‘लव्ह जिहाद’च्या सूत्रधाराचा जामीन फेटाळला! औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय; सहा महिन्यांपासून कारागृहात कैद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अल्पवयीन मुलीला भिन्न धर्माच्या मुलाशी प्रेमसंबंध निर्माण करण्यास लावून वयात आल्यानंतर ‘षडयंत्र’ रचून तिचे अपहरण, धर्मांतरण आणि निकाह लावल्याप्रकरणी गेल्यासहा महिन्यांपासून गजाआड असलेल्या घारगावच्या युसुफ दादा चौगुले याचा जामीनअर्ज फेटाळण्यात आला आहे. संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने सप्टेंबरमध्येच त्याचा जामीन फेटाळला होता, त्यानंतर आता उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याने आरोपीच्या अडचणी वाढल्या असून त्याच्यासमोर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम पर्याय शिल्लक आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत तिघांना अटक झाली असून त्यातील दोघांची सुटका झाली आहे. तर, प्रत्यक्ष निकाह करणार्यासह त्याचे दोघे साथीदार अद्यापही पसार असून ते नेपाळमध्ये पळून गेल्याचा संशय आहे.

गेल्यावर्षी 7 जुलै 2024 रोजी सदरची घटना समोर आली होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणार्या एका 15 वर्षीय मुलीला आरोपी युसुफ दादा चौगुले याने शादाब तांबोळी नावाच्या मुलाशी ओळख करुन देत त्याच्याशी प्रेमसंबंध निर्माण करण्यासाठी तिच्यावर दबाव निर्माण केला होता. मात्र महिन्याभरातच मुलीच्या घरी सदरचा प्रकार समजल्याने त्यावेळी ‘चौगुले’च्या षडयंत्राला ब्रेक लागला. मात्र दहावीनंतर सदरील मुलीने संगमनेरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेताच चौगुलेने पुन्हा आपल्या षडयंत्राला नव्याने सुरुवात करुन शादाबसह त्याचा साथीदार कुणाल शिरोळे याला वारंवार संगमनेरात पाठवून त्या मुलीशी शादाब बळजबरीने लगड करीत असल्याची छायाचित्र काढून घेतली व नंतर त्याचा वापर करुन तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले.

काही दिवसांच्या या प्रकारानंतर पीडितेने पुणे जिल्ह्यातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र युसुफने तेथेही तिचा पीच्छा पुरवताना शादाबला वेळोवेळी तिच्या वसतीगृहावर पाठवले. त्यातून दोघांमध्ये खडाजंगी होवून पीडित मुलीने पुन्हा वसतीगृहात आल्यास अथवा संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. त्याचवेळी दोघांनीही परस्पर सहमतीने आपले प्रेमसंबंध संपुष्टात आणले व दिल्या-घेतल्या भेटवस्तू एकमेकांना परत करीत आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. मात्र मनात ‘लव्ह जिहाद’ घडवून आणण्याचे षडयंत्र घेवून सुरुवातीपासूनच ‘त्या’ मुलीला हेरणार्या युसुफ चौगुलेने मात्र त्यानंतरही माघार घेतली नाही. त्यातूनच त्याने 7 जुलै 2024 रोजी शादाबकरवी पीडितेशी संपर्क साधला.

यावेळी शादाबने तिच्याशी भावनिक संवाद साधून ‘शेवटदा’ बोलू असे सांगत तिला मंचरला बोलावले. त्यावेळी त्याच्यासोबत युसुफ चौगुले आपल्या चारचाकी वाहनासह हजर होता. त्यांनी पीडित मुलीला ‘त्या’ वाहनात बसवून कार पुण्याच्या दिशेने घेतल्यानंतर तिने त्याला विरोध केला. त्यावेळी शादबने तिला दमबाजी केली तर, युसुफ चौगुलेने पाण्यात गुंगीचे औषध कालवून तिला बेशुद्ध केले. नंतर चाकणजवळ येताच युसुफने त्या सर्वांसाठी साकूरच्या अमर पटेल यांच्या कारची व्यवस्था करीत त्यांना मुंबईला पाठवले. तेथील आयाज पठाण व आदिल शेख यांनी सानपाड्यात त्यांच्या राहण्याची व नंतर बांद्रा येथील एका मौलवीकरवी धर्मांतरण करुन निकाह लावून देण्याची व्यवस्था केली. या दरम्यानच्या तीन दिवसांत आरोपी शादाब तांबोळी याने पीडितेवर वारंवार शारीरिक अत्याचारही केले.

पठारावरील मुलीचे मंचरमधून अपहरण करुन तिचा निकाह लावला गेल्याचे वृत्त समोर आल्यानंतर संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी पठारभागात मोर्चा काढल्याने पोलिसांवरील दबावही वाढला. त्यातूनच 10 जुलैरोजी शादाब तांबोळीसह पीडित मुलीला घारगाव पोलिसांसमोर हजर करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ केला गेल्याने तिची प्रकृती ढासळली, त्यामुळे पोलिसांनी पीडितेला तिच्या कुटुंबियांकडे सोपवले. उपचार पूर्ण झाल्यानंतर 27 जुलैरोजी पीडित 19 वर्षीय तरुणीने घारगाव पोलिसांसमोर संपूर्ण घटना कथन केली. त्यावरुन पोलिसांनी फसवणूक, अपहरण, अत्याचार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोक्सो) कलमान्वये गुन्हा दाखल करीत त्याच दिवशी रात्री उशिराने या प्रकरणाचा ‘मास्टर माईंड’ युसुफ दादा चौगुले (वय 27, रा.घारगाव) याच्या श्रीरामपूरातून मुसक्या आवळल्या.

तेव्हापासून तो कारागृहातच आहे. या दरम्यान पोलिसांनी मुंबईतील आदिल शेखसह साकूरमधील अमर पटेल यालाही अटक केली. कालांतराने त्या दोघांसह युसुफनेही संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केले. मात्र न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर करताना त्याचा अर्ज मात्र सप्टेंबरमध्येच फेटाळला होता. त्याविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र तेथूनही त्याला दिलासा मिळाला नाही. न्यायमूर्ती अभय वाघवसे यांच्यासमोर झालेल्या सविस्तर सुनावणीनंतर त्यांनी युसुफ चौगुलेचा या प्रकरणात सुरुवातीपासूनचा संबंध असल्याचे व तो पसार आरोपीचा जवळचा मित्र असल्याचे निरीक्षण नोंदवताना पीडितेशी ओळख करुन देत तिचे अपहरण करुन नेण्यातही त्याची मुख्य भूमिका असल्याचे प्राप्त पुराव्यांवरुन दिसत असल्याने त्याचा जामीनअर्ज फेटाळला. त्यामुळे चौगुलेच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली असून आता त्याच्यासमोर सुटकेसाठी केवळ सर्वोच्च न्यायालयाचा एकमेव पर्याय बाकी आहे.

गेल्या वर्षातील जुलैमध्ये घडलेल्या या घटनेनंतर संगमनेरात मोठा जातीय तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून आरोपीला पीडितेसह घारगाव पोलिसांना शरण येण्यास भाग पाडले. शिवाय तक्रार दाखल झाली त्याच दिवशी मुख्य सूत्रधार युसुफ दादा चौगुले याच्याही श्रीरामपूरातून मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आत्तापर्यंत सहा आरोपी समोर आले असून त्यात मुंबईच्या आदिल शेखसह साकूरच्या अमर पटेल या दोघांना अटक व नंतर सुटका झाली आहे. तर, पीडितेशी निकाह करणार्या शादाब तांबोळीसह त्याला सहाय्य करणारे कुणाल शिरोळे आणि आयाज पठाण (मुंबई) हे अद्याप पसार असून तिघेही नेपाळमध्ये पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.

