निर्दयतेचा कळस! सहा महिन्यांचे अर्भक मुळानदीच्या पात्रात! घारगाव पोलिसांची धावाधाव; ओळख पटविण्याचेही आव्हान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे अपत्य होत नसल्याच्या कारणाने अनेक दाम्पत्यांच्या जीवनात नैराश्य दाटल्याची असंख्य उदाहरणे रोजच समोर येत असताना दुसरीकडे तालुक्यातील घारगावमधून निर्दयतेचा कळस गाठणारी संतापजनक घटना समोर आली आहे. आज (ता.4) सकाळी मुळानदीच्या पुलाखालील परिसरात अंदाजे चार ते पाच महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले. कपाळावरील बुक्क्याचा टीळा, हातापायांना काळा धागा आणि कंबरेला करगूटा वगळता शरीरभर इंचभर कपडाही नसलेले हे अतिशय गोंडस बाळ नजरेस पडल्यानंतर काहींनी तत्काळ पोलिसांना कळवले. घारगावचे सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात यांनी तात्काळ फौजफाट्यासह घटनास्थळाकडे धाव घेत कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन सदरील अर्भक ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात त्याची उत्तरीय तपासणी केली जाणार असून पोलिसांनी त्याची ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. या घटनेने घारगावात संताप निर्माण झाला असून वेगवेगळ्या चर्चांनाही उधाण आले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.4) सकाळी समोर आला. घारगावनजीक वाहणार्या मुळानदीवरील पुणे-नाशिक महामार्गालगतच्या पुलाखालील झुडपात सदरचे अर्भक आढळून आले. सकाळी या परिसरातून जात असताना काहींना आसपास कोणीही नसताना पुलाखालील झुडपात एक बाळ निपचित पडल्याचे दिसले. उत्सुकतेपोटी त्यांनी जवळ जावून पाहिले असता ते पाच ते सहा महिन्यांचे गोंडस अर्भक असल्याचे आढळले. मात्र इतक्या कडाक्याच्या थंडीतही त्या निष्पाप जीवाच्या कपाळावर वारकरी संप्रदायाचा बुक्का, उजव्या हातात कडं, डाव्या पायात काळा धागा आणि कंबरेला लाल रंगाचा करगूटा वगळता इंचभरही कापडं नसल्याने पाहणार्यांच्या मनात शंका आली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घारगाव पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली.

घटनास्थळापासून काही अंतरावरच असलेल्या घारगाव पोलिसांनीही तत्परता दाखवत परिसरात काही आढळते का याचा शोध घेतला. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन अर्भकाला रुग्णवाहिकेतून घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील दोन दिवस त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न होईल व त्यानंतर लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात त्याची उत्तरीय तपासणी केली जाईल. या अर्भकाविषयी कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी घारगाव पोलीस अथवा घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन घारगावचे सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक आदिनाथ गांधले, पोलीस हवालदार रामभाऊ भुतांबरे, राजेंद्र कोरडे, विलास कोकाटे, महादेव हांडे, रोहिदास आंधळे, सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर व चालक दत्ता आंधळे आदींनी केले आहे.

ही घटना समोर आल्यानंतर घारगावमध्ये संताप निर्माण झाला असून अशाप्रकारे नऊ महिने परिश्रमाने मातृत्व जोपासल्या नंतरही आपल्याच निरागस, निष्पाप अर्भकाचा अशा पद्धतीने जीव घेवून त्याला भटकी कूत्री अथवा अन्य श्वापदांचे भक्ष्य म्हणून नदीच्या काठावर फेकून देण्याचा प्रकार राक्षसी असून पोलिसांकडून त्याचा कसोशीने शोध होण्याची गरज आहे. या अर्भकाच्या माध्यमातून पोलिसांचे हात त्याच्या मारेकर्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी इतक्या कडाक्याच्या थंडीतही त्या निष्पाप जीवाला निर्वस्त्र अवस्थेत फेकण्यात आले आहे. त्यावरुन हा प्रकार अनैतिक संबंधातून तर, घडला नसावा असाही संशय असून मृत अर्भकाची ओळख पटवून वास्तव समोर आणण्याचे आव्हान घारगाव पोलिसांसमोर आहे.

देशात आजही अनेक जोडप्यांना अपत्य होत नसल्याने त्यांच्याकडून वैद्यकिय उपचार, धार्मिक विधी, व्रत-वैकल्यासारख्या पारंपरिक गोष्टींचा आधार घेतला जातो. मात्र त्या उपरांतही पालकत्व प्राप्त करण्यात अपयशी ठरलेले दाम्पत्य निराश होतात, त्यातील काही दत्तक विधानासारख्या पर्यायांना निवडतात तर, काही एकाकी जीवनाच्या. या घटनेत आढळलेले अर्भक अतिशय गोंडस आणि गोड असून त्याचे वय अंदाजे सहा महिन्यांच्या आसपास आहे. त्यामुळे अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा याबाबत काहीशी साशंकता आहे. हा प्रकार कौटुंबिक वादातून अथवा अन्य कारणातून घडला असण्याचीही शक्यता असून मृत अर्भकाची ओळख पटवण्यापासून त्याच्या मृत्यूचा छडा लावण्यापर्यंत घारगाव पोलिसांना धावाधाव करावी लागणार आहे. पूर्वी ‘एलसीबी’ गाजवणारे सपोनि थोरात या प्रकरणाचा कशाप्रकारे उलगडा करता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

