‘अरेऽ त्याला ओढू नका..’ म्हटल्याचा राग धरुन थेट कोयत्याने हल्ला! इंदिरानगरच्या क्रिकेट मैदानावरील थरार; पाचजणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवजयंतीच्या मिरवणुकीत सोबत असलेल्या मित्राला काहीजणांनी बळजबरी नाचण्यासाठी गर्दीत ओढले, त्यावर सोबतच्या तरुणाने ‘अरेऽ त्याला ओढू नका..’ असे म्हणतं विरोध केल्याचा राग आल्याने मिरवणुकीतच त्यातील काहीजण ‘त्या’ तरुणाला भिडले. मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. या दरम्यान एकमेकांना आव्हाने दिली गेल्याने किरकोळ कारणातून जागृत झालेला पूर्ववैमनस्याचा ज्वालामुखी तीन दिवसांनी रात्री इंदिरानगरच्या क्रिकेट मैदानावर जावून उसळला. ‘त्या’ प्रकरणातील पाचजणांनी तेव्हा विरोध करणार्‍या रोहीत वाळके याला भरमैदानात गाठून त्याच्यावर थेट कोयत्याने वार करीत त्याचा खून करण्याचा भयानक प्रयत्न केला. या घटनेत रोहीतला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी त्याच्या पत्नीने सोमवारी सायंकाळी उशिराने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी पाचजणांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्यातील अथर्व रासने याला अटक केली आहे. सदर प्रकरणाची सुरुवात आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखालील शिवजयंतीच्या मिरवणुकीत झाल्याने घटनेनंतर काहींनी या घटनेला ‘नशे’च्या व्यापाराशी जोडून त्याचे खापर आमदारांवर फोडण्याचाही प्रयत्न केला, मात्र जखमी तरुण बॅण्डवादक आणि मारहाण करणारे सामान्य श्रेणीतील तरुण असल्याचे समोर आल्याने त्यांचे राजकीय मनसुबेही उधळले गेले.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ममता वाळके यांना सदरचा प्रकार रविवारी (ता.22) रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या पतीचे मित्र लालु भरीतकर यांच्यामार्फत फोनद्वारा समजला. त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली असता त्यांच्या पतीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्या दरम्यान तक्रारदाराने आपल्या पतीसह त्यांच्या मित्राकडून घडलेला प्रकार जाणून घेतला व त्यानुसार सोमवारी (ता.23) सायंकाळी उशिराने शहर पोलीस ठाण्यात जावून तक्रार दाखल केली. त्याप्रमाणे बँजो वादनाचे काम करणारे त्यांचे पती रोहीत वाळके रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास इंदिरानगरच्या म्हसोबा मैदानावर सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेत सामना खेळण्यासाठी गेले होते.


रात्री साडेदहाच्या सुमारास रोहीत वाळकेचा मित्र लालु भरीतकर याने त्याच्या पत्नीला मोबाईलवर फोन करुन रोहीतला काहीजणांनी मारहाण केल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याचा निरोप दिला. त्यानंतर लागलीच त्यांनी रुग्णालयात धाव घेत घडला प्रकार पतीसह त्यांच्या मित्राकडून जाणून घेतला. त्यानुसार गुरुवारी (ता.19) शिवजयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत रोहीत वाळके त्याचा मित्र उत्तम काकडे सोबत असताना मिरवणुकीतील काही तरुणांनी उत्तमला नाचण्याचा आग्रह करुन बळजबरीने ओढले. त्यांच्या या कृतीवर रोहीतने ‘अरेऽ त्याला ओढू नका रेऽ..‘ असे सांगत विरोध करताच ‘त्या’ तरुणांचा पारा चढला आणि त्यांनी थेट त्याच्या अंगावर धावून जात वादाला सुरुवात केली. दोन्ही बाजूने हमरीतुमरी होवून एकमेकांना आव्हाने दिली गेली, मात्र शेवटी सामोपचाराने वादावर पडदा पडला होता.


मात्र त्या उपरांतही मिवणुकीत वाद घालणारे ‘ते’ तरुण जुन्या भांडणाचा राग मनात घेवून आपणास शोधत असल्याची कुणकूण रोहीतला लागली होती. मात्र त्यांच्याकडून थेट क्रिकेटच्या मैदानावरच जीवघेणा हल्ला होईल याबाबत तो अनभिज्ञ होता. रात्री साडेनऊच्या सुमारास रोहीत इंदिरानगरच्या म्हसोबा मैदानावर असताना अथर्व रासने, ओम काथे, साहील देवरे, सुमीत शेवंते व शनैश रोकडे हे पाचजण हातात कोयते घेवून अचानक तेथे आले. यावेळी रासनेने त्याला जीवे मारण्याच्या हेतूने थेट त्याच्या मानेवर कोयत्याचा घाव घातला. ओम काथेने खांद्यावर दुसरा घाव घालून त्याला अर्धमेले केले.


साहील देवरे, सुमीत शेवंते व शैनेश रोकडे यांनी त्याला कंबरेचा बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळलेला रोहीत जीवाच्या आकांताने मदतीची याचना करीत होता, मात्र आरोपींच्या हातात कोयते पाहून कोणीही त्याच्या मदतीला जाण्याचे धाडस दाखवत नव्हते. अशातच काहींनी सामुहीकपणे या मारहाणीला विरोध करीत जमावाने हल्लेखोरांकडे चाल केल्यानंतर पाचही तरुण पळून गेले. त्यानंतर तेथे जमलेल्या काहींनी तातडीने रुग्णवाहीकेद्वारा त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले.


याप्रकरणी सोमवारी जखमी रोहीतच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन वरील पाचजणांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 109 (खुनाचा प्रयत्न, दहा वर्ष), 191 (3) (सशस्त्र दंगल करणे, पाच वर्ष), 118 (1) (घातक हत्यारांनी दुखापत करणे, तीन वर्ष), 351 (2) (फौजदारी धाकदपटशा), 352 (शांतता भंग करणे) व 191 (2) (दंगल करणे, तिनही कलमान्वये प्रत्येकी दोन वर्ष) यासोबतच समान उद्दिष्टांसाठी बेकायदा जमाव जमवल्याच्या कलम 190 प्रमाणे या घटनेची दखल घेतली गेल्याने आरोप सिद्ध झाल्यास प्रकरणातील सर्व आरोपींना एकसमान शिक्षेचा सामना करावा लागू शकतो.


सदरच्या घटनेचा पहिला अध्याय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता.19) निघालेल्या मिरवणुकीत लिहिला गेला. नाचण्याच्या वादातून घडलेल्या हमरीतुमरीनंतर त्यावेळी वादावर पडदा पडला असे वाटत असताना एकमेकांशी असलेल्या पूर्ववैमनस्याने त्यात शिरकाव केल्याने त्याचे पडसाद तिन दिवसांनी रविवारी इंदिरानगरच्या म्हसोबा मैदानावर रक्तरंजीत स्वरुपात उमटले. या वादाची सुरुवात महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखालील शिवजयंती मिरवणुकीत झाल्याने रविवारच्या घटनेला त्याच्याशी जोडीत काहींनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा तर, काहींनी नशेच्या व्यापारातून दोन टोळ्यांच्या वादाचे स्वरुप देण्याचाही प्रयत्न केला, यावेळी मात्र तो फसला.

Visits: 3 Today: 3 Total: 1489132

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *