भ्रष्टाचाराच्या अजगराला ‘अभय’ देणारी ‘ती’ राजकीय शक्ती कोणाची? तालुका आरोग्य अधिकार्यांच्या निलंबनानंतरचा प्रश्न; सेवेतून कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची मागणी..

श्याम तिवारी, संगमनेर
प्रशासकीय सेवेतील नैतिकता गहाण ठेवून, सत्तेच्या मस्तीत तब्बल 25 वर्षे एकाच तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या डॉ.सुरेश घोलप यांच्या पापाचा घडा अखेर भरला. कोविडसारख्या भीषण संकटातही माणुसकी विसरुन भ्रष्टाचाराचे कुरण शोधणार्या आणि महिला कर्मचार्यांच्या शोषणाचे आरोप असलेल्या या वादग्रस्त अधिकार्याला शासनाने निलंबित केले असून त्यांच्या खातेअंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, डझनावर तक्रारी आणि गंभीर आरोप असतानाही या ‘महाभागाला’ आजवर अभय देणारी ती ‘अदृश्य राजकीय ताकद’ नेमकी कोणाची, असा जळजळीत सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

गेल्या नऊ वर्षांपासून तालुका आरोग्य अधिकारीपदावर असलेल्या डॉ.सुरेश घोलप यांचा 2000 सालापासूनचा संगमनेर तालुक्यातील संपूर्ण कार्यकाळ कर्तव्यापेक्षा वादांनीच अधिक गाजला. संपूर्ण देश मृत्यूच्या छायेत असताना आणि जनता ऑक्सिजनसाठी वणवण फिरत असताना, या महोदयांनी शासकीय योजनांचा लाभ लाटण्यासाठी चक्क आपल्या पत्नीच्या नावाने कोविड सेंटर सुरु करण्याचा प्रताप केला होता. इतकेच नव्हेतर, तत्कालीन प्रांताधिकार्यांनी ज्या बोगस डॉक्टरांवर (मुन्नाभाई) कारवाई करुन त्यांना पकडले होते, त्यांना जाणीवपूर्वक पळ काढण्याची वाट करुन देण्यातही या महाभागाचा वाटा होता. आरोग्य विभागाच्या खुर्चीला चिकटून बसलेल्या या अधिकार्याने जनसेवेऐवजी केवळ स्वार्थाची आणि भ्रष्टाचाराची पाठराखण केल्याचेच त्यांच्या वादग्रस्त कारकीर्दीतून वारंवार समोर आले आहे.

कोणताही शासकीय अधिकारी एका ठराविक काळानंतर बदलीला पात्र असतो, मात्र डॉ.सुरेश घोलप यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून तब्बल 25 वर्षे संगमनेर तालुक्यात आपले अंधारलेले साम्राज्य उभे केले. या काळात त्यांच्यावर सहकारी महिला आरोग्य सेविकेने लैंगिक छळासारखे अत्यंत गंभीर आणि संतापजनक आरोप केले. डझनावर लेखी तक्रारी दाखल झाल्या, आंदोलने झाली, तरीही प्रत्येक वेळी हा अधिकारी सहीसलामत सुटला. आरोग्य विभागाचा लौकिक वाढवण्याऐवजी तो धुळीला मिळवण्याचे काम त्यांनी केले. एका संवेदनशील विभागात असा ‘बेशिस्त’ अधिकारी अजगरासारखा फोफावत असताना आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक राजकीय नेतृत्व डोळे मिटून का बसले होते, हा आता संशोधनाचा विषय झाला आहे.

सत्ता येते आणि जाते, सरकारे बदलतात, मात्र काही प्रवृत्ती व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून बसतात. संगमनेर तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप त्याचे जिवंत उदाहरण आहे. ज्या विभागाकडे सामान्य माणूस आशेने पाहतो, त्याच विभागाचा कणा मोडीत काढण्याचे काम या महाभागाने गेल्या दोन दशकांहून अधिक काळ केले. अखेर सतत वादग्रस्त ठरलेल्या या अधिकार्यावर निलंबनाची कुर्हाड कोसळली आणि त्यातून त्याच्या अडीच दशकांच्या अंधेर नगरीचे पितळ उघडे पडले आहे. असंख्य तक्रारी, अरेरावी, मनमानी, शिस्तभंग, गैरव्यवहार, लैंगिक छळाचे आरोप असतानाही एकाच तालुक्यात तब्बल 25 वर्षे ठाण मांडून बसलेला हा ‘प्रशासकीय अजगर’ नेमका कुणाच्या जीवावर पोसला गेला असा प्रश्न आता उपस्थित झाला असून निलंबित डॉ.सुरेश घोलप यांच्या मालमत्तेच्या सखोल चौकशीसह आजवर त्यांच्या मर्कटलीला दडपणार्यांची नावेही समोर येण्याची गरज आहे.

कोविड संक्रमणाच्या काळात ग्रामीण भागात फोफावलेल्या बोगस डॉक्टरांविरुद्ध (मुन्नाभाई) तत्कालीन प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांनी धाडसी मोहीम उघडली होती, तेव्हा डॉ.घोलप यांची भूमिका संशयास्पद राहिली. वरिष्ठ अधिकार्यांनी रंगेहात पकडलेल्या बोगस डॉक्टरांना कायदेशीर प्रक्रियेतून पळ काढण्याची चोरवाट या महाभागाने करुन दिली. ज्या हातांनी रुग्णांना जीवनदान द्यायचे, त्याच हातांनी गुन्हेगारांना अभय देण्याचे पाप डॉ.घोलप यांनी केले. आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी नागरिकांना दिलासा देण्याऐवजी केवळ ‘अर्थपूर्ण’ तडजोडींना प्राधान्य दिले, ज्यामुळे तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली.

एकाच तालुक्यात इतक्या प्रदीर्घकाळ ठाण मांडून बसलेल्या डॉ.घोलप यांच्याविरोधात पंचायत समितीच्या संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यापासून जिल्हा आरोग्य अधिकार्यांपर्यंत आणि सहकारी महिला आरोग्य सेविकेपासून चक्क मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यापर्यंत अनेकांनी लेखी तक्रारी करुनही हे महाभाग आजवर कोणत्याही कारवाईशिवाय सहिसलामत राहीले. त्यांना प्रत्येकवेळी संकटातून वाचवणारा त्यांचा राजकीय संकटमोचक कोण? असा सवालही आता विचारला जावू लागला आहे. 25 वर्षात अनेकदा या महाभागाविरोधात तक्रारींचे ढीग साचले, आंदोलने झाली, प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला, तरीही त्यांना प्रत्येकवेळी मिळालेले अभय अतिशय धक्कादायक आहे.

बदली होऊनही ती रद्द करून पुन्हा संगमनेरलाच येण्याची किमया या महाशयांनी गेली तब्बल अडीच दशके वारंवार साधली आहे. या ‘बाईलवेड्या’ आणि अतिशय बेजबाबदार ’बेशिस्त’ अधिकार्याने आरोग्य विभागाचा लौकिक तर धुळीला मिळवलाच, शिवाय प्रामाणिकपणे काम करणार्या कर्मचार्यांचे मानसिक खच्चीकरणही केले. गेल्यावर्षी या महाभागाने आमदार अमोल खताळ यांच्याशी पंगा घेतल्यानंतर त्यांच्या घडाळ्याचे काटे फिरले आणि आरोग्य मंत्र्यांच्या आदेशाने अखेर प्रत्येकवेळी डॉ.घोलप यांच्या दूष्कृत्यांना पाठीशी घालणार्या नाशिकच्या आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालकांना त्यांच्या निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश काढावे लागले. या निमित्ताने आजवर या बेशिस्त आणि लिंगपिसाट अधिकार्याला पाठीशी घालणार्या ‘त्या’ राजकीय सूत्रधारांचाही भांडाफोड होण्याची आवश्यकता आहे.

आपली 25 वर्षांची संपूर्ण कारकीर्द एकाच तालुक्यात घालवणार्या आणि शिवाय बेशिस्ती, मनमानी, शिस्तभंग, भ्रष्टाचार, महिला सहकार्यांचा लैंगिक छळ, सामान्य नागरिकांशी अरेरावी आणि लोकप्रतिनिधींशी मस्तीत वागण्याचे असंख्य आरोप असलेल्या डॉ.सुरेश विश्वनाथ घोलप यांचे तब्बल डझनभर तक्रारीनंतर झालेले निलंबन केवळ एका भ्रष्ट प्रवासाची तात्पुरती विश्रांती ठरु नये. या निमित्ताने त्यांच्या येथील संपूर्ण कार्यकाळातील प्रत्येक फाईलची, त्यांनी दिलेल्या बदल्यांची आणि कोविड काळातील सर्व आर्थिक व्यवहारांचे ‘स्पेशल ऑडिट’ व्हायला हवे. या प्रकरणाच्या कठोर कारवाईतून अशाप्रकारच्या संवेदनशील विभागात धुमाकूळ घालणार्या या प्रवृत्तींना चाप बसण्याची गरज आहे.

