ई-निविदा घोटाळा प्रकरणी छावाचे राज्यमंत्री सत्तारांना निवेदन

ई-निविदा घोटाळा प्रकरणी छावाचे राज्यमंत्री सत्तारांना निवेदन
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
ई-निविदा प्रक्रियेत पंचायत समिती अधिकार्‍यांपासून ग्रामसेवकांपर्यंत सर्वांकडूनच शासकीय गोपनियतेचा भंग झाला आहे. सदर ई-निविदा खासगी संगणक चालकांकडे भरण्यात आल्या असल्याने यातील घोटाळ्याप्रकरणी अखिल भारतीय छावा संघटनेने पंचायत समितीपासून आयुक्तालयापर्यंत निवेदने दिली, अनेकदा आंदोलने केली. मात्र वरीष्ठ अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने आपण जातीने या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्यासह सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात केली आहे.

राज्यमंत्री सत्तार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ई-निविदा प्रकरणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने गेल्या 10 महिन्यांच्या कालावधीत अनेक बाबी पुराव्यानिशी उघडकीस आणून देखील ई-निविदा शासकीय कार्यालयात न होता खाजगी संगणक चालकांकडे प्रसिद्ध केल्या जातात. या संदर्भात खासगी संगणक चालक त्यांना डीएससी देऊन शासकीय गोपनीय निविदा प्रक्रियेची कागदपत्रे पुरविणारे गटविकास अधिकारी/ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, या मागणीसाठी आम्ही वेळोवेळी उपोषणे व आंदोलने केली आहेत. परंतु, केवळ चौकशीचे आदेश देऊन जे दोषी आहेत तेच गटविकास अधिकारी चौकशीसाठी नेमतात हा सावळा गोंधळ मिटवून आपण या प्रकरणी लक्ष घालून स्वतःचे अधिकार वापरून ई-निविदा खासगी ठिकाणी प्रसिद्ध करणार्‍या गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना द्यावेत, अशी मागणी जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सातपुते, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष विजय बडाख, जिल्हा संघटक दादा बडाख, जिल्हा सरचिटणीस प्रवीण देवकर, शहराध्यक्ष शरद बोंबले, शेतकरी आघाडी प्रमुख नीलेश बनकर, जिल्हा संपर्कप्रमुख सुहास निर्मळ, अनिल तळोले, विनोद पानसरे, अमोल ढोले, पवन चव्हाण, प्रशांत चव्हाण, प्रसाद वाणी, संतोष गायधने आदिंनी केली आहे.

 

Visits: 89 Today: 2 Total: 1103720

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *