सोनगाव-सात्रळ येथील अवैध गावठी हातभट्टी दारु अड्डे उध्वस्त दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील सोनगाव-सात्रळ येथे अवैधरित्या गावठी हातभट्टी दारु तयार करुन विक्री करत होते. याबाबत खात्रीशीर मिळालेल्या माहितीवरुन मंगळवारी (ता.21) पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकत सर्व गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारु यांचा जागेवरच नाश करण्यात आला तर 2 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील सोनगाव-सात्रळ येथे अवैधरित्या गावठी दारु तयार करुन विक्री करत आहे. याची खबर्याकडून माहिती मिळाल्यानुसार पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आपल्या पथकाला छापे टाकण्याचे आदेश बजावले. पथकाने छापेमारी करत दिलीप वामन पवार (वय 45) याच्याकडून 42 रुपये किंमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन आणि 2 हजार रुपये किंमतीची 20 लिटर तयार दारु, सुभाष वामन पवार याच्याकडून 49 रुपये किंमतीचे 700 लिटर कच्चे रसायन आणि 3 हजार 500 रुपयांची 35 लिटर दारु, मुन्ना लक्ष्मण पवार याच्याकडून 52 हजार 500 रुपयांचे 750 लिटर कच्चे रसायन आणि 3 हजार रुपयांची 30 लिटर तयार दारु, वसंत भिवसेन पवार याच्याकडून 42 हजार रुपये किंमतीचे 700 लिटर कच्चे रसायन आणि 2 हजार 500 रुपये किंमतीची 25 लिटर दारु, सविता एकनाथ बर्डे हिच्याकडून 14 हजार रुपये किंमतीचे 200 लिटर कच्चे रसायन आणि एक हजार रुपयांची दारु असा एकूण 2 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरील पाचही आरोपींविरोधात पोलिसांत मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी अवैध धंदेचालकांचा समूळ नायनाट करण्याचा विडाच उचलला आहे. त्यानुसार धडक कारवाईचा सिलसिला सुरुच ठेवत गावठी हातभट्टी दारुचे अड्डे उध्वस्त करत आहे. सदर धडाकेबाज कारवाई वरीष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप मिटके, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, संजय राठोड, देविदास कोकाटे आणि आरसीपी पथक यांनी केली आहे. या कारवाईचा अवैध धंदेचालकांनी धसका घेतला असून, महिलांनी जोरदार स्वागत केले आहे.