पोलीस उपअधीक्षकांनी फुलविले तरुणाच्या चेहर्यावर हसू! अवघ्या पाच तासांत चोरीच्या गुन्ह्याची उकल; भारावलेल्या तरुणाने व्यक्त केली कृतज्ञता..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आयुष्याची संपूर्ण कमाई जमा करुन चंदनापुरीतील अनिल रहाणे या तरुणाने संगमनेर शहरात इलेक्ट्रीकल्स दुकान सुरु केले. त्याच्या प्रामाणिक संघर्षाला यश मिळतंय असे दिसत असतांनाच मंगळवारी (ता.22) त्याच्या दुकानात चोरी झाली आणि चोरट्यांनी त्याचे दुकान अक्षरशः धुवून नेले. त्यामुळे क्षणात रस्त्यावर आलेल्या या तरुणाचे आभाळच फाटले. पोलिसांकडून दिलासा मिळेल असे वाटत असतांना पोलिसांनीही त्याची पूर्ण तक्रार दाखल करुन घेतली नाही. अखेर त्या तरुणाचा संघर्ष पाहून संगमनेरच्या पोलीस अधीक्षकांमधील ‘पोलीस’ जागला आणि त्यांनी अवघ्या पाच तासांतच या प्रकरणाचा छडा लावतांना चोरीला गेलेला निम्म्याहून अधिक मुद्देमाल हस्तगत केला. त्यांची ही चपळाई पाहून सर्वस्व गमावल्याच्या वेदनेत असलेल्या तरुण व्यावसायिकाच्या चेहर्यावर मात्र हास्य फुलले.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार चंदनापुरी येथे राहणारे अनिल दत्तु रहाणे यांनी आयुष्यभर जमा केलेली पुंजी खर्च करुन संगमनेरातील नवीन नगर रस्त्यावर दत्तकृपा इलेक्ट्रीकल्स नावाचे दुकान सुरु केले. प्रस्थापितांच्या पंक्तित येवून या तरुणाने केलेले धाडस पाहून सुरुवातीला अनेकांनी तोंडात बोटे घातली. मात्र त्याने आपल्या प्रमाणिक संघर्षाची परंपरा सुरु ठेवल्याने काही दिवसांतच त्याने या व्यवसायात आपला जम बसविला व त्यातून प्रगतीचा मार्ग दिसत असतांनाच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. काल मंगळवारी (ता.22) पहाटेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडून त्यातील जवळपास सगळा मुद्देमाल चोरुन नेला.
काल सकाळी ही घटना समोर आल्यानंतर त्या तरुणाला अक्षरशः रडूच कोसळले. ‘सगळे संपलेऽ.. मी काय करु आता? माझ्याकडे काहीच राहीले नाही..’ असे म्हणता म्हणता कालपर्यंत आनंदाने व्यवसाय करणारा हा तरुण ओक्साबोक्शी रडू लागला. आसपासच्या व्यापार्यांनी त्याला धीर देत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. आता आपल्याला पोलीसच मदत करतील हा विश्वास त्याच्याही मनात जागल्याने तो थेट शहर पोलीस ठाण्यात आला. मात्र येथे त्याचा भ्रमनिरास झाल्यासारखीच अवस्था निर्माण झाली.
चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल कागदावर मांडूनही पोलीस इतका मुद्देमाल चोरीस गेला असेल यावर विश्वास ठेवायला तयार होईनात. आपल्या दुकानातून सुमारे तीन लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल गेल्याचे तो वारंवार सांगत राहीला. मात्र पोलीस त्यावर भरवसा ठेवायलाच तयार होईनात. अखेर पोलिसांनी केवळ 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार नोंदवून घेतली. त्यामुळे निराश झालेला हा तरुण आपल्या गावी पोहोचला. यावेळी पत्रकार सोमनाथ काळे यांनी त्यांची भेट घेवून त्यांना धीर दिला व पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्याशी संपर्क साधून घडला प्रकार आणि त्या तरुणाचा संघर्ष त्यांच्या कानी घातला.
एका होतकरु आणि प्रामाणिक तरुणाच्या मनात पोलिसांविषयी चुकीची प्रतिमा तयार होवू नये यासाठी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत या प्रकरणाचा छडा लावण्याचा चंग बांधला आणि अवघ्या काही वेळातच त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. सदरच्या प्रकरणात दत्ता सीताराम गोसावी उर्फ अनिल अशोक पवार हा सराईत चोरटा असल्याची माहिती त्यांनी मिळविली. त्याचा सध्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले, त्याला यश मिळाले. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला पाठवून त्याच्या जमजम कॉलनीतून मुसक्या आवळल्या.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सदरचा गुन्हा आपण अल्ताफ शेख याच्यासोबत मिळून केल्याची कबुलीही त्याने दिली. चोरुन नेलेल्या मुद्देमालाबाबतही त्याने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा घातल्यानंतर पोलिसांना दत्तकृपा इलेक्ट्रिकल्स या दुकानातून चोरुन नेलेला जवळपास 80 टक्के मुद्देमाल तेथे आढळला. त्यासोबतच सदरचा माल वाहून नेण्यासाठी वापरलेली रिक्षा (क्र.एम.एच.15/झेड.4432) व एक दुचाकी (क्र.एम.एच.15/एच.26) पोलिसांना आढळल्याने त्यांनी ती देखील ताब्यात घेतली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात आरोपी दत्ता सीताराम गोसावी उर्फ अनिल अशोक पवार (रा.जमजम कॉलनी) याला अटक करण्यात आली असून त्याचा जोडीदार अल्ताफ शेख मात्र पसार झाला आहे.
सदरची घटना समोर आल्यानंतर आपलं सगळं गेलं, आता काय करायचं? अशा विवंचनेत असलेल्या अनिल रहाणे यांच्या दुकानातून चोरीला गेलेला बहुतेक मुद्देमाल अवघ्या पाच तासांतच पोलिसांनी हुडकून काढल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी आज सकाळी संगमनेरात येत पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांची भेट घेतली व कृतज्ञता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्यांना भेट दिली. हा प्रसंग अत्यंत भावनिक होता, यावेळी या तरुणाला आनंदाश्रृ अनावर झाले होते.
पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने पकडलेला आरोपी गोसावी उर्फ पवार हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याने अल्ताफ शेख सोबत लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दित तीन, संगमनेर व श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दित प्रत्येकी एक गुन्हा केला आहे. तर त्याच्या एकट्याच्या नावावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 2018 साली चोरीचे तीन, सन 2019 साली दरोड्याच्या एका गुन्ह्यासह चोरीचे तीन असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पो.ना.अण्णासाहेब दातीर (संगमनेर तालुका), फुरकान शेख (श्रीरामपूर), पो.कॉ.अमृत आढाव व सुभाष बोडखे (दोघेही संगमनेर शहर), प्रमोद गाडेकर (घारगाव) व गणेश शिंदे (अकोले) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.