नगर जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांवर प्रशासक राज! विद्यमान कौंसिलची मुदत संपली; संगमनेरचा भार प्रांताधिकार्‍यांवर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व प्रक्रीया वेळेत पूर्ण करण्यात अपयश आल्याने व सद्यस्थितीतही प्रभाग रचनेसह ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कायम असल्याने राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला आहे. त्या अनुषंगाने आजपासून पुढील तीन दिवसांत मुदत संपणार्‍या नाशिक विभागातील 29 नगर परिषदांसह अहमदनगर जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी बजावले आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील बहुतेक सर्वच नगरपरिषदांवर प्रशासक राज सुरु होणार आहे. सोमवारी शिर्डी नगरपंचायतीची मुदत संपल्याने तेथील कार्यभार आता शिर्डीच्या उपविभागीय अधिकार्‍यांच्या खांंद्यावर टाकण्यात आला आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये राज्यात दाखल झालेल्या कोविडचा मुक्काम अजूनही कायम आहे. त्यातच ओमिक्रॉन विषाणूंची दहशत निर्माण होवू लागल्याने व बाधित रुग्णांची संख्याही वाढत असल्याने राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच गेल्या वर्षभर राज्य सरकारसह संपूर्ण शासकीय यंत्रणा कोविड विषाणूंचा मुकाबला करण्यात व्यस्त असल्याने चालू वर्षात मुदत संपणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकपूर्व प्रक्रीया राबविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरल्यावेळी होवू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्यावर ओमिक्रॉन या नव्या विषाणूंचे संकटही घोंगावत असल्याने राज्य मंत्रिमंडळाने यापुढील कालावधीत होणार्‍या सर्वच निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहारही केला आहे.

शासन आदेशानुसार नाशिक विभागीय आयुक्त डॉ.राधाकृष्ण गमे यांनी कौंसिलची मुदत संपणार्‍या आपल्या कार्यक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील 29 नगरपरिषदांमध्ये पुढील दोन दिवसांत प्रशासकीय पदभार स्वीकारण्याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 27 डिसेंबर रोजी मुदत संपलेल्या शिर्डी नगरपरिषदेचा पदभार आता तेथील उपविभागीय अधिकार्‍यांकडे आला असून बुधवारी कोपरगाव, राहाता व राहुरी नगरपरिषदेचा कार्यभार तेथील मुख्याधिकार्‍यांकडे तर श्रीरामपूरचा कार्यभार उपविभागीय अधिकारी स्वीकारणार आहेत. तर गुरुवारी (ता.30) संगमनेर नगरपरिषदेचा कार्यभार उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांच्याकडे तर देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा कार्यभार श्रीरामपूरच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडे असणार आहे.

याशिवाय बुधवारी नाशिक विभागातील सिन्नर, येवला, भगूर व सटाणा नगरपरिषदेचा कार्यभार प्रांताधिकार्‍यांकडे, तर मनमाड व नांदगाव नगरपरिषदेचा कार्यभार मुख्याधिकार्‍यांकडे जाणार आहे. आजपासून धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेचे कामकाज तेथील तहसीलदार तर शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेचा कार्यभार उपविभागीय अधिकारी सांभाळणार आहेत. बुधवारी नंदूरबारमधील शहादा तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अंमळनेर, चोपडा, पाचोरा, फैजपूर, रावेर, सावदा व यावल नगर परिषदेत उपविभागीय अधिकारी तर पारोळा, एरंडोल, धरणगाव व चाळीसगाव नगरपरिषदेत मुख्याधिकारी कामकाज पाहणार आहेत.

अपूर्ण असलेली निवडणूकपूर्व प्रक्रीया व ओमिक्रॉनचे संकट यासह सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झालेले ओबीसी आरक्षण या पार्श्वभूमीवर आगामी काळात मुदत संपणार्‍या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबण्याची शक्यता निर्माण झाली होती. राज्य मंत्रिमंडळानेही निवडणुका पुढे ढकलण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार करुन त्यावर शिक्कामोर्तब केल्याने राज्यात होवू घातलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम अनिश्चित झाला असून येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील बहुतेक सर्वच नगरपरिषदांवर प्रशासकांचा अंमल निर्माण होणार आहे.

Visits: 145 Today: 2 Total: 1102813

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *