अहिल्यानगर महापालिकेत निवडणुकीपूर्वीच महायुतीचा गुलाल! विखे-जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवकांचा निकाल बिनविरोध..

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रिया होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमधील निकालांची परंपरा कायम ठेवत भाजपने महापालिकेतही विजयाचा गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच महायुतीचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शहराच्या राजकारणात मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप-राष्ट्रवादी महायुतीने शहराच्या राजकारणात ठोस पकड निर्माण केल्याचे चित्र दिसू लागले आहे.

प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरु झाल्यानंतर प्रभाग क्रमांक सातमधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पुष्पां अनिल बोरुडे आणि प्रभाग क्रमांक सहामधून करण कराळे आणि सोनाबाई शिंदे हे तिघे तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गटानेही या निवडणुकीत विजयी सलामी हदली असून प्रभाग क्रमांक 8 मधील कुमार वाकळे आणि प्रभाग क्रमांक 14 मधील प्रकाश भागानगरे यांची निवडही बिनविरोध झाली आहे.

एकंदरीत निवडणुकीची धामधूम सुरु होताच पहिल्या टप्प्यातच भाजप-राष्ट्रवादी अर्थात विखे-जगताप जोडीने विजयाचा रणशंख फूंकल्याने अहिल्यानगरच्या राजकारणात महापालिकेची सत्ता एकहाती जाण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या रणनितीमुळे भाजपचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे.

भूतो न भविष्यती अशी बिनविरोध निवड : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महायुतीचे तब्बल पाच नगरसेवक बिनविरोध निवडून येणे ही घटना राजकीय वर्तुळात ‘न भूतो न भविष्यती’ अशी मानली जात आहे. निवडणूकपूर्व टप्प्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध यश मिळाल्याने मतदारांना महायुतीच्या संघटनात्मक ताकदीचाही अंदाज आला आहे.

निकालाबाबत ठाम विश्वास : येत्या 16 जानेवारीला जाहीर होणारा निकाल भाजप-राष्ट्रवादी महायुतीचाच असेल, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत व्यक्त केला जात आहे. बिनविरोध विजयामुळे महायुतीचे पारडे निवडणुकीपूर्वीच जड झाल्याचे चित्र आहे. सहानुभूती डॉ.सुजय विखेंकडेच : खासदारकीच्या निवडणुकीत पराभव झाला असला, तरीही डॉ.सुजय विखे-पाटील यांनी त्यानंतरही शहरासाठी सातत्याने काम सुरू ठेवले. विकासकामांकडे लक्ष देणे, विविध योजनांसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आणि नागरिकांशी थेट संपर्क ठेवणे या भूमिकेमुळे त्यांच्याविषयी शहरात सहानुभूती निर्माण झाली आहे. खासदार असताना राबवलेल्या विकासकामांचा ठसा आणि त्यानंतरही कायम राहिलेली सक्रियता याच जोरावर पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे बोलले जात आहे. यामुळे नेतृत्वावरचा जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसते.

अहिल्यानगरच्या विकासाचा विश्वासार्ह चेहरा म्हणून अहिल्यानगर शहराचा विकास डॉ.सुजय विखे-पाटील आणि संग्राम जगताप हेच प्रभावीपणे करू शकतात, हे या निवडणूक प्रक्रियेतून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची भावना राजकीय व सामाजिक स्तरावर व्यक्त होत आहे. एकूणच, बिनविरोध निवडी आणि निर्माण झालेली सहानुभूती यामुळे महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

