निसर्ग व मानवनिर्मित संकटांत भरडतोय जगाचा पोशिंदा…! नांदूर खंदरमाळच्या तरुण शेतकर्‍याने व्यक्त केली हतबलता..

नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीचे संकट ओढावलेले आहे. त्यातच निसर्गाचाही लहरीपणा पहायला मिळत आहे. तरी देखील मोठ्या हिंमतीने जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी अनेकांची भूक भागविण्यासाठी लढा देत आहे. वाढती महागाई आणि बाजारभाव नसल्याने शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर दैनिक नायकने संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथील तरुण शेतकर्‍याची घेतलेली मुलाखत बरेच काही सांगून जाते.

डोंगरदर्‍यांमध्ये वसलेल्या पठारभागाची तशी दुष्काळग्रस्त म्हणून ओळख आहे. मोठ्या प्रमाणात खडकाळ जमीन आणि पाण्याचे उद्भव नसतानाही शेतकरी शेती फुलवत आहे. अशाही परिस्थितीत अनेक तरुण आपला पारंपारिक शेती व्यवसाय दिमाखात पुढे नेत आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून शेती क्षेत्राची झालेली वाताहत पाहता पठारभागातील शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत. नांदूर खंदरमाळ येथील तरुण शेतकरी रवींद्र सोन्याबापू लेंडे हे गेल्या सात वर्षांपासून उत्कृष्ट शेती करत आहे. आधुनिकतेची कास पकडत त्यांनी पॉलिहाऊसची निर्मिती केली आहे. यामध्ये त्यांनी रंगीत व हिरव्या रंगाच्या सिमला मिरचीची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी मोठा खर्चही केला होता. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारभाव नसल्याने शेतीला उतरती कळा लागली असल्याचे सांगून अक्षरशः मिरची काढून फेकून द्यावी लागल्याचे लेंडे म्हणाले.

त्यातच दिवसेंदिवस महागाईचा आगडोंब उसळला आहे. फळबागांतून शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळेल या भाबड्या आशेवर असलेल्या डाळिंब उत्पादकांचा हंगामही वाया गेला आहे. कवडीमोल भावात विक्री होत असल्याने बागांचा खर्चही निघत नसल्याने शेतकर्‍यांवर बागा काढून टाकण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याचेही लेंडे यांनी नमूद केले. नगदी पीक म्हणून कांदा पिकाकडे बघितले जाते. त्यामुळे दागिने गहाण ठेवून आणि कर्ज काढून दुप्पट दराने शेतकर्‍यांनी राज्यभरातून कांदा बी घेतले. परंतु यामध्येही फसगत होवून हाती काहीच लागले नाही. त्यातून सावरुन लागवड केलेल्या कांद्याची सध्या काढणी सुरू आहे. सुरुवातीला कांद्याला 3500 ते 4000 रुपये प्रतिक्विंटल बाजार मिळाला. परंतु, सध्या कांद्याला 1500 ते 1600 रुपयांचा बाजारभाव मिळत असल्याचे ते म्हणाले आहे.

अशा एक ना अनेक संकटांमधून सावरत भाजीपाल्यांचे पीक घेतले. मात्र त्यालाही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी पुरते वैतागले आहे. यामुळे अनेक शेतकर्‍यांवर उभ्या पिकांवर जनावरे सोडण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. एकीकडे निसर्गनिर्मित संकट तर दुसरीकडे मानवनिर्मित संकट, यामध्ये शेतकरी अक्षरशः भरडला जात आहे. यामुळे शेतकर्‍यांनी जगावं की मरावं अशी हतबलता तरुण प्रयोगशील शेतकरी रवींद्र लेंडे यांनी व्यक्त केली आहे.

Visits: 246 Today: 3 Total: 1114060

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *