बरखास्तीची मागणी होताच संगमनेरच्या ‘डीबी’ला आवेश! बुडाखालीच नायलॉन मांजाचा साठा; पोलिसांनी पायदळी जात घातला छापा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मनुष्यबळाचा अभाव आणि अन्य जबाबदार्‍यांच्या कारणास्तव गुन्ह्यांचे तपास प्रलंबित राहु नयेत यासाठी पोलीसदलात ‘डिटेक्शन ब्रँच’ची संकल्पना रुजली. राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांमधील अशा शाखांनी बेतोड कामगिर्‍या बजावल्याच्या चर्चा आजही कानावर येतात. संगमनेर शहराच्या भूतकाळात ही शाखा सांभाळणार्‍या काही अधिकार्‍यांचा कार्यकाळ आजही आठवला जातो. अलिकडच्या काही वर्षात मात्र पोलिसांच्या याच डिटेक्शन शाखांचा वापर मूळ उद्देश सोडून वसुली करण्यासाठी होवू लागल्याने गुन्ह्यांच्या तपासाचे ओघळ वाढवून थैल्या भरण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यापूर्वी जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेतही असाच प्रकार राजरोसपणे सुरु होता, त्यावरुन मोठा गदारोळही झाला होता. त्यांचाच आदर्श घेवून संगमनेरची डिटेक्शन ब्रँच कार्यरत असताना गेल्या महिन्यातील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील तडजोडीवरुन शाखेतील दोघा कर्मचार्‍यांवर गंभीर आरोप लागल्याने ती बरखास्त करण्याचा दबाव वाढू लागला. त्यामुळे अचानक कर्तव्याची जाणीव झालेल्या प्रकटीकरण शाखेने गुरुवारी पूर्ण आवेशाने प्रकट होत पोलीस ठाण्यापासूनच अवघ्या शंभर पावलांच्या अंतरावर, चक्क त्यांच्याच बुडाखाली सुरु असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्री ठिकाणावर छापा घातला. या कारवाईत पोलिसांनी एकाला ताब्यात घेत त्याच्याकडून सतरा हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला. या कारवाईतून संगमनेरात जीवघेण्या नायलॉन मांजाची राजरोसपणे विक्री होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई गुरुवारी (ता.1) सायंकाळी सातच्या सुमारास पालिकेच्या नेहरु उद्यानाजवळ करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल विजय खुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सातपुते, पोलीस कॉन्स्टेबल आर.के.पांडे, विजय आगलावे व महिला पोलीस कॉन्स्टेबल मनीषा पुरी आदींसह पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर पावलांच्या अंतरावर असलेल्या नेहरु उद्यानाजवळील ‘विराज पतंग’ या ठिकाणावर पदयात्रेने जावून छापा घातला. या कारवाई दरम्यान दुकानाच्या झाडाझडतीत मोनु केटीसी अशा काहीतरी ब्रॅन्डच्या नावाने दडवून ठेवलेला 40 चक्री (रीळ) बंदी असलेला नायलॉन मांजा आढळून आला. त्या शिवाय माजांच्या विक्रीतून आलेले 1100 रुपये गल्ल्यात मिळाले.


प्रकटीकरण शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या निर्देशानुसार कारवाई करताना आरोपी विशाल गजानन बाप्ते (वय 35, रा.नेहरु उद्यान परिसर) याला ताब्यात घेत सगळा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 223 सह भारतीय पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम पाच प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास हेड कॉन्स्टेबल हासे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या कारवाईतून वारंवार दुर्घटना घडूनही संगमनेरात आजही नायलॉन मांजाची राजरोस विक्री होत असल्याचेही उघड झाले असून पालिका व पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे संतापही निर्माण होवू लागला आहे.


1970-80 या दशकांत मुंबईचे तत्कालीन आयुक्त ज्युलिओ रिबेरो व अरविंद इनामदार यांनी पोलिसांवरील वाढत्या जबाबदार्‍यांमध्ये प्रलंबित राहणार्‍या गुन्ह्यांच्या तपासावर लक्ष केंद्रीत करताना उपलब्ध मनुष्यबळातील निवडक कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या डिटेक्शन ब्रँचची संकल्पना रुजवली. त्यांच्या या निर्णयातून प्रशासकीय सोयही झाली आणि कामाचे वर्गीकरण होवू लागल्याने कर्मचार्‍यांवरील कामाचा ताणही कमी झाला. नंतरच्या काळात राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारच्या शाखांची स्थापना होवू लागली. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एखाद्या दुय्यम अधिकार्‍याकडे शाखेचे नेत्तृत्व देवून त्यांच्या हाताखाली आठ-दहा कर्मचार्‍यांची नियुक्ति केली जाते.


पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेप्रमाणे रचना असलेल्या या शाखेतंर्गत राज्यात आजवर अनेक जटील प्रकरणांची उकलही झाली आहे आणि कुख्यात गुन्हेगार गजाआडही गेले आहेत. शहराच्या इतिहासातही अशाकाही घटनांची नोंद आहे, त्यांची आजही आठवण काढली जाते. मात्र गेल्याकाही वर्षात काही ठिकाणच्या या शाखेचा मूळ उद्देश बदलला असून या शाखांकडून हाती आलेल्या प्रकरणाच्या तपासाची नाहक व्याप्ती वाढवून थैल्या भरण्याची वृत्ती वाढत आहे.


जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेत यापूर्वी असाच प्रकार सुरु होता. सायबर विभागात सामान्य कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला ‘भाऊ’ गुन्ह्यांची व्याप्ती वाढवून चांगल्यांना नागवण्यासह तपासातून हाती आलेला मुद्देमाल आणि गुन्हा दोन्ही अलिबाबाच्या गुहेत गुडूब करीत होता. अगदी कनिष्ठ कर्मचारी असूनही ओरबाडण्याची त्याची कला पाहून त्याला दीर्घकाळ म्हणायला सायबर नियुक्ति दाखवून चक्क गुन्हेशाखेचा ‘सुपर पदभार’ देण्यात आला होता. या भयानक लुटालुटीवरुन दक्षिणेच्या खासदारांनी उपोषणाचे महानाट्य उभारुन नंतर ‘सरबतावर’ तंबूही उतरवला होता. याच शाखेचा आदर्श आता स्थानिक पातळीवरही ‘प्रकट’ होत असून गेल्या महिन्यात मोटार सायकलसह पकडलेल्या चक्क चोरट्याशीच तडजोड करुन प्रकटीकरणच्या दोघा कर्मचार्‍यांनी त्याला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार चर्चेत आला आहे.


त्यावरुन एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने पोलीस उपअधिक्षकांकडे तक्रारही केली असून गेल्या महिन्यात 8 डिसेंबरोजी बजाज प्लॅटीना (क्र.एम.एच.12/पी.व्ही.2070) या चोरीच्या दुचाकीचा दाखला देत दोघा कर्मचार्‍यांवर गंभीर आरोपही केले आहेत. संगमनेरची डिटेक्शन ब्रँच गुन्ह्याची उकल करण्याऐवजी वसुलीचा उद्योग करीत असल्याचा आरोपही या महाशयांनी केला असून ही शाखा बरखास्त करावी अशी विनंतीही केली आहे.

मागील काही दिवसांत घडलेल्या गंभीर प्रकरणांसह अमलीपदार्थांच्या तपासात समाधानकारक प्रगती नसल्याने संगमनेर पोलिसांवर संशयाचे मळभ दाटत असतानाच गेल्या महिन्यात शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील दोघा कर्मचार्‍यांनी एका मोटार सायकल चोराला पकडल्यानंतरही निवडून आलेल्या एका नव्याकोर्‍या नगरसेवकाच्या मध्यस्थीने त्याला चक्क सोडून दिले. यावरुन संगमनेरच्या कथीत डिटेक्शन बँचमध्ये काय सुरु आहे, यावरील पडदा हटण्यासह या शाखेच्या असण्यावरही प्रश्‍न निर्माण होवू लागल्याने अस्तित्वाच्या जाणीवेतून अचानक आवेशात आलेल्या प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता.1) आपल्याच बुडाखाली अवघ्या शंभर पावलांवर असलेल्या गळाकापू मांजा विक्री केंद्रावर छापा घालून मोठा साठा जप्त केला.

Visits: 74 Today: 3 Total: 1414136

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *