श्रीरामपूरमध्ये खड्ड्यांत बसून सर्वपक्षीय ‘गोट्या खेळो’ आंदोलन अनेकदा आंदोलन करुनही लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
भाजपचे अशोक लोंढे यांच्या नेतृत्वाखाली येथे रस्त्यावरील खड्ड्यांत बसून नुकतेच सर्वपक्षीय ‘गोट्या खेळो’ आंदोलन झाले. यामुळे जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अनेकदा आंदोलन करुनही लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, रिपब्लिकन पक्षाचे तालुका संघटक संजय बोरगे, प्रहारचे शहरसध्यक्ष सागर दुपाटी, कामगार नेते बबन माघाडे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, भाजपचे युवा नेते सुनील निकम, संजय शिरसाठ यांनी आंदोलनाद्वारे संबंधित विभागाचे लक्ष वेधले. रस्ता दुरुस्तीसाठी लोंढे यांनी सहकार्यांसमवेत रस्त्यावर भीक मांगो आंदोलन केले, मुंडन आंदोलन, रस्त्यात झाडे लावून आंदोलन, रस्त्यावर झोपून आंदोलनासह अनेक आंदोलन करूनही अद्याप रस्ता दुरुस्ती न झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यात बसून सर्वपक्षीय ‘गोट्या खेळो’ आंदोलन करुन सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्यात आले.

या आंदोलनात संतोष निकम, संजय थोरात, सचिन शिंदे, अमोल जाधव, विश्वास कोळगे, वाल्मिक निकम, प्रदीप शेळके, राजू त्रिभुवन, स्वप्नील सोनार यांनी सहभाग घेतला. श्रीरामपूर ते दत्तनगरपर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी रोज अनेक लहान-मोठे अपघात घडतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
