टक्का वाढल्याने प्रस्थापितांसह ‘भावीं’ची धाकधूक वाढली! पाच प्रभागात पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक; धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिनाभरापासून शहराच्या कानाकोपर्यात उठलेली निवडणुकीची राळ मंगळवारी मतदानाच्या समाप्तीने जमिनीवर आली. प्रत्यक्ष निकालासाठी तीन आठवड्यांची मोठी प्रतिक्षा असल्याने या काळात शहरात राजकीय चर्चांना फोडण्याही मिळणार असून निकालापूर्वीच त्याचा संपूर्ण किसही काढला जाईल. विविध नाट्यमय घडामोडी, आरोप-प्रत्यारोप, शक्तिप्रदर्शनाने शिखरावर पोहोचलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांचा उत्साह देखील मोठा होता. कडाक्याच्या थंडीत संथ सुरुवात होवूनही बहुतेक प्रभागात 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याने निकालाबाबत उत्कंठाही ताणली गेली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी सेवा समितीची संकल्पना मांडून त्या माध्यमातून आपले ‘व्हिजन’ समोर ठेवले आहे. तर, महायुतीकडून दिल्ली ते गल्लीचा नारा देत आमदार अमोल खताळ यांनी विकासाचा मंत्र दिला आहे. या दोघांमधील कोणावर संगमनेरकरांनी विश्वास दाखवलाय हे अधिकृतपणे समोर येण्यासाठी अद्याप प्रतिक्षा आहे. मात्र यावेळच्या निवडणुकीत काही प्रभागांसह एकूण वाढलेला मतदानाचा टक्का सर्वच इच्छुकांची धाकधूक तर, काही प्रभागातील प्रस्थापितांचा रक्तदाब वाढवणारा ठरला आहे. त्यातून यंदा काही धक्कादायक निकाल लागतील असेही अंदाज वर्तवण्यास सुरुवात झाली आहे.

अनेक घडामोडींनी भरलेल्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत अंतिमतः आमदार सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखालील संगमनेर सेवा समिती आणि आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखालील महायुती यांच्यातच खरी लढत झाली. काही प्रभागात महायुतीला आपले चिन्ह देता आले नाही, तर राष्ट्रवादीच्या बंडखोरीने सहा प्रभागांमध्ये तिरंगी लढतीही झाल्याचे समोर आले. अपक्ष, शहर आघाडी की, महाविकास आघाडी अशा प्रश्नार्थक शंकेपासून सुरु झालेल्या यावेळच्या निवडणुकीत विकास, निधी, आरोप-प्रत्यारोप अशा सगळ्या गोष्टींसह दोन्ही बाजूने एकमेकांची शक्ति दाखवण्याचा प्रयत्न झाल्याने यावेळच्या निवडणुकीत वेगळेच रंग भरले गेले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धावपळ करीत अगदी शेवटच्या क्षणी धापा टाकीतच मंचावर येवून केलेले भाषण शहरात निर्माण झालेल्या समांतर वातावरणाला छेद देवून गेले. संगमनेरच्या सहकारी औद्योगिक वसाहतीला पर्याय म्हणून शासकीय औद्योगिक वसाहत आणि शहराबाहेर नेलेल्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबत त्यांनी वापरलेला ‘ऑनलाईन’ मंजूरीचा फंडा संगमनेरकरांवर प्रभाव टाकून गेला. संगमनेर सेवा समितीने त्याला प्रत्यूत्तर म्हणून नाशिकरोडवर महामार्गावरच सभा घेवून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवाय या सभेतून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदार सत्यजीत तांबे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या ‘ऑनलाईन’ मंजूरीचा भंडाफोड करताना त्यांनी अन्य ठिकाणी अशाचप्रकारे केलेल्या घोषणाही मंचावरुन मतदारांना ऐकवल्या. त्यातून संगमनेरच्या निवडणुकीची रंगत अगदी शिगेला पोहोचली होती.

मतदानाच्या एक दिवस अगोदरपर्यंत प्रचाराची संधी असल्याचा परिपूर्ण लाभ घेत आमदार अमोल खताळ यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह तर, संगमनेर सेवा समितीने माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, डॉ.जयश्री थोरात यांच्यासह मोटर सायकल रॅली काढून एकमेकांना राजकीय आव्हान देत आपापल्या शक्तिचे प्रदर्शन केले. मंगळवारी प्रत्यक्ष मतदानातही हा उत्साह दिसून आला. सध्या शहरातील थंडीचा पारा निचांकी पातळीकडे सरकत असल्याने सकाळच्या सत्रातील पहिल्या दोन तासांत मतदारांचा निरुत्साह दिसून येत होता. या कालावधीत अवघ्या 8.88 टक्के मतदानाची नोंद झाली. मात्र त्यानंतरच्या दोन तासांत मतदान केंद्रावरील गर्दी वाढल्याचे बघायला मिळाले. सायंकाळपर्यंत याच गतीने मतदान प्रक्रिया सुरु होती.

मंगळवारी शहरात सरासरी 72.75 टक्के मतदानाची नोंद झाली असली तरीही सर्वाधीक मतदान प्रभाग क्रमांक 13 मध्ये नोंदवण्यात आले. या प्रभागातील 3 हजार 879 मतदारांमधील तब्बल 3 हजार 14 मतदारांनी (77.70 टक्के) आपला हक्क बजावला. या प्रभागात माजी नगरसेवक शैलेश कलंत्री यांचा सामना भाजपचे सागर भोईर आणि राष्ट्रवादीचे दिनेश डफेदार यांच्याशी आहे. तर, महिला मतदारसंघात समितीच्या कविता कतारी, शिवसेनेच्या साक्षी सूर्यवंशी व राष्ट्रवादीच्या प्रिया खरे यांच्यात तिरंगी लढत आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्येही विक्रमी 77.11 टक्के मतदान झाले या प्रभागात समितीचे नूरमोहम्मद शेख यांचा सामना पाच अपक्षांशी होत आहे. तिसर्या क्रमांकावर प्रभाग क्रमांक सातमधील मतदान नोंदवले गेले आहे. या प्रभागात माजी नगरसेवक नितीन अभंग यांचा सामना भाजपचे अमित मंडलीक व राष्ट्रवादीचे प्रसाद गोरे यांच्याशी होत आहे.

तर, महिला मतदारसंघात समितीच्या मालती डाके भाजपच्या पूनम अनाप व अपक्ष डॉ.किशोरी मंडलीक यांच्याशी झूंज देत आहेत. या प्रभागात 75.75 टक्के मतदान झाले. शहरातील सर्वात लक्ष्यवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक विरुद्ध शिवसेनेचे रविंद्र म्हस्के यांच्यात थेट लढत होणार असून या मतदार संघातही विक्रमी 75.53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्वात कमी 66.67 टक्के मतदान झाले आहे. या प्रभागातून माजी उपनगराध्यक्ष किशोर टोकसे निवडणूक रिंगणात होते. त्यांचा सामना शिवसेनेचे उमेश ढोले व अपक्ष व्यंकटेश अमृतवाड यांच्याशी होता. दुपारनंतर अमृतवाड यांना पाठींबा वाढत असल्याची चर्चा समोर आल्यानंतर त्यांची धावपळ वाढल्याचेही दिसून आले.

उर्वरीत सर्वच प्रभागांमधील मतदानाची टक्केवारी सरासरी 70 ते 75 टक्क्यांच्या दरम्यान राहीली. त्यातून मतदारांचा उत्साहही दिसून आल्याने काही प्रभागातील प्रस्थापित हादरले आहेत. त्यातच निकालाचा दिवस तीन आठवड्यांनी लांबल्याने त्यांनी घरातील देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. काही प्रभागात धक्कादायक, काही ठिकाणी आश्चर्यकारक तर, काही ठिकाणी अपेक्षित निकाल समोर येण्याची दाट शक्यता आहे. नगराध्यक्षपदासाठी सेवा समिती व महायुती यांच्यात जोरदार टक्कर झाल्याचे दिसून येत आहे. दोन्हीकडून आपापल्या विजयाचे दावेही करण्यात आले असून प्रत्यक्ष चित्र समोर येण्यासाठी मात्र प्रतिक्षा करावी लागणार आहे.

कोणत्याही निवडणुकीत मतदानातील वाढीव टक्का परिवर्तनाच्या दिशेने झुकणारा असतो असे समजले जाते. यावेळच्या पालिका निवडणुकीत मतदारांचा उत्साह दिसून आला असून सरासरी 72.75 टक्के मतदान झाले असले तरीही काही प्रभागांमध्ये विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. अशा प्रभागांमध्ये माजी उपनगराध्यक्ष राहिलेल्या नितीन अभंग, शैलेश कलंत्री यांच्यासह माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांच्या प्रभागांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे निवडणुकीदरम्यानही या प्रभागातील लढत चर्चेत होती, त्यामुळे प्रत्यक्ष मतदानातील टक्का परिर्वनाकडे इशारा करणारा तर ठरणार नाही अशी चर्चा सध्या सुरु आहे.

