‘अखेर’ संगमनेर तालुक्यावर कोसळली कोविड संक्रमणाची दुसरी लाट..! दिवाळीनंतरच्या सहाव्याच दिवशी संगमनेरकरांना सर्वाधिक रुग्ण संख्येचा मोठा धक्का…सुवर्णकारापाठोपाठ आता शहरातील मोठे कापड व्यापारीही जायबंदी..!

सुवर्णकारापाठोपाठ आता शहरातील मोठे कापड व्यापारीही जायबंदी..!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळीची खरेदी आणि त्यासाठी गेल्या आठवड्यात उसळलेली तौबा गर्दी आता कोविडच्या प्रसाराचे मुख्य माध्यम बनली आहे. मागील पाच दिवसात चढत्याक्रमाने एकूण 217 रुग्णांची भर घालणाऱ्या कोविडने आज महिन्याभरातील सर्वाधिक रुग्ण संख्या समोर आणीत संगमनेर तालुक्यात संक्रमणाची दुसरी लाट अपेक्षे पूर्वीच कोसळल्याचे सुस्पष्ट केले आहे. तालुक्यातील संक्रमणात वाढ होण्याचा अंदाज यापूर्वीच जाणकारांनी वर्तविला होता, ती वेळ इतक्या लवकर येईल हे मात्र अपेक्षित नव्हते. त्यामुळे संगमनेरकरांनी आता पहिल्या लाटे पेक्षाही अधिक सावध होण्याची गरज आहे. आपली एक चूक आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी मनस्ताप निर्माण करू शकते याचे पदोपदी भान ठेवण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. आजच्या रुग्णवाढीने अवघ्या 24 तासांतच तालुक्याच्या रूग्ण संख्येत तब्बल शंभराहून अधिक रुग्णांची भर घालून तालुक्याला एकोणपन्नासाव्या शतकाच्या पार नेले आहे. आज आढळलेल्या एकूण 60 रुग्णांमध्ये शहरातील केवळ नऊ रुग्णांचा समावेश असून उर्वरित 51 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यापुर्वीच कोविड मुक्त झालेल्या अनेक गावांमध्ये पुन्हा कोविडचे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या मोठ्या रुग्णवाढीने तालुक्यातील बाधितांची संख्या आता 4 हजार 902 वर पोहोचली आहे.


शुक्रवारच्या अहवालातून दिवाळीच्या काळात घडलेल्या बेमालूम पद्धतीचा परिणाम समोर आला. ही रुग्णसंख्या दिवाळीच्या गर्दीमुळेच वाढत असल्याच्या वृत्तावरही शुक्रवारने शिक्कामोर्तब केले. दिवाळी आणि त्यालगत येणारे उत्सव म्हणजे धनसंपदेच्या पूजेसह सुवर्ण अलंकार खरेदी करण्याचेही सुदीन मानले जातात. त्यामुळे धनत्रयोदशीनंतर शहरातील सुवर्णकारांच्या दुकानातही तौबा गर्दी बघायला मिळत होती. याच गर्दीतून लक्षणे नसणारा रुग्ण भटकल्याने शुक्रवारी एका प्रसिद्ध सुवर्णकाराला रुग्णालय गाठावे लागले. तर काही छोट्या दुकानांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही कोविडची लागण झाल्याचे समोर आले. दिवाळीपासून जणू ढगाकडे तोंड करून निघालेला हा संसर्ग आता तालुक्याला किती उंचावर नेवून पोहोचवतो याचा अंदाज बांधणेही आता अवघड झालं आहे.

दिवाळीच्या अगदी दुसऱ्याच दिवशी शहरासह ग्रामीण भागातील संक्रमणात झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले. दिलासादायक बाब म्हणजे मधला एक दिवस वगळता शहराची रुग्णसंख्या प्रमाणापेक्षा अधिक फुगली नाही. मात्र त्याचवेळी ग्रामीण भागात कोविडच्या विषाणूने अधिक वेगाने पाय पसरल्याचे दिसून येत आहे. आजही आढळून आलेल्या एकूण 60 रुग्णांमध्ये शहरातील अवघ्या नऊ जणांचा समावेश असून उर्वरित 51 रुग्ण ग्रामीण भागातील व त्यातही कोविड मुक्त झालेल्या गावांमधून अधिक संख्येने असल्याने प्रशासनासह नागरिकांच्याही चिंता वाढल्या आहेत.

सुवर्णकारापाठोपाठ आता शहरातील मोठे कापड व्यापारीही जायबंदी..!

दिवाळीच्या गर्दीने संगमनेरात कोविड संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेला आवतणं धाडल्याचे आज पुन्हा एकदा सिद्द झाले. कालच्या अहवालातून शहरातील एका मोठ्या ‘सुवर्णकाराला’ कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आल्यानंतर, आज शहरातील एका मोठ्या ‘कापड दुकानदाराचा’ अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दिवाळी खरेदीच्या मानवी लाटेत कोविडचा विषाणू मनसोक्त हुंदडल्याचे स्पष्ट झाले आहे. आजच्या वृत्ताने संगमनेरकरांची काळजी वाढली असून यापुढे नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना कोविड सोडणार नाही हे मात्र निश्चित झाले आहे.

आज शहरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये बाजारपेठेतील 30 वर्षीय तरुण, गणेशनगर मधील 43 वर्षीय तरुण, विद्यानगर परिसरातील 72 वर्षीय इसमासह 22 वर्षीय तरुण, संगमनेर बस स्थानकातील 55 वर्षीय कर्मचारी, मालदाड रोड वरील 65 वर्षीय महिला, संगमनेर महाविद्यालयाजवळच्या वसाहतीतील 31 व 18 वर्षीय तरुण, तर केवळ संगमनेर असा उल्लेख असलेल्या 43 वर्षीय तरुणाचा अहवालही पॉझिटिव प्राप्त झाला आहे. आज शहरातील रुग्णसंख्येत नऊ रुग्णांची भर पडल्याने एकूण शहरी रुग्णसंख्या आता 1 हजार 340 झाली आहे.

ग्रामीण भागातील उंबरी बाळापुर, गुंजाळवाडी, घुलेवाडी व निमगाव खुर्द या गावांमधून अधिक संख्येने रुग्ण समोर आले आहेत. अर्थात यात एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांचा भरणा अधिक आहे. आज आश्वी खुर्द येथील 78 वर्षीय महिलेसह 50 वर्षीय इसम व 25 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथील 49 वर्षीय इसमासह 40 व 39 वर्षीय महिला, झोळे येथील 35 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 52 व 50 वर्षीय इसमासह 23 वर्षीय तरुण, 55, 34, 32 व 27 वर्षीय महिला, निमगाव खुर्द येथील 50 वर्षीय महिलेसह 40 18 वर्षीय तरुण, धांदरफळ खुर्द येथील 55 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 45 वर्षीय महिलेसह 27 वर्षीय तरुण, राजापूर येथील 45 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 50 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 63 व 50 वर्षीय दोघी, 23 व 17 वर्षीय महिला, 52 वर्षीय इसमासह 38 व 37 वर्षीय तरुण आणि 15 वर्षीय मुलगा.

आश्वी बुद्रुक येथील 65 व 51 इसमासह 40 व 26 वर्षीय तरुण व 20 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 49 वर्षीय इसमासह 35 व 22 वर्षीय दोन तरुण आणि 40 वर्षीय दोघींसह 23 वर्षीय महिला, बिरेवाडी येथील 31 वर्षीय तरुण, चिखली येथील 17 वर्षीय तरुण, मांंची हिल येथील 53 वर्षीय इसम, निमज येथील 14 वर्षीय बालिका, रहिमपूर येथील 40 वर्षीय महिला, खांडगाव येथील 40 वर्षीय महिला व वडगाव पान मधील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिक अशा ग्रामीण भागातील 51 जणांसह आज 60 जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले. चालू महिन्यातील आजची ही रुग्णसंख्या उच्चांकी आहे. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णवाढीची गती आज वाढली आहे. या महिन्यात सुरुवातीचे पंधरा दिवस दिलासा दिल्यानंतर दिवाळी आटोपताच संगमनेरकरांना जोरदार धक्का दिला असून तालुक्यात दुसऱ्या लाटेचे संक्रमण सुरु झाले आहे. त्यामुळे संगमनेरकरांनी आता अधिक सतर्क राहून प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. आपण एखादी चूक केल्यास त्याचे परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबीयांना भोगावे लागतील याचे सतत स्मरण ठेवूनच सार्वजनिक जीवनात वावरावे लागणार आहे. अन्यथा कोविडच्या संक्रमणात सातत्याने वाढ होत राहील असे वैद्यकीय जाणकारांचे मत आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होणार हे गृहीत धरुन संगमनेर शहरातील जवळपास सर्वच दुकानदारांनी आवश्यक ती खबरदारी घेतली होती मात्र दिवाळीपूर्वीच्या चार दिवसात बाजारपेठेत तौबा गर्दी झाल्याने त्याचे दुष्परिणाम समोर येणार हे निश्चित होते. गेल्या पाच दिवसांंतील आकडेवारीतून ही गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे. त्यातच शुक्रवारी शहरातील एका मोठ्या सुवर्णकाराला कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले तर आज एका मोठ्या कापड व्यावसायिकाचा अहवालही पॉझिटिव प्राप्त झाला. या दोन्ही व्यापाऱ्यांचे शहरात अलिशान दालन असून दिवाळीच्या कालावधीत या दुकानांमध्ये तौबा गर्दी असते. काल आणि आज हे दोन्ही व्यापारी संक्रमित झाल्याने त्यांना संसर्ग देणारा रुग्ण दिवाळीच्या गर्दीत किती लोकांना स्पर्शुन गेला असेल याचा अंदाजही लावणे अवघड आहे. त्यामुळेच सर्व वाचकांना कळकळीचे आवाहन आहे, घराबाहेर पडताना तोंडावर मास्क अवश्य बांधा. प्रशासनाने व आरोग्य यंत्रणांंनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. आपली एक चूक आपल्या संपूर्ण कुटुंबाला संकटात पाडू शकते. त्यामुळे कृपया सावध व्हा, सतर्क रहा व सुरक्षित रहा.

संगमनेरातील कोविड संक्रमणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला शहरी रुग्णसंख्येसह ग्रामीण रुग्णसंख्याही घटली होती. त्यामुळे 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सरासरी 22.47 रुग्ण या गतीने तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत अवघ्या 337 रुग्णांची भर पडली होती. यात शहरातील केवळ 86 तर ग्रामीण भागातील 251 रुग्णांचा समावेश होता. मात्र भाऊबीजपासून कोविडने आपला वेग वाढवल्याचे समोर आलेल्या आकडेवारीतून स्पष्टपणे दिसते. 16 ते 21 नोव्हेंबर या केवळ सहा दिवसांचा विचार करता तालुक्याची रुग्णगती दुप्पट झाली.


या सहा दिवसांत शहरात 11.67 रुग्ण दररोज अशी दुप्पट रुग्णगती होत 67 तर ग्रामीण भागात 35 रुग्ण दररोज या गतीने 210 अशा एकूण सरासरी 46 च्या वेगाने 277 रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीपासून फुगत गेलेला कोविड मुक्तीचा फुगा दिवाळीच्या दुसर्‍याच दिवशी फुटला. शहरातील आजवरची रुग्णसंख्या 1 हजार 340 तर ग्रामीणभागातील रुग्णसंख्या 3 हजार 562 झाली आहे. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र खुप उंचावले असून सध्या सरासरी 96 टक्के रुग्ण उपचारांती बरे होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *