विधवा भावजयीसोबत दीर अडकणार विवाह बंधनात! वडाळा बहिरोबा येथील मोटे परिवाराचा आदर्श निर्णय
नायक वृत्तसेवा, नेवासा
सातफेरे घेऊन ती नव्या स्वप्नांसह नव्या घरी आली. लग्नानंतरच्या पुढील आयुष्याच्या प्रवासाला ती आणि तिच्या पतीने सुरुवात केली. सर्व काही सुरळीत सुरू असताना नियतीच्या मनात आल्याने अचानक दुःखाचा भलामोठा डोंगर तिच्यावर कोसळला. आणि एका अपघातात तिच्या पतीचं निधन झालं. यातून सावरत तिच्या दिराने मनाचा मोठेपणा दाखवत तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे दाम्पत्य विवाह बंधनात अडकणार आहेत.
याबाबतची करुण कहाणी अशी की, राहुरी कारखाना येथील बाळासाहेब गव्हाणे यांची कन्या प्रांजली हिचा 2017 मध्ये वडाळा बहिरोबा येथील संजय मोटे यांचे चिरंजीव महेश मोटे यांच्याशी विवाह झाला होता. बाळाच्या रूपाने दोघांच्या आयुष्यात अजून एक सुख आलं. मात्र, नगर-औरंगाबाद महामार्गावर अभियंता महेशच्या अपघाती निधनानंतर त्या आनंदावर विरजण पडलं. प्रांजलीसमोर उभं आयुष्य समोर असताना तिचा दीर अभियंता महेंद्र मोटे याने मनाचा मोठेपणा दाखवत प्रांजलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. यासंदर्भात वडाळ्याच्या सरपंच मीनल मोटे, सामाजिक कार्यकर्ते चांगदेव मोटे आणि दत्तात्रय मोटे यांनी विधवा प्रांजलीचे सासरे संजय मोटे यांच्याशी चर्चा केली. यानंतर सासरा, दीर आणि कुटुंबाने आनंदाने हे नवं नातं स्वीकारलं आहे.
प्रांजलीच्या सासर्यांनी वडिलांची भूमिका स्वीकारत विधवा सुनेचे कन्यादान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 7 जानेवारी 2021 रोजी नात्याने दीर-भावजय असलेले हे दाम्पत्य विवाह बंधनात अडकणार आहेत. मोटे परिवाराचा हा आगळावेगळा आदर्श परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.