिणाम रविवारी (ता.22) रात्री रोहीत वाळके इंदिरानगरच्या म्हसोबा मैदानावर आला असता तेथे आधीपासूनच असलेल्या चौघांनी त्याला हेरले आणि शिवजयंतीच्या दिवशी झालेल्या वादातून त्याला बेदम मारहाण करीत त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला व तेथून पसार झाले. मारहाण करणार्या चौघांमध्ये काहीजण अल्पवयीन असल्याचीही चर्चा असून पोलीस सर्वबाजू पडताळून बघत आहेत. या घटनेने सध्या शहरासह तालुक्याच्या विविध भागात सुरु असलेल्या उन्हाळी क्रिकेट स्पर्धांना गालबोट लागले असून त्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरापासून शहर व परिसरात घडणार्या घटनांचा धागा पकडून त्याचे खापर एकमेकांवर फोडण्याची राजकीय स्पर्धा लागली आहे. त्यातूनच शहरातील अमलीपदार्थांवरील कारवायांचा धागा पकडून शहरातील तरुणाईला नशेखोरीकडे नेले जात असल्याचे राजकीय ‘नॅरेटिव्ह’ सेट करण्यात यशस्वी झाल्यानंतर काहींनी रविवारी तरुणांच्या दोन गटात झालेल्या या धुमश्चक्रीलाही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी रुग्णालयात हजर होवून अशाकाही षडयंत्रकार्यांनी गर्दीत चर्चा घडवून या घटनेचे खापर एका ‘लोकप्रतिनिधीवर’ फोडण्याचाही प्रयत्न केला, मात्र रुग्णालयात जमलेल्या बहुतेक सर्वांना जखमी झालेल्या तरुणासह त्याच्यावर हल्ला करणारे चारही तरुण कोणाचे समर्थक आहेत व त्यांना कोणाचे पाठबळ आहे याची माहिती असल्याने संबंधितांचा ‘तो’ प्रयोग यावेळी मात्र अपयशी ठरला.

