‘एलसीबी’च्या पोलीस उपनिरीक्षकाचा धांगडधिंगा ‘अखेर’ उघड! शिर्डीतील प्रकरणात दीड कोटींचा मलिदा; पोलीस अधिक्षकांकडून चौघांचे निलंबन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हाती आलेल्या तपासाची अमर्याद व्याप्ती वाढवून प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसतानाही मनात येईल त्याला ‘धाकात’ घेवून बळजबरीने वसुली करण्यात सराईत झालेल्या अहिल्यानगर स्थानिक गुन्हेशाखेतील पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या टोळीचा धांगडधिंगा ‘अखेर’ उघड झाला आहे. तब्बल सात महिन्यांपूर्वी शिर्डीच्या ‘ग्रो मोअर’ प्रकरणात ‘ऑनलाईन’ पद्धतीने घडलेला दीड कोटी रुपये खंडणी वसुलीचा हा धक्कादायक प्रकार आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आला. याबाबतचा अहवाल प्राप्त होताच पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी तत्काळ कारवाईचा बडगा उगारताना एलसीबीचा भ्रष्टाचारी उपनिरीक्षक तुषार धाकराव याच्यासह हवालदार मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे आणि गणेश भिंगारदिवे अशा चौघांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असून त्यानंतर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई केली जाणार आहे. अंगात ‘वर्दी’ घालून कायदा ‘पायदळी’ तुडवताना पोलीसदलाच्या प्रतिमेवरच शिंतोडे उडवणार्या या प्रकरणातील दोषींना कायमस्वरुपी सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आता होवू लागली आहे.

शिर्डी येथील ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट’ या आर्थिक कंपनीकडून ग्राहकांना त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर अधिक चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्याला अनेकजण बळी पडल्याने त्यांनी आयुष्यभर कवडीकवडी जमा केलेली रक्कम झटपट वाढेल या लालसेपोटी संबंधित कंपनीवर भरवसा ठेवून जमा केली. मात्र ठरलेली मुदत संपल्यानंतरही गुंतवणुकदारांना परतावा तर सोडाच मूळ रक्कम मिळवण्यासाठीही हेलपाटे मारण्याची वेळ आली. त्यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जानेवारीमध्ये या प्रकरणातील आठ लाखांच्या फसवणुकीचा पहिला गुन्हा राहाता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला व त्याचा तपास अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्गही करण्यात आला.

दरम्यानच्या काळात 15 जानेवारी 2025 रोजी या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ‘ग्रो मोअर’चा संचालक भूपेंद्र राजाराम सावळे हा आपले दोन
भाऊ आणि एका मित्रासह लोणीमार्गे नाशिकला जाण्यासाठी निघाले असता तपासातून खंडणी वसुलीचे नवनवे प्रताप करणार्या स्थानिक गुन्हेशाखेच्या तुषार धाकराव या उपनिरीक्षकाने हवालदार मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे आणि गणेश भिंगारदिवे यांच्यासह मिळालेल्या कायदेशीर सुविधांचा गैरवापर करीत आरोपीचे वाहन ‘ट्रॅप’ केले आणि नियोजनानुसार मानवी वस्तीपासून दूरवर लोणी रस्त्यावर रोखले. यावेळी धाकरावने आरोपी सावळे याला ‘धाकात’ घेत ‘तुझ्याकडे रिझर्व्ह बँकेचा परवाना नसताना तु लोकांकडून कोणत्या आधारावर पैसे गोळा करतोस?, तु लोकांची फसवणूक करीत आहेस, तुझ्यावर गुन्हाच दाखल करतो’ अशी उघड धमकी देत त्याला आपल्या वाहनात बसवले.

त्यानंतर धाकरावसह त्याच्या वसुली टोळीतील हवालदारांनी नेहमीचा ‘फंडा’ वापरताना शिक्षेची भीती निर्माण करुन ‘या गुन्ह्यातून सुटका हवी असेल तर दीड कोटी रुपये रोख स्वरुपात द्यावे लागतील’ असे म्हणत खंडणीची मागणी केली. त्यावेळी आरोपी सावळे याने आपल्याकडे इतकी मोठी रोकड नसल्याचे मात्र बँकेच्या खात्यात अपेक्षित रक्कम असल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे याला आणखी धाकात घेतले तर हा रोखही देईल असा विश्वास बळावून धाकरावने आरोपीला थेट अहिल्यानगर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात आणले. त्यामुळे आता आपल्याला अटक अटळ असल्याची भीती सावळेच्या मनात निर्माण झाल्याने त्याने आपण ‘ऑनलाईन’ दीडकोटी रुपये देण्यास तयार असल्याचे धाकराव आणि त्याच्या टोळीला सांगितले.

काही वेळानंतर आरोपीजवळ आलेल्या धाकरावने कोणताही मागचा पुढचा विचार न करता आरोपीला ऑनलाईन दीडकोटी रुपये देण्याची मागणी केली. त्यानुसार आरोपी भूपेंद्र सावळे याने ती पूर्णही केली आणि ठरल्याप्रमाणे दीडकोटी रुपयांची रक्कम धाकरावला अपेक्षित असलेल्या खात्यात वर्ग झाली. त्यानंतर लागलीच शिर्डी फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे असतानाही स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणीतून ताब्यात घेवून थेट अहिल्यानगरला नेलेल्या भूपेंद्र सावळे याची सुटका झाली. जानेवारीत घडलेला हा धक्कादायक प्रकार धाकराव आणि त्याच्या टोळीने जवळजवळ पचवला होता.

मात्र जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली होताच नव्याने पदभार घेतलेल्या सोमनाथ घार्गे यांनी प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तपासावर लक्ष केंद्रीत केल्यानंतर आर्थिक गुन्हेशाखेकडून शिर्डीप्रकरणाचा तपास सुरु असतानाच ‘ग्रो मोअर’चा संचालक भूपेंद्र सावळे याच्या चौकशीला सुरुवात झाली.
त्यातून धाकराव आणि त्याच्या टोळीचा हा कारनामा उघड झाल्यानंतर आर्थिक गुन्हेशाखेकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालाच्या आधारे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी कठोर भूमिका घेताना पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकरावसह हवालदार मनोहर सीताराम गोसावी, बापूसाहेब रावसाहेब फोलाणे आणि गणेश प्रभाकर भिंगारदिवे अशा चौघांना तत्काळ निलंबित केले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांच्याकडे देण्यात आला आहे. कायद्याची तमा न बाळगता चक्क ‘ऑनलाईन’ पद्धतीने दीडकोटी रुपयांची खंडणी उकळण्याच्या या प्रकरणाने राज्य पोलीसदलाच्या प्रतिमेवरच शिंतोडे उडाले असून दोषी असलेल्यांवर ‘बडतर्फी‘ची कारवाई व्हावी अशी अपेक्षा सामान्य नागरीकांमधून व्यक्त होत आहे.

स्थानिक गुन्हेशाखेत वर्णी लागल्यापासून निलंबित पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव याने अक्षरशः धिंगाणा घातला होता. त्याच्याकडे सोपवण्यात आलेल्या प्रत्येक प्रकरणाच्या तपासाची नाहक व्याप्ती वाढवून या महाशयांनी गुन्ह्याशी कोणताही संबंध नसलेल्या अनेकांना नागवल्याची चर्चा वेळोवेळी समोरही आली होती. मध्यंतरी घुलेवाडीतील एका तरुणाचा मृतदेह कर्जत तालुक्यात आढळल्यानंतरच्या तपासातही याच धाकरावने ऐन गणेश विसर्जनाच्या दिनी राजापूरमधील एका डॉक्टरसह मेडिकल चालकालाही धाकात घेवून लाखोंची उड्डाणे घेतली होती. तर, नाशिक रोडवरील भंडारी यांच्या घरावर भर वर्दळीच्यावेळी घडलेल्या दरोड्याच्या प्रकरणातही अनेक निष्पापांना कायद्याचा ‘धाक’ दाखवून लुटल्याचेही बोलले गेले होते. त्यामुळे या अधिकार्यावर गुन्हा दाखल करुन गुन्हेशाखेतील त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत त्याने तपास केलेल्या प्रत्येक प्रकरणाच्या मूळाशी जाण्याची आणि त्याच्या संपत्तीची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

