अतिक्रमण धारकांकडून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ व धमकी! संगमनेरच्या लखमीपूऱ्यातील प्रकार; चक्क विश्वस्तांनीच अतिक्रमण करुन उभारली होती दुकाने..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराच्या पूर्वेकडील लखमीपूरा भागातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील लखमीपूरा मशिदीच्या विश्वस्त मंडळाने अतिक्रमण करुन त्यावर दुकाने थाटली होती. ती हटवण्यासाठी गेलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह अतिक्रमण विरोधी पथकाशी दोघांनी हुज्जत घालीत त्यांना शिवीगाळ व धमक्या देण्यास सुरुवात केली. यावेळी एजाज शेख उर्फ एजाज सुन्नी याने आवेशात येवून हातातील कागदांचा गठ्ठा मुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर भिरकावला. यावेळी त्याने ‘तुझे देख लूंगा, मैं फिरसें यही दुकान लगाऊंगा..’ अशी धमकीही भरली. या प्रकाराने काहीवेळ गोंधळ उडाला, मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन लक्ष्मीपुऱ्यातील रफिक शेख उर्फ रफिक सुन्तानी व सारिक शेख उर्फ सऱ्या अशा दोघांवर सरकारी कामात अडथळा आणण्यासह शिवीगाळ व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संबंधितांविरोधात रोष व्यक्त होत असून कठोर कारवाई  करण्याची मागणी होत आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेला माहितीनुसार सदरची घटना आज गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास लखमीपूरा परिसरात घडली. या परिसरात चक्क लखमीपुरा पंच ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मुस्ताक बेग व इतर भोगवटादारांनी पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून ती जागा परस्पर शेख रफिक इजाजुद्दीन शेख उर्फ रफिक सुन्नी याला भाड्याने दिली. सुन्नी याने या जागेत ‘इंडिया पाटा’ नावाने दुकान थाटले. याबाबत परिसरातील फैज रहमतुल्ला यांच्यासह दोन डझन नागरिकांनी सदर ठिकाणचे अतिक्रमण काढण्याबाबत पालिकेकडे निवेदन दिले होते. त्याची दखल घेत पालिकेने गेल्या चार महिन्यांपासून लखमीपूरा पंच ट्रस्ट व संबंधित भोगवटादार रफिक सुन्नी यांना नोटिसा बजावून अतिक्रमण काढून घेण्यास सांगितले होते. मात्र वेळोवेळी सांगूनही दोघांकडूनही कोणतीही कृती घडली नाही.
त्यामुळे अखेर 5 डिसेंबर रोजी संगमनेर नगरपालिकेने अंतिम नोटीस बजावताना संबंधित अतिक्रमण धारकाला शेवटची संधी दिली. मात्र त्यानंतरही त्याच्याकडून कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर 12 डिसेंबर रोजी पालिकेच्या पथकाने सदर जागेवर जाऊन शेख रफिक इजाजुद्दीन उर्फ रफिक सुन्नी याला  24 तासात स्वखर्चाने अतिक्रमण काढून घेण्याची सूचना दिली. त्यानेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पथकाला माघारी पाठवले. मात्र प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी अतिक्रमण काढण्याऐवजी त्याने सदरील जागेला बॅरिकेटिंग केले व तेथे धार्मिक झेंडा फडकावून त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्याधिकारी राहुल वाघ, शहर अभियंता प्रशांत जुन्नरे अतिक्रमण विभागप्रमुख सुदाम सातपुते व सहाय्यक नगररचनाकार शुभम देसले यांनी त्याकडे दुर्लक्ष करून आज दुपारी पालिकेच्या जेसीबीसह सदरील अतिक्रमणावर कारवाई सुरु केली.
तत्पूर्वी मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी संबंधित अतिक्रमण धारकाला त्या जागेतील त्याच्या चीजवस्तू व अन्य सामान काढून घेण्यासाठी आवश्यक वेळही दिला होता. त्यानुसार तेथून सामान हलविल्यानंतर काही क्षणातच रफिक शेख याने अचानकपणे आपल्या हातातील कागदपत्रे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या दिशेने भिरकावली व तो त्यांच्या अंगावर धावून गेला. यावेळी त्याने मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत ‘तुझे देख लूंगा, फिरसे यही दुकान लगाऊंगा..’ अशी धमकीही भरली. हा प्रकार सुरु असतानाच दुसरा आरोपी सारिक शेख उर्फ सऱ्या याने पालिकेच्या जेसीबी चालकासह अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धमकी देण्यास सुरुवात केली. मात्र या सर्वांनी त्याला भीक घातली नाही व आपली कारवाई सुरूच ठेवली.
याप्रकरणी सायंकाळी उशिराने मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी रफिक एजाजुद्दीन शेख उर्फ रफिक सुन्नी व सारीक एजाज शेख उर्फ सऱ्या या दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व धमकी दिल्यावरुन भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली असून सदरच्या प्रकाराने जनमानसात रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
Visits: 31 Today: 1 Total: 117280

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *