उधारी पायी दिव्यांगाला सोडावे लागले घर! पत्नीची उधारी वाल्याविंरुद्ध पोलिसात तक्रार

नायक वृत्तसेवा, साकूर
केलेल्या कामाचे पैसे लोक देत नसल्याने संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात असलेल्या एका दिव्यांग बांधवाने वैतागून आपले घरदार घरदार सोडले आहे. त्याने घर सोडून पाच, सहा दिवस उलटले असल्यामुळे त्याची पत्नी आणि मुले काळजीत पडले असल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने साकुर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

साकुर येथील शरीराने दिव्यांग असलेल्या कांतीलाल शेंडगे यांचा ‘जेसीबी’ चा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांनी आपल्या जेसीबीच्या साह्याने संपर्कातील लोकांच्या शेतीच्या
सपाटी करणाची कामे केली. ही कामे करत असताना संबंधित शेतकऱी कांतीलाल शेंडगे यांना केवळ डिझेल साठी रक्कम देत गेले. त्यामुळे त्या शेतकऱ्यांकडे कांतीलाल शेंडगे यांची उर्वरित रक्कम बाकी म्हणून राहिली. काही काळाने शेंडगे यांनी संबंधित शेतकऱ्यांकडे बाकी राहिलेल्या रकमेची वारंवार मागणी करून सुद्धा शेंडगे यांना रक्कम मिळालीच नाही, पैसे मागितल्यावर संबंधित शेतकऱ्यांकडून उडवा उडवीच्या उत्तराबरोबरच हात पाय तोडू अशी दमबाजी व धमकी दिली जात असल्यामुळे कांतीलाल शेंडगे यांनी आपल्या कुटूंबाला राम राम करत पाच दिवसापासून घरदार सोडून ते बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे त्यांची पत्नी, मुले, आणि नातेवाईक काळजीत पडले आहेत.

याबाबत कांतीलाल शेंडगे यांच्या पत्नी मनीषा कांतीलाल शेंडगे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात पती हरवल्या बाबतची खबर दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, पती कांतीलाल दौलत शेंडगे यांनी १५ वर्षांपूर्वी जेसीबी घेतला होता.या जेसीबीच्या साह्याने ते साकूर आणि साकूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या सपाटी करणाचा व्यवसाय करत होते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी बिरेवाडी, साकूर भागातील काही शेतकऱ्यांच्या जमीन सपाटीकरण करण्याची कामे केली होती, त्या कामांचे काही पैसे हे उधारी म्हणून संबंधित शेतकऱ्यांकडे बाकी म्हणून राहिले होते. वारंवार मागणी करूनही उधारी जमा न झाल्यामुळे त्यांचे जेसीबी चे हप्ते थकले. त्यामुळे त्यांनी आल्या त्या कमी किंमतीत जेसीबी विकून टाकला.कांतीलाल शेंडगे हे अपंग असल्यामुळे ते इतर कामधंदा करू शकत नसल्याने ते घरीच बसून होते. आपली राहिलेली बाकी शेतकऱ्यांनी द्यावी यासाठी त्यांनी वारंवार मागणी केली, मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी वैतागून आपले घरदार सोडले असून ते गेल्या पाच-सहा दिवसापासून बेपत्ता झाले असल्याचे मनीषा शेंडगे यांनी पोलिसांना दिलेल्या खबरीत म्हटले आहे.

शनिवार दि.५ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कांतीलाल शेंडगे यांनी आपल्या घरच्यांना सांगितले कि, मी बाहेरगावी चाललो आहे. सोमवार दि.७ जुलै रोजी रात्री ७.२५ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीला फोन केला व मुले कशी आहेत हे विचारल्यावर त्यांचा फोन बंद झाला. त्यानंतर त्यांना पुन्हा फोन केला असता तो बंद येत असल्याने नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र ते सापडले नाहीत. त्यानंतर घरातील वस्तू पहिल्या असता त्यांच्या एका नोंदवहीत एक चिठ्ठी सापडली, त्यात थकबाकीदारांची नावे असून त्यांनी बाकी जमा करावी, नाहीतर मला आत्महत्या करावी लागेल अशी चिठ्ठी मिळून आल्याने त्यांच्या पत्नीने घारगाव पोलिसांकडे धाव घेतली आहे.

Visits: 348 Today: 5 Total: 1109568
