गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या चारित्र्यवान उमेदवाराची निवड आवश्यक! शहर विकासासाठी शत्रूचेही पाय धरु; आमदार सत्यजीत तांबे यांचे संगमनेरकरांना आवाहन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरातील मुलभूत प्रश्न मार्गी लावण्याचे काम यापूर्वी झाले. कधीकाळी खड्ड्यात उतरुन पाणी काढावे लागणारे शहर आज पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले आहे. क्रीडांगण, उद्याने, बंदीस्त नाट्यगृह, नदीचा काठ, वृक्षारोपन आणि अंतर्गत रस्त्यांसह त्यांना जोडणारे रिंगरोड यामुळे शहराने चारही बाजूच्या सिमा ओलांडल्या आहेत. आता पुढील काळात अधिक चांगल्या व्यवस्थापनाची गरज असून त्यातून शहराचा कायापालट करण्याची संधी आहे. त्यासाठीच संगमनेर सेवा समितीने शहरातील चारित्र्यवान, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या, कर्तृत्ववान उमेदवारांचा शोध घेवून उच्चशिक्षित, सामाजिक व राजकीय जाणीव असलेल्या डॉ.मैथिली तांबे यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी आणि तरुण उमेदवारांचा मेळ घालून पॅनल उभे केले आहे. ‘संगमनेर 2.0’ हा केवळ शब्द नसून विकासासाठीचे कालबद्ध वचन आहे. त्याच्या पूर्तीसाठी शत्रूचेही पाय धरावे लागलेत तर त्याची तयारी आहे. पुढील पाच वर्षात त्यातील प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचे वचन समिती देत असून संगमनेरकरांनी समितीच्या ‘व्हिजन’ला पाठबळ द्यावे असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे.

मंगळवारी (ता.2) संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह सदस्यपदाच्या 30 जागांमधील 27 ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठीचा प्रचार आज (ता.1) रात्री दहा वाजता संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेर सेवा समिती, शिवसेना-भाजप युती व राष्ट्रवादीसह अपक्षांचीही सकाळपासूनच मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड सुरु आहे. त्या अनुषंगाने संगमनेर सेवा समितीचे नेतृत्व करणार्या आमदार सत्यजीत तांबे यांनी आपले जनसंपर्क अभियान पुढे नेताना शहरातील मोठ्या आस्थापनांना भेटी देत तेथील कर्मचार्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नगरविकास या विषयातील आपल्या आवडीवर प्रकाश टाकताना कॅलिफॉर्नियाचे गव्हर्नर गॅवीन न्यूसन यांच्या सिटीझनविल या पुस्तकातील ‘तंत्रज्ञान आणि लोकसहभाग’ या सूत्राचा वापर करुनच ‘संगमनेर 2.0’ हे कालबद्ध उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्याचे सांगितले.

शहराच्या मुलभूत गरजा यापूर्वीच्या काळात पूर्ण झाल्याचे विविध दाखले जोडताना त्यांनी येत्या महिनाभरातच तालुकास्तरावर पहिले ठरणारे बंदीस्त वातानुकुलीत नाट्यगृह संगमनेरकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची घोषणाही केली. गंगामाई घाटाच्या परिसराला मोठे महत्व आहे. हा परिसर संगमनेरकरांच्या आस्थेशी जोडलेला आहे. त्याचा विचार करुन बायपास पूल ते फादरवाडीपर्यंतच्या साडेतीन किलोमीटरचा विकास करण्याचे स्वप्नं असून त्या अंतर्गत जॉगींग व सायकलिंगसाठी ट्रॅक, दुतर्फा झाडी, नदीच्या घाटांचा पुनर्विकास, परिसरातील मंदिरांचा जिर्णोद्धार, पोहण्यासाठी सुरक्षित ठिकाणं निर्माण करुन चार नद्यांच्या संगमातून निर्माण झालेली शहराची ओळख ठळक करण्याची प्रामाणिक इच्छाही आमदार तांबे यांनी बोलून दाखवली.

ज्या-ज्यावेळी परदेशात गेलो, त्या-त्यावेळी तेथील विकसित शहरं पाहून आपले शहरही अशाच प्रकारे सुंदर आणि विकसित असावे अशा भावना सोबत घेवूनच परतलो. त्यातून गॅविन न्यूसन यांचे लोकसहभागातून नगरीविकासाचे पुस्तक वाचण्यात आल्याने त्यातून आपण प्रभावित झालो आणि त्या पुस्तकाचे मराठीत अनुवादन केल्याचेही त्यांनी सांगितले. परदेशातील रस्ते, तेथील स्वच्छता, नागरी सुविधा व व्यवस्था या सर्वांचा विचार करुन तशीच व्यवस्था आपल्याकडेही उभी करण्यासाठी संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून एक चांगली टीम बांधण्याचा प्रयत्न केला आहे. विविध शहरांचा अभ्यास करुन, आपल्या शहराचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून शहराचा चौफेर विकास कालबद्ध पद्धतीने कसा साधता येईल यावर मंथन करुनच ‘संगमनेर 2.0’ हा जाहीरनामा तयार केला असून हे प्रचारपत्रक नसून पुढील पाच वर्षांचा आपला ‘वचननामा’ असल्याची ग्वाही आमदार तांबे यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर संगमनेर सेवा समितीच्या नगरसेवकांचे वार्षिक ‘प्रगती पुस्तक’ तयार होणार असून त्या माध्यमातून त्यांच्या कामाचे वार्षिक मूल्यांकन केले जाईल. पुढील पंचवार्षिक निवडणुकीत याच प्रगती पुस्तकाच्या आधाराने त्याला मतदारांसमोर जाण्याची संधी मिळेल. त्या शिवाय नगरसेवक अथवा नगराध्यक्षपदासाठी यापुढे केवळ दोनवेळा उमेदवारी करता येईल असा नियम आपण लागू केल्याची महत्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली. हा नियम आपल्यालाही लागू होत असून आमदार म्हणून आपण केवळ दोनदाच निवडणूक लढवणार असल्याचे महत्वपूर्ण विधानही त्यांनी केले. नगरसेवकांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी आपण मुंबईस्थित एका संस्थेची नियुक्ती केल्याचेही आमदार तांबे यांनी यावेळी सांगितले.

संगमनेर शहर आणि तालुक्यासाठी खूप चांगलं काम करण्याची मनापासून इच्छा आहे. त्यासाठीच्या अनेक कल्पना मनात आहेत. आपल्या मनातील कल्पना नगराध्यक्ष म्हणून प्रत्यक्षात उतरवण्यासाठी डॉ.मैथिली तांबे या सक्षम पर्याय असून गेल्या 15 वर्षात त्यांनी सामाजिक आणि राजकीय या दोन्ही गोष्टींचा मोठा अनुभव मिळवला आहे. शहराचा विकास साधताना लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता यांच्यात उत्तम समन्वय साधून व्यवस्थापन सांभाळण्याची गरज असते. त्यासर्व निकषांमध्ये बसणार्या व्यक्तिलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.

संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली गेली आहे. समितीच्या कोणत्याही उमेदवारावर अवैध व्यावसायिक, गुन्हेगारी पार्श्वभूमी अथवा समाजाला त्रास देण्याचा ठपका नसून प्रत्येकाचे चरित्र पडताळूनच त्यांना तिकिट दिले आहे. शहराच्या विकासासाठी आपल्याला शत्रूचेही पाय धरण्याची वेळ आली तर, त्यात आपल्याला अजिबात कमीपणा वाटणार नाही असे स्पष्ट करताना आमदार सत्यजीत तांबे यांनी राजकारण करतानाही ते स्वच्छ आणि मोकळ्या मनाने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. एकमेकांवर नाहक चिखलफेक करणं, टीका-टिपण्णी करणं अयोग्य असून शांत आणि सुसंस्कृत ही आपल्या शहराची वेगळी ओळख जपण्यासाठी साथ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

संगमनेर नगरपालिकेच्या राजकारणात यापूर्वी कधीही सक्रिय नसलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांच्यावर यंदा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी नगरविकास या आपल्या आवडत्या विषयातून संगमनेरच्या विकासाचे कालबद्ध मॉडेल तयार करुन ‘संगमनेर 2.0’ ही अभिनव संकल्पना समोर आणली आहे. निवडून जाणार्या नगरसेवकाचे वार्षिक प्रगती पुस्तक, कोणत्याही नगरसेवकाला फक्त दोनवेळा निवडणुकीची संधी स्थानिक स्वराज्य संस्थात बहुधा पहिल्यांदाच कानावर येत असलेल्या नियमांसह त्यांनी पुढील पाच वर्षांचे ‘व्हिजन’ मतदारांसमोर मांडले आहे. नगराध्यक्षपदासह प्रत्येक उमेदवाराची निवड करताना त्यांनी त्यांच्या चारित्र्यासह त्यांच्यातील कर्तृत्व जोखूनच त्यांची नावे निश्चित केल्याने संगमनेरकरांमधून आमदार सत्यजीत तांबे यांच्या या अनोख्या प्रयोगाला पाठबळ वाढले आहे. जनसहभागातून त्यांनी तयार केलेल्या ‘जाहीरनाम्या’साठी संगमनेरकरांनी सूचवलेल्या कल्पना पाहता त्यांच्या आवाहनाला संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून आले आहे.

