महिलेला संमोहित करुन दागिन्यांसह लाखोंचा गंडा! पठारभागातील खटल्याचे कुटुंब फसले; दहा वर्षांपासून सुरु होता प्रकार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अघोरी विद्येचा वापर करुन तुमच्यावरील आरिष्ट दूर सारतो, तुमचे कल्याण करतो अशी भाबडी आशा दाखवून एका भामट्याने पठारभागातील एका खटल्याच्या कुटुंबाची लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल दहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या जादुटोण्याच्या या खेळात ‘त्या’ भोंदूने कुटुंबातील एका महिलेला हेरुन संमोहित केले व तिच्या माध्यमातून घरातील रोकडसह दागिन्यांवरही डल्ला मारला. धक्कादायक म्हणजे या दरम्यान संमोहित महिलेसह तिच्या एका मुलाने सोनाराकडे गहाण ठेवलेले दागिनेही सोडवून आणले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर केलेल्या पडताळणीत सोडवलेल्या दागिन्यांसह घरातील अन्य महिलांचे दागिने व मोठी रोकडही गायब असल्याचे समोर आले. या प्रकरणी पीडित महिलेच्या मुलाने घारगाव पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी बाळासाहेब पोटे नामक भोंदूबाबासह त्याच्या पत्नीवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पोलिसांनी ‘त्या’ भोंदूला लवकरात लवकर अटक करुन त्याने अशाप्रकारे आणखी किती जणांची फसवणूक केली असेल याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेची सुरुवात दहा वर्षांपूर्वी 2014 साली झाली. व्यवसायानिमित्त सध्या भोसरीत वास्तव्यास असलेल्या एका 31 वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीप्रमाणे त्याचे आई-वडिल, भाऊ, आजी-आजोबा, चुलते व त्यांचे कुटुंबिय पठारभागात एकत्रितपणे राहतात. परिसरात या कुटुंबाकडे खटल्याचे घर म्हणूनही बघितले जाते. दहा वर्षांपूर्वी कथीत महाराज असलेला बाळासाहेब पोटे एकासह या कुटुंबाकडे आला. त्यावेळी त्याने कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्याची भेट घेत मी जादुटोणा करुन ‘तुमच्या परिवारावरील आरिष्ट दूर सारतो, तुमच्या सर्वांचे कल्याण करतो, मला पैसे आणि बकरु द्या..’ अशी मागणी केली.

किरकोळ गोष्टीने सगळ्यांचे भले होणार असेल तर काय हरकत आहे? असा भाबडा विचार करुन त्यांनीही भोंदूबाबाच्या आकड्यात फसून त्याला पाच हजार रुपये रोख आणि एक बकरु दिले. या दरम्यान त्याने घरातील अन्य लोकांना बढाया मारुन कच्चा दूवा हेरला आणि त्यातील फिर्यादी तरुणाच्या आईला संमोहित करुन त्यांचा मोबाईल क्रमांक मिळवला. या प्रकारानंतर पोटे नावाच्या ‘त्या’ भोंदूने पीडित महिलेकडून घरातील सर्व चीजवस्तूंची माहिती घेतली. धक्कादायक म्हणजे या कालावधीत ‘त्या’ महिलेसह तिच्या दुसर्या मुलाने साकूरमधील एका सोनाराकडे किरकोळ रकमेच्या बदल्यात गहाण ठेवलेले दागिनेही सोडवून आणले. वर्षभराने 2015 मध्ये भोंदूबाबा पोटे पुन्हा पीडित महिलेच्या घरी आला आणि तिच्याकडून दीड लाख रुपयांची रोकड घेवून गेला.

गेल्यावर्षी जुलैमध्ये सायंकाळी अचानक दोघेजण घरी आले व त्यांनी बाळासाहेब पोटे याचे नाव सांगत धान्य व पैशांची मागणी केली. तसे करण्यास नकार दिल्यानंतर घरी आलेल्या इसमांनी मोबाईलवर फोन करुन विधाते नावाच्या महिलेशी संपर्क करुन दिला असता सदरची मदत बोटा आश्रमशाळेसाठी असल्याचे सांगितले गेले. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबाने गोणी भरुन बाजरी आणि सहाशे रुपये देत त्यांची पाठवणी केली. येथून ते दोघे बाजूलाच राहणार्या फिर्यादीच्या चुलतीकडे गेले व त्यांच्याकडूनही पाटीभर बाजरी घेवून गेले. या दोन्ही घटना संशयात्मक वाटल्याने पीडित कुटुंबाने घरातील ऐवजाची मोजदाद केली असता त्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. कपाटातील पीडित महिलेची पोतं, कर्णफूले, डोरलं, मंगळसूत्रासह फिर्यादीच्या भावजयीचे सुमारे दीड लाखांचे दागिने आणि जवळपास पाच लाख रुपयांची रक्कम गायब असल्याचे त्या सगळ्यांना दिसून आले.

या ऐवजाबाबत फिर्यादी व त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी पीडित महिलेकडे चौकशी केली असता ती पोटे महाराजांना दिल्याचे सांगते, मात्र अधिक चौकशी करता थेट अंगावर धावून येत मारहाण करुन स्वतःचेही जीवन संपवण्याचा प्रयत्न करते. इतक्या सगळ्या प्रकारानंतरही पीडित महिला पोटे महाराजाला दीड लाख देण्याची मागणी करीत असल्याने पीडित कुटुंबाने तिची समजूत घालून अहिल्यानगरच्या मानसोपचार तज्ञांकडून उपचारही सुरु केले. भोंदू पोटेबाबाशी संपर्क होवू नये यासाठी त्यांचा मोबाईल कायमस्वरुपी बंदही केला गेला, मात्र रुग्णालयात असतानाही पीडित महिला आपल्या सुनेचा मोबाईल वापरुन त्याच्या सातत्याने संपर्कात असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. संबंधित भोंदूबाबाने आपल्या आईला संमोहित करुन आजवर लाखों रुपयांच्या दागिन्यांसह रोकड गायब केली असून आजही संपर्कात राहून तो ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे आपली आई कृती करीत असल्याने त्याच्यावर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

त्यानुसार घारगाव पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा या प्रतिबंध करणार्या कायद्याचे कलम 2 (बी) व 3 (2) प्रमाणे भोंदूबाबा बाळासाहेब पोटे व त्याची पत्नी सिंधू या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एखाद्या कुटुंबाच्या संपर्कात येवून कुटुंबातील महिलेला संमोहित करुन सलग दहा वर्ष लुटण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर घारगाव पोलिसांनी त्याचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपासाला गती देवून त्या भोंदूबाबाला गजाआड करण्याची गरज होती. एखाद्या व्यक्तिला इतक्या वर्ष संमोहित ठेवणार्या या भोंदूने अन्य ठिकाणीही अशाप्रकारचे कृत्य केलेले असू शकते. मात्र पोलिसांना या घटनेमागील गांभीर्यच लक्षात न आल्याने गुन्हा समोर येवून 24 तास उलटल्यानंतरही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.

पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणार्या संगमनेर तालुक्यात अशाप्रकारच्या घटना अभावानेच समोर आल्या आहेत. दहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या पठारभागातील या धक्कादायक घटनेत मात्र फसवणूक झालेल्या ‘त्या’ कुटुंबातील पीडित महिलेने आरोपी भोंदूबाबा सांगेल तशी कृती करीत त्याला घरातील दागदागिने व रोकड दिल्यानंतर चक्क सोनाराकडे किरकोळ रकमेपोटी गहाण असलेले दागिने सोडवून ते देखील त्याच्या घशात घातले. या घटनेत पीडितेच्या सुनेकडील दीड लाखांच्या ऐवजासह घरातील पाच लाखांची रोकड गायब असल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. शिवाय इतके सगळे घडूनही आरोपी आजही पीडितेच्या संपर्कात राहून लुटीचा खेळ करीतच असताना घारगाव पोलिसांचा ढिम्मपणा प्रश्न निर्माण करणारा असून किमान अशा प्रकरणांमध्ये तरी पोलिसांनी संवेदना दाखवण्याची गरज आहे.

